दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
पीएलआय योजनेंतर्गत दूरसंचार उपकरण निर्मितीने 50,000 कोटी रुपयांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला
Posted On:
10 JUL 2024 9:02AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 10 जुलै 2024
भारताला प्रत्येक क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरत, दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांसाठीच्या तसेच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या मोठ्या प्रमाणातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठीच्या पीएलआय अर्थात उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे देशातील उत्पादन, रोजगार निर्मिती, आर्थिक विकास आणि निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
दूरसंचार विभागासाठी पीएलआय लागू केल्यापासूनच्या तीन वर्षांच्या कालावधीत, या योजनेने 3,400 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली असून, दूरसंचार संबंधी उपकरण उत्पादनाने 50,000 कोटी रुपयांचा महत्त्वाचा टप्पा पार केला असून या साहित्याची एकूण निर्यात अंदाजे 10,500 कोटी रुपयांवर पोहोचली आहे आणि त्यातून 17,800 प्रत्यक्ष तर कितीतरी अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती झाली आहे.
हा महत्त्वाचा टप्पा, स्थानिक पातळीवरील उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे झालेली भारतातील दूरसंचार संबंधी उपकरण निर्मिती उद्योगाची सशक्त वाढ आणि स्पर्धात्मकता अधोरेखित करतो. भारतातील स्थानिक निर्मिती क्षमतांमध्ये वाढ करणे आणि देशाला दूरसंचारसंबंधी साधनांच्या उत्पादनासाठीच्या जागतिक केंद्राच्या रुपात आकाराला आणणे हे पीएलआय योजनेचे उद्देश आहेत. ही योजना उत्पादकांना भारतात निर्मित उत्पादनांच्या वाढीव विक्रीवर आधारित आर्थिक मदत देखील देते.
इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या मोठ्या प्रमाणातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठीच्या पीएलआय योजनेत मोबाईल फोन आणि त्यांच्या सुट्या भागांच्या निर्मितीचा समावेश आहे. या पीएलआय योजनेमुळे भारतात मोबाईल फोनची निर्मिती आणि त्यांची निर्यात या दोन्ही घटकांमध्ये मोठी वाढ झाली आहे.वर्ष 2014-15 मध्ये भारत मोबाईल फोन्सचा मोठा आयातदार देश होता आणि त्यावेळी देशात केवळ 5.8 कोटी मोबाईल फोनचे उत्पादन झाले होते तर 21 कोटी मोबाईल फोन आयात करण्यात आले होते. वर्ष 2023-24 मध्ये देशात 33 कोटी मोबाईल फोनचे उत्पादन झाले तर केवळ 0.3 कोटी मोबाईल फोन आयात करण्यात आले आणि सुमारे 5 कोटी मोबाईल फोनची देशातून निर्यात करण्यात आली.वर्ष 2014-15 मध्ये 1,556 कोटी रुपये मूल्याचे तर वर्ष 2017-18 मध्ये केवळ 1,367 कोटी रुपये मूल्याचे मोबाईल फोन निर्यात करण्यात आले होते. या निर्यात मूल्यात घसघशीत वाढ होऊन वर्ष 2023-24 मध्ये 1,28,982 कोटी रुपये मूल्याचे मोबाईल निर्यात करण्यात आले. तर वर्ष 2014-15 मध्ये देशात 48,609 कोटी रुपयांच्या मोबाईल फोनची आयात आली होती, आता 2023-24 मध्ये त्यात घसरण होऊन केवळ 7,665 कोटी रुपयांचे मोबाईल देशात आयात करण्यात आले.
कित्येक वर्षांपासून भारत दूरसंचार संबंधी साहित्याची आयात करत आला आहे, मात्र आता मेक-इन-इंडिया आणि पीएलआय योजनेमुळे त्यातील समतोल बदलला असून आता देशात 50.000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या उपकरणांचे उत्पादन होऊ लागले आहे.
***
SushmaK/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2032029)
Visitor Counter : 100