पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टी 20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघातील सदस्यांबरोबर साधलेला संवाद

Posted On: 05 JUL 2024 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जुलै 2024

 

पंतप्रधान: मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, तुम्ही विश्‍वचषक जिंकून आपल्या देशामध्ये उत्साहाचे  आणि उत्सवाचे वातावरण तयार केले आहे. आणि देशवासियांच्या सर्व आशा -आकांक्षांना तुम्ही जिंकले आहे. माझ्यावतीने तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! सर्वसाधारणपणे रात्री खूप उशीरपर्यंत मी कार्यालयामध्ये काम करीत असतो. विशेष म्हणजे यावेळी तर टी.व्हीसुद्धा सुरू होता आणि एकीकडे मी फायलीही पहात होतो. परंतु यावेळी त्या फायलींकडे माझे लक्ष केंद्रीत होत नव्हते. तुम्ही मंडळींनी आपल्यातील अतिशय उत्कृष्ट संघभावनेचे प्रदर्शन केले. आपल्यातील प्रतिभा दाखवली आणि तुमच्यामध्ये असलेले धैर्य स्पष्ट दिसून येत होते. मी सामना पहात होतो, तुमच्यामध्‍ये  ‘पेशन्स’  होता, अजिबात  गडबड नव्हती. पूर्ण आत्मविश्वास तुमच्यामध्ये होता. तुम्हा सर्वांचे माझ्यावतीने खूप-खूप अभिनंदन, मित्रांनो!!

राहुल द्रविड: सर्वात प्रथम तर  मी, आपले आभार मानू इच्छितो. तुम्ही आम्हाला  सर्वांना भेटण्याची संधी दिली. आणि ज्यावेळी नोव्हेंबरमध्ये अहमदाबाद इथल्या  सामन्यामध्ये पराजय पत्करावा लागल्यानंतरही तुम्ही तिथे आम्हाला भेटायला आलात, वास्तविक आमच्या दृष्टीने ती वेळ काही फारशी चांगली नव्हती. आज मात्र आम्हाला खूप आनंद आहे की, या विजयामुळे मिळत असलेल्या आनंदाच्या प्रसंगी आपण भेटत आहोत. मला फक्त आवर्जुन सांगायचे आहे की, रोहित आणि या सर्व मुलांनी खेळताना जी लढावू वृत्ती दाखवली, त्यांनी आता सर्व संपले आहे, अशा भावनेचा स्पर्शही संघाला होवू दिला नाही, ही गोष्ट अतिशय कौतुकास्पद आहे. अनेक सामन्यांमध्ये त्यांनी अशाच भावनेचे दर्शन दिले. त्यामुळे अंतिम सामन्यापर्यंत पोहोचल्यानंतरही या सर्व मुलांनी दाखवलेले कौशल्य खूप कौतुकास्पद आहे. सर्व मुलांनी खूप परिश्रम घेतले आहेत. आनंदाची मोठी गोष्ट अशी की, या मुलांकडून प्रेरणा घेतच नवीन युवा पिढीही पुढे येईल. नव्या पिढीला प्रेरणादायक वाटेल, असा खेळ या मुलांनी केला आहे. 2011 मध्ये जो विजय मिळाला होता, त्याला पाहून मोठी झालेली अनेक मुले आहेत. तसेच आजचा या मुलांचा खेळ पाहून अनेक मुलांना प्रेरणा मिळेल. मला खात्री आहे, आपल्या देशातल्या कोणत्याही खेळात -क्रीडा क्षेत्रात जावू इच्छिणा-या मुला-मुलींना अशाच प्रकारे  खूप मोठी प्रेरणा मिळेल. आम्हाला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देवू इच्छितो आणि या सर्व मुलांचे अभिनंदन करू इच्छितो.

पंतप्रधान: अभिनंदन तर तुम्हा सर्व मंडळींचे भाई !! आगामी काळामध्ये  देशातील नवयुवकांना तुम्ही मंडळीच खूप काही देवू शकता. देशाला विजय तर मिळवून दिला आहे,  त्याचबरोबर तुम्ही त्यांना खूप प्रोत्साहनही देवू शकता. प्रत्येक लहान- लहान गोष्टीमध्ये तुम्ही लोकांना मार्गदर्शन करू शकता. आणि यासाठी तुमच्याकडे तसा एक अधिकार आपोआपच प्राप्त झाला आहे. चहल, इतके गंभीर का आहे? मी बरोबर आहे ना? हरियाणाची कोणीही व्यक्ती असो, ती कसल्याही प्रसंगामध्ये आनंदी राहत असतात, प्रत्येक गोष्टींमध्ये आनंद शोधतात.

