नागरी उड्डाण मंत्रालय

भारताने देशांतर्गत एमआरओ उद्योगाला चालना देण्यासाठी विमानाच्या भागांवर एकसमान 5% आयजीएसटी केला लागू


"2030 पर्यंत 4 अब्ज डॉलर एमआरओ उद्योगासह आघाडीचे विमान वाहतूक केंद्र बनण्याचे भारताचे उद्दिष्ट"- केंद्रीय मंत्री राममोहन नायडू"

Posted On: 15 JUL 2024 9:52PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 15 जुलै 2024


केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी आज 15 जुलै 2024 पासून सर्व विमान आणि विमान  इंजिनांच्या  भागांवर 5% एकसमान एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी) दर लागू करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय देशांतर्गत देखभाल, दुरुस्ती (एमआरओ) उद्योगातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून त्याचा उद्देश भारताला जागतिक  विमानवाहतूक  केंद्र बनवणे हा आहे.

"एमआरओ वस्तूंवर एकसमान 5% आयजीएसटी दर लागू करणे ही विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक मोठी चालना असल्याचे या घडामोडींबाबत माहिती देताना  नायडू यांनी सांगितले. पूर्वी, विमानांच्या घटकांवरील 5%, 12%, 18% आणि 28 अशा विभिन्न वस्तू आणि सेवा कराच्या दरांमुळे कर रचनेतली भिन्नता,एमआरओ खात्यांमध्ये जीएसटी संचय  यासह आव्हानात्मक परिस्थिती होती. हे नवीन धोरण ही असमानता दूर करते, कर संरचना सुलभ करते आणि एमआरओ क्षेत्रामध्ये वाढीस चालना देते."

तसेच हा बदल शक्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाच्या भूमिकेवर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. "पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही आत्मनिर्भर भारत उपक्रमासाठी वचनबद्ध आहोत. हे धोरण पुढे नेताना भारताला अग्रगण्य विमानवाहतूक  केंद्रात परिवर्तित करण्यात त्यांनी दिलेला पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरला आहे," असेही त्यांनी नमूद केले.

परिचालन खर्च, कर क्रेडिट समस्येचे निराकरण आणि गुंतवणूक आकर्षित करण्याच्या हेतूने एकसमान 5% आयजीएसटी लागू करण्याबाबत 22 जून 2024 रोजी जीएसटी परिषदेने 53 व्या बैठकीत शिफारस केलेले हे धोरण समायोजन साध्य करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या नागरी विमान वाहतूक मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि इतर हितधारकांच्या प्रयत्नांची केंद्रीय मंत्र्यांनी प्रशंसा केली.

भविष्यातील संधींवर प्रकाश टाकताना राममोहन नायडू म्हणाले, "भारताला एक आघाडीचे विमानवाहतूक  केंद्र बनवण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. भारतीय एमआरओ उद्योग 2030 पर्यंत 4 अब्ज डॉलरचा उद्योग होण्याचा अंदाज आहे. हा धोरणातील बदल म्हणजे एमआरओ सेवांसाठी एक बळकट परिसंस्था, अभिनवता आणि शाश्वत वाढीची खातरजमा करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे."

या बदलामुळे भारतीय एमआरओ क्षेत्राची स्पर्धात्मकता लक्षणीयरीत्या वाढेल, नवोन्मेष आणि कार्यक्षमतेला चालना मिळेल आणि एक मजबूत आणि कार्यक्षम विमान वाहतूक क्षेत्र निर्माण होईल असा मंत्रालयाला विश्वास वाटतो.

 
 
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2033529) Visitor Counter : 87