विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
महामारीविषयक सुसज्जता नवोन्मेष आघाडी (सीईपीआय) अंतर्गत आशियातील पहिल्याच आरोग्यविषयक संशोधनाशी संबंधित “प्री-क्लिनिकल नेटवर्क सुविधे”चे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
16 JUL 2024 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2024
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते आज महामारीविषयक सुसज्जता नवोन्मेष आघाडी (सीईपीआय) अंतर्गत आशियातील आरोग्यविषयक संशोधनाशी संबंधित पहिल्याच “प्री-क्लिनिकल नेटवर्क सुविधे”चे उद्घाटन झाले.फरीदाबाद येथील “ट्रान्सलेशनल आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या (टीएचएसटीआय)” अधिपत्याखालील प्रादेशिक जैवतंत्रज्ञान केंद्रात ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.
महामारीविषयक सज्जता नवोन्मेष आघाडीने (सीईपीआय) बीआरआयसी- टीएचएसटीआयला तिच्या बीएसएल3 रोगकारकांच्या हाताळणीची क्षमता लक्षात घेऊन त्या आधारावर प्री-क्लिनिकल प्रयोगशाळा म्हणून निवडले आहे. जगभरातील ही अशा प्रकारची 9 वी आणि आशियातील पहिलीच प्रयोगशाळा आहे. इतर प्रयोगशाळा अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया येथे उभारण्यात आल्या आहेत. प्रयोगात्मक प्राणीजन्य सुविधा ही, लहान आकाराच्या प्राण्यांसाठीची देशातील सर्वात मोठी सुविधा असून त्यात सुमारे 75,000 उंदीर ठेवण्याची सोय आहे.
डॉ.जितेंद्र सिंह यांनी “जेनेटिकली डिफाईन्ड ह्युमन असोसिएटेड मायक्रोबियल कल्चर कलेक्शन (जीई-एचयुएमआयसी) फॅसिलिटी” चे देखील उद्घाटन केले. संशोधन संस्था, विद्यापीठे आणि उद्योगांना संशोधन आणि विकासासाठी सूक्ष्मजीवांचे कल्चर पुरवण्यासाठीचा “राखीव कोष” म्हणून ह्या सुविधेचा वापर होणार आहे. ही सुविधा शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि विविध उद्योग यांच्यातील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सहयोगी संबंधांची जोपासना करणारे नोडल संसाधन केंद्र म्हणून कार्य करेल. तसेच देशातील संशोधकांच्या वापरासाठी (क्रायोप्रिझर्व्ह्ड भ्रूण आणि शुक्राणू यांच्यासह) जनुकीयदृष्ट्या विशेष वैशिष्ट्ये असणाऱ्या विशिष्ट रोगजनक मुक्त प्राण्यांचा कोष म्हणून देखील कार्य करेल.
“ट्रान्सलेशनल आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या (टीएचएसटीआय)” ही केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील जैवतंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील जैवतंत्रज्ञान संशोधन आणि नवोन्मेष संस्था असून या संस्थेने निपाह विषाणू, एन्फ़्लुएन्झा आणि श्वसनसंस्थेशी संबंधित इतर विषाणूंवरील लसींचे विकसन आणि संशोधनासाठी खासगी क्षेत्राशी डझनभराहून अधिक करार आणि सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ही संस्था देशातील अभिनव आणि अत्याधुनिक मुलभूत संशोधन सुलभ करेल आणि औषधे तसेच लसीसाठीच्या ट्रान्सलेशनल संशोधनाला पाठबळ पुरवेल, आजाराच्या प्रसाराचे/पृथक्करणाचे बायोमार्कर्स निश्चित करेल आणि उद्योग तसेच शिक्षण क्षेत्राच्या संपर्कातून विविध विद्याशाखा आणि व्यवसायांशी संशोधन विषयक सहयोगी संबंधांना प्रोत्साहन देईल.
डीबीटीमधील लसीचा विकास आणि संशोधन कार्यावर अधिक भर देत डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले, “प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा क्षेत्रात आघाडीचा देश म्हणून भारताला ओळख मिळाली आहे.”
यावेळी केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी सध्याच्या काळातील आरोग्यविषयक समस्यांनी उभ्या केलेल्या आव्हानांची माहिती सामायिक केली.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2033720)
Visitor Counter : 68