रोहित, या आनंदाच्या क्षणाच्या वेळी तुझ्या मनातल्या भावना काय होत्या, हे  मी जाणून घेवू इच्छितो. भूमि कोणतीही असो, माती कोणतीही असो मात्र क्रिकेटचे आयुष्य तर पिचवरच असते आणि तुम्ही लोकांनी क्रिकेट हेच आयुष्य म्हणून निवडले आहे. त्या पिचचे तुम्ही चुंबन घेतले. अशी गोष्ट कोणी हिंदुस्तानीच करू शकतात.

रोहित शर्मा: ज्या स्थानी आम्हाला तो विजय मिळाला, तिथला तो विजयाचा एकच क्षण असा असतो, तो कायम स्मरणात ठेवायचा असतो आणि तो क्षण आम्हाला जगायचा होता. बस्स! कारण त्या पिचवर आम्ही खेळलो, आणि  त्या पिचवर आम्ही जिंकलो! कारण आम्ही सर्व लोकांनी विजयी होणे, चषक मिळवणे या एकाच गोष्टीची खूप काळ वाट पाहिली होती, आम्ही खूप परिश्रम केले होते. अनेकवेळा विश्वचषक आमच्या अगदी खूप जवळ आला होता. परंतु आम्हीच त्याच्यापर्यंत पुढे पोहोचू शकलो नव्हतो. मात्र, यावेळी या सर्व लोकांमुळे आम्ही ती गोष्ट मिळवू शकलो. त्यामुळे ते पिच माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. त्या पिचवर आम्ही जे काही  केले, त्यावेळची ती उत्स्फूर्त कृती होती आणि माझ्याकडून झाली. आम्ही लोकांनी, संपूर्ण संघाने या विश्वचषकासाठी खूप परिश्रम केले होते  आणि आम्हा सर्वांच्या परिश्रमाचे फळ त्या दिवशी मिळाले.

पंतप्रधान: प्रत्येक देशवासियांच्या लक्षात आले असणार, मात्र रोहित, मला दोन गोष्टी अगदी टोकाच्या दिसल्या. यामध्ये मला भावना दिसत होत्या आणि ज्यावेळी तू विश्वचषक स्वीकारण्यासाठी जात होतास, त्यावेळी नृत्याची अॅक्शन करीत जात होतास.

रोहित शर्मा: सर, यामागे असे कारण होते की, तो क्षण आम्हा सर्वांसाठी खूप महत्वाचा, खूप मोठा होता. आम्ही सगळे लोक ही गोष्ट मिळवण्यासाठी इतके वर्ष वाट पहात होतो. त्यामुळे मला या सर्व मुलांनी सांगितलं होतं, की  चषक घेण्यासाठी असाच काही थेट चालत जावू नकोस, काही तरी वेगळे जरूर करावेस.

पंतप्रधान: ही चहल याची कल्पना होती का? 

रोहित शर्मा: चहल आणि कुलदीप ....

पंतप्रधान: अच्छा! (ऋषभ पंत यांना) तुमचा हा ‘रिकव्हरी’चा बरे होण्याचा प्रवास अवघड आहे. खेळाडू या नात्याने कदाचित जुनी, आधीची मौल्यवान गोष्ट तुम्ही पुढे केली. मात्र अशा वेळी एखाद्या व्यक्तीचे ‘रिकव्हरी’ होणे  महत्वाचे आहे.  कारण त्यावेळी तुम्ही अनेक ‘पोस्ट’ही केल्या होत्या. तुम्ही केलेल्या पोस्ट मी पाहत होतो. आज तुम्ही इतके केल्या, आज इतक्या केल्या, मला माझे सहकारी सांगत होते.

ऋषभ पंत: सर्वात आधी तर थँक्यू ! आज तुम्ही आम्हा सर्वांना इथे बोलावले. यामागे सर, एक साधारण विचार होता. कारण या एक-दीड वर्षाच्या आधी माझा अपघात झाला होता. त्यावेळी माझा खूप कठीण काळ सुरू होता. त्यावेळची एक गोष्ट मला चांगली स्मरणात आहे. कारण तुमचा फोन , माझ्या आईला आला होता. त्यावेळी माझ्या डोक्यात अनेक गोष्टींचे विचार एकाच वेळी येत होते . डोक्यात विचारांची प्रचंड गर्दी असायची. परंतु ज्यावेळी तुमचा कॉल आला, त्यावेळी आईने मला सांगितले की, ‘सर म्हणाले आहेत, काही समस्या येणार नाही. त्यानंतर मला मानसिक दृष्ट्या खूप बरे, मोकळे वाटायला लागले. त्यानंतर मग ज्यावेळी मी बरा होत होतो, त्यावेळी कोणीतरी काही बोललेले माझ्या कानावर पडायचे. सर,  कुणी म्हणायचे, आता मी कधीच पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही. असेही बोलायचे. मला विशेषतः विकेट किपींगसाठी काहीजण बोलत होते. अरे बॅटिंग तर कसेही तो करू शकेल, बॅटिंग करेल परंतु विकेट-किपिंग करेल की नाही माहिती नाही. त्यामुळे गेल्या दीड-दोन वर्षात सर, हाच विचार सारखा डोक्यात होता की, आपण पुन्हा मैदानात आल्यानंतर पूर्वीपेक्षा अधिक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतर कुणासाठी नाही तर आपणच आपल्याला सिद्ध करायचे आहे. मैदानात स्वतःला समर्पित केले पाहिजे इतकेच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे आहे आणि भारताला मिळालेला विजयही पहायचा आहे.

पंतप्रधान: ऋषभ जेव्हा तू अपघातातून बरा होत होतास तेव्हा तुझ्या आईला मी दोन गोष्टी सांगितल्या होत्या, एक तर मी प्रथम डॉक्टरांशी चर्चा केली होती. मी डॉक्टरांचे मत विचारले तेव्हा मी म्हणालो, जर तुम्हाला त्याला बाहेर न्यायचे असेल तर मला कळवा.  म्हटलं आम्ही काळजी घेऊ. पण मला आश्चर्य वाटले, तुमच्या आईच्या हातावर विश्वास होता.  तिच्याशी बोलत असताना असं वाटत होतं की मी तिला ओळखत नाही, तिला कधी भेटलोही नाही, पण ती मला आश्वासन देत होती. हे विस्मयकारक होते जी! त्यामुळे मला असे वाटले की ज्याला अशी आई मिळाली आहे तो कधीच अयशस्वी होणार नाही.

हा विचार त्याच क्षणी माझ्या मनात आला होता जी! आणि तुम्ही ते करुन दाखवले आहे.  आणि सगळ्यात मोठी गोष्ट  मला जाणवली जेव्हा मी तुमच्याशी बोललो…तुम्ही म्हणालात….यात कुणाचाही दोष नाही, ही माझी चूक आहे.  ही खूप मोठी गोष्ट आहे जी, नाहीतर कुणीही काहीतरी सबब सांगितली असती, खड्डा होता, अमकं होतं…. तमकं होतं…;  तुम्ही तसे केले नाही. ही माझी चूक होती असं कबूल केलं…कदाचित जीवनाप्रती तुमचे मन अगदी मोकळे स्वच्छ  असेल आणि मी छोट्या छोट्या गोष्टींचे निरीक्षण करतो आणि मित्रांकडून आणि सर्वांकडून शिकतो. म्हणून मी तुम्हाला खरे सांगतो, तुमचे जीवन, सामान्यतः देशाचा संयम आणि विशेषतः खेळाडू, हा एक मजबूत दैवी संबंध आहे.  आणि मला माहीत आहे की यष्टिरक्षकांना प्रशिक्षण देणे किती कठीण असते. ते तास न तास अंगठा धरून उभे असतात.  पण आता तुम्ही ती लढाई तर जिंकली आहे तुम्ही हे खूप चांगले काम केले आहे. तुमचं अभिनंदन!

ऋषभ पंत:- धन्यवाद सर!

पंतप्रधान: जीवनात चढ-उतार येत असतात, पण केलेली दीर्घ तपश्चर्या वेळेत उपयोगी पडते.  खेळात तुम्ही केलेली तपश्चर्या गरजेनुसार फळली आहे.  विराट, मला सांगा, यावेळी तुमचा लढा चढ-उतारांनी भरलेला होता.

विराट कोहली: सर्वप्रथम, आम्हा सर्वांना इथे आमंत्रित केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.  आणि हा दिवस माझ्या मनात नेहमी खूपच कायम स्मरणात राहील.  कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये मला जे योगदान द्यायचे होते ते मी नाही देऊ शकलो आणि एक वेळ  मी राहुलभाईंना असेही सांगितले की मी अजून पर्यंत तरी तुम्हाला आणि संघाला न्याय दिलेला नाही.  तेव्हा ते मला म्हणाले की जेव्हा वेळेची गरज असेल तेव्हा तू चांगली कामगिरी करशील याची मला खात्री आहे.  तर आमचा हा असा संवाद झाला आणि जेव्हा आम्ही खेळायला गेलो तेव्हा मी प्रथम रोहितला सांगितले कारण मला स्पर्धा तोपर्यंत चांगली गेली नव्हती, त्यामुळे  मला एवढा आत्मविश्वास नव्हता की मला जशी खेळी करायची आहे तशी होईल की नाही! तर मी जेव्हा खेळायला उतरलो तेव्हा पहिल्या चार चेंडूत तीन चौकार मारले, म्हणून मी गेलो आणि त्याला म्हणालो, मित्रा, हा काय खेळ आहे, एक दिवस असे वाटते की एकही धाव होणार नाही आणि मग एक दिवस तुम्ही मैदानात उतरता आणि सर्व काही मनासारखे घडू लागते.  त्यामुळे तिथे मला असे जाणवले आणि विशेषत: जेव्हा आमचा एक गडी बाद झाला, तेव्हा मला त्या परिस्थितीनुसार सावधपणे खेळावे लागेल याची जाणीव झाली.  यावेळी, मी फक्त संघासाठी काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रीत केले आणि मला असे वाटले की मला त्या स्थितीमध्ये ठेवले गेले आहे, आता मला तसे का ठेवले गेले हे स्पष्ट करणे कठीण आहे. पण त्या क्षणी मला पूर्णपणे जखडून पडल्यासारखं वाटत होतं.  आणि नंतर माझ्या लक्षात आले की जे काही व्हायचे असते ते कसेही घडतेच!तर हे माझ्यासोबत, संघासोबत व्हायचेच होते.  जर तुम्ही सामना बघितला असेल तर पहा…. आम्ही शेवटी ज्या प्रकारे सामना जिंकलो, तिथे जी परिस्थिती होती, आम्ही एक एक चेंडू जगलो,आणि शेवटी सामना जसा फिरला तसा तेव्हा आमच्या आत काय चालले होते ते आम्हाला सांगताच येणार नाही. एका एका चेडूगणिक  सामना कधी या बाजुला, कधी त्या बाजुला झुकत होता!   एका क्षणी सर्व आशा संपुष्टात आल्या होत्या, त्यानंतर हार्दिकने गडी टिपला.  त्यानंतर, प्रत्येक चेंडू गणिक, ती ऊर्जा ती आशा पुन्हा निर्माण झाली.  तर याचा मला आनंद वाटतो की माझ्या कठीण काळानंतर  संघासाठी मी इतक्या महत्त्वाच्या दिवशी योगदान देऊ शकलो  आणि तो संपूर्ण दिवस ज्या प्रकारे गेला आणि आम्ही ज्या प्रकारे जिंकलो, मी म्हटल्याप्रमाणे, मी माझ्या आयुष्यात ते कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे मला बस याचाच आनंद झाला की मी संघाला अशा परिस्थितीत नेऊन पोहोचवू शकलो जिथून आम्ही खेळ जिंकण्याचा प्रयत्न करू शकतो अशी स्थिती संघासाठी तयार झाली.

पंतप्रधान: सर्वांना वाटत होते विराट…. कारण अंतिम सामन्यापर्यंत तुमच्या एकूण धावा 75 होत्या आणि नंतर एकदम एकाच सामन्यात तुम्ही 76 धावा ठोकल्या, तर असे प्रसंग क्वचित येतात जी! सगळे म्हणत असतात की मित्रा तू हे करशीलच.  एक प्रकारे, ती एक प्रेरक शक्ती देखील बनते.  पण या स्पर्धेतील आधीच्या  सामन्यांमध्ये एकूण 75 धावांवरच गाडी अडली असताना कुटुंबाकडून लगेच काय प्रतिक्रिया आली असेल?

विराट कोहली: एक चांगली गोष्ट अशी होती सर, की इथे आणि भारतातील वेळेमध्ये फरक जास्त होता त्यामुळे मी माझ्या घरच्यांशी जास्त बोलू शकलो नाही… आई जास्त ताण घेते.  पण एकच होतं की मी जे काही करण्याचा प्रयत्न करत होतो, ते होत नव्हते.  तेव्हा मला असे वाटले की जेव्हा आपण आपल्या बाजूने खूप प्रयत्न करतो, मी ते करेन असे आपल्याला वाटते, मग कुठेतरी फाजील आत्मविश्वास-अहंकार आड येतो आणि मग खेळ आपल्या पासून दुरावतो.  त्यामुळे तोच सोडण्याची गरज होती आणि मी म्हटल्याप्रमाणे खेळाची परिस्थितीच अशी निर्माण झाली की माझ्या फाजील आत्मविश्वासाला डोकं वर काढायला जागाच उरली नाही.  संघासाठी ते मागे सोडावे लागले.  आणि मग पुन्हा खेळामध्ये, जेव्हा मी खेळाचा मान राखला तेव्हा त्या दिवशी खेळानेही माझा मान राखला, म्हणून मला हा अनुभव आला सर.

पंतप्रधान: तुमचे खूप