वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत-कतार संयुक्त कृती गटाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतीय शिष्टमंडळाची दोहा भेट


मौल्यवान खडे आणि दागिने, औषधे, एमएसएमईज तसेच अन्न प्रक्रिया यांना सहकार्यासाठीची संभाव्य क्षेत्रे म्हणून मान्यता

Posted On: 12 JUL 2024 1:26PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 12 जुलै 2024

केंद्रीय वाणिज्य तसेच इतर मंत्रालये आणि संस्थांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या भारतीय शिष्टमंडळाने 10 जुलै 2024 रोजी दोहा येथे कतारच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त कृती गटाच्या (जेडब्ल्यूजी) बैठकीत भाग घेतला.

दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत, व्यापार तसेच वस्तूंवरील सीमा शुल्क विषयक नियंत्रणात सुलभता आणण्यासाठी आगमन-पूर्व माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अन्न सुरक्षा तसेच सहकार्यविषयक सामंजस्य कराराबाबत सध्या सुरु असलेल्या चर्चेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि ही चर्चा वेगाने संपवण्याबाबत सहमती व्यक्त केली. द्विपक्षीय व्यापारात अडथळे आणणाऱ्या सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करुन या दोन्ही देशांच्या दरम्यान व्यापाराला  प्रोत्साहन देण्याचे कार्य अधिक सुलभतेने करण्याला दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी  संमती दिली.

खासगी क्षेत्राच्या परिकल्पना तसेच व्यापार आणि गुंतवणुकविषयक सहकार्य यांचा पाठपुरावा करून त्यांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने संयुक्त व्यापार मंडळाला नेमून दिलेली भूमिका बजावण्याबाबत मंडळाला सक्रीय करण्यासाठीच्या संभाव्य यंत्रणेबाबत दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी विचार विनिमय केला.

दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी यावेळी द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्य या क्षेत्रातील अलीकडच्या काळात झालेल्या घडामोडींचा तपशीलवार आढावा घेतला आणि आपल्या दोन्ही देशांमध्ये  हे नाते आणखी दृढ करण्याची प्रचंड क्षमता आहे याची नोंद घेतली.  यासाठी दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी द्विपक्षीय व्यापार तसेच परस्पर लाभदायक सहकार्य क्षेत्रांमध्ये अधिक वाढ करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याची विविध क्षेत्रे निश्चित केली. यामध्ये मौल्यवान खडे आणि दागिने, सीमाशुल्क अधिकाऱ्यांमध्ये सहकार्य, स्थानिक चलनात व्यापार, औषधे, अन्न प्रक्रिया आणि अन्न सुरक्षा, एमएसएमई क्षेत्रात सहकार्य इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे.

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागातील आर्थिक सल्लागार प्रिया नायर आणि कतारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील आंतरराष्ट्रीय सहकार्य तसेच व्यापार विषयक करार विभागाचे संचालक सलेह अल-माना यांनी या जेडब्ल्यूजी बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले.

वर्ष 2023-24 मध्ये भारत आणि कतार यांच्या दरम्यान 14.08 अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार झाला. भारत हा कतारचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारविषयक भागीदार आहे. जेडब्ल्यूजीची पुढील बैठक वर्ष 2025 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले. भारत-कतार जेडब्ल्यूजी च्या पहिल्या सत्रात अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या चर्चेतून या दोन्ही देशांमध्ये असलेल्या मैत्रीपूर्ण आणि विशेष नात्याचे दर्शन घडले.

***

Jaydevi.PS/S.Chitnis/P.Kor

 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2032725) Visitor Counter : 32