उपराष्ट्रपती कार्यालय

विकसित भारताची संकल्पना हे केवळ एक लक्ष्य नव्हे तर ते एक पवित्र अभियान आहे – उपराष्ट्रपती


हे भारताचे शतक आहे; भारतातील राजकीय आव्हाने त्याचा उदय रोखू शकत नाहीत – उपराष्ट्रपती धनखड

भारताच्या विकासगाथेविषयीची आणि आपल्या संस्थांना कलंकित करणाऱ्या विकृत कथनांचा जोरकसपणे प्रतिकार करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

युवकांनी स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत पारंपरिक पद्धतीने लक्ष केंद्रित करण्यापलीकडे जाऊन विचार करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

मुंबई येथील नरसी मोनजी व्यवस्थापन अभ्यास संस्थेतील (एनएमआयएमएस) विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींनी केले संबोधित

Posted On: 12 JUL 2024 4:57PM by PIB Mumbai

 

मुंबई 12 जुलै 2024

विकसित भारत @2047 हे केवळ एक लक्ष्य नसून ते एक पवित्र अभियान आहे असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सांगितले. हे दशक भारताचे दशक आहे असे ठाम प्रतिपादन करत प्रत्येक नागरिक, प्रत्येक संस्था आणि आपल्या समाजातील प्रत्येक घटकानेया अभियानात अधिकाधिक योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मुंबई येथील एनएमआयएमएस अर्थात नरसी मोनजी व्यवस्थापन अभ्यास संस्थेतील विद्यार्थी तसेच शिक्षक वर्गाला संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी, सकारात्मक प्रशासकीय उपक्रमांचा परिणाम म्हणून भारताच्या व्यवसाय परिसंस्थेमध्ये फार मोठा बदल घडून आला आहे आणि आता भारताला गुंतवणुकीसाठी तसेच विविध संधींसाठी अधिक आवडते स्थान म्हणून पसंती मिळते आहे ही बाब अधोरेखित केली.

उपराष्ट्रपती धनखड यांनी भारताच्या राजकीय प्रवासाची तुलना एखाद्या रॉकेटच्या भरारीशी करत अधूनमधून आव्हानांचा सामना करावा लागला तरी देशाने दाखवलेली लवचिकता आणि प्रगतीवर अधिक भर दिला. ते म्हणाले की ज्या प्रमाणे आकाशातील एअर पॉकेट्स विमानाची झेप किंवा गंतव्यस्थान बदलू शकत नाहीत त्याच पद्धतीने भारतातील राजकीय आव्हाने भारताचा उदय होण्यापासून थांबवू शकत नाहीत. देशाच्या लक्षणीय प्रगतीचा ठळक उल्लेख करत उपराष्ट्रपती धनखड यांनी दशकभरापूर्वी हा प्रवास सुरु करताना कराव्या लागलेल्या प्रयत्नांवर अधिक भर दिला. ते म्हणाले, “माझ्यावर विश्वास ठेवा, ज्याप्रमाणे एखादे रॉकेट गुरुत्वाकर्षण बलाच्या बाहेर मुसंडी मारते त्याचप्रमाणे येत्या 5 वर्षांत भारताचा उदय झालेला दिसेल.

देशाच्या प्रगतीची बदनामी करणाऱ्या आणि देशाला कलंकित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अपायकारक समूहांसह दुष्ट शक्तींच्या अस्तित्वाचा ठळक उल्लेख करत उपराष्ट्रपतींनी आपल्या संस्थांना आणि विकासाच्या उज्ज्वल प्रवासाला कलंकित करणाऱ्या नकारात्मक कथनांचा जोरकसपणे प्रतिकार करण्याचे आवाहन देशातील युवकांना केले.

कलम 370 रद्द करण्यासंदर्भात बोलताना, उपराष्ट्रपतींनी 1963 मध्ये संसदेत झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. ते म्हणाले की या चर्चेच्या वेळी या कलमाच्या तात्पुरत्या स्वरूपाचे वर्णन करत तत्कालीन पंतप्रधान म्हणाले होते की काळासोबत कलम 370 देखील मागे पडेल. वर्ष 2019 मध्ये कलम 370 रद्द करण्याची निर्णायक कृती केल्याबद्दल संसद सदस्यांचे आभार मानले.

उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला आणि वल्लभी या भारतातील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. या प्राचीन विद्यापीठांनी भारताला ज्ञानाचे केंद्र बनवले असून या विद्यापीठांमुळे भारताचे मुत्सद्दी कौशल्य प्रभुत्व लक्षणीयरीत्या वाढले आहे तसेच व्यापाराच्या दिशांना आकार दिला आहे, यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला. या राष्ट्रीय विकास आणि सक्षमीकरणामध्ये ऐतिहासिक शिक्षण केंद्रांच्या वारशातून मिळालेल्या उच्च शिक्षणाची महत्त्वपूर्ण प्रासंगिकताही त्यांनी अधोरेखित केली.

शिक्षणाच्या परिवर्तनीय सामर्थ्यावर प्रकाश टाकताना धनखड यांनी शिक्षणाचे एक प्रेरक शक्ती असे वर्णन केले. ही शक्ती व्यक्तींना सक्षम बनवते, नवोन्मेषाची जोपासना करते आणि आर्थिक विकासाला चालना देते, तसेच सामाजिक आणि राष्ट्रीय प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते, असेही त्यांनी सांगितले.

उपराष्ट्रपतींनी यावेळी तरुणांना पारंपरिक विचारसरणीपासून मुक्त होऊन आज उपलब्ध असलेल्या विस्तृत संधींचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. नेहमीप्रमाणे स्पर्धा परीक्षांवर भर देण्याच्या पलीकडे जाऊन विविध क्षेत्रात उदयास येत असलेल्या नवीन, अपारंपरिक संधींचा शोध घेण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. त्याबरोबरच, प्रत्येकाला क्षितिजाच्या पलीकडे पाहण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, हरित हायड्रोजन मिशन यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधील अफाट क्षमता ओळखण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले.

उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, राज्यसभेतील खासदार प्रफुल्ल पटेल, एनएमआयएमएस चे कुलगुरू अमरिशभाई रसिकलाल पटेल, एनएमआयएमएस चे उपकुलगुरू  डॉ. रमेश भटएनएमआयएमएसचे प्र-कुलगुरू डॉ.शरद म्हैसकर, यांच्यासह या संस्थेतील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***

JPS/SC/SM/PK

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2032779) Visitor Counter : 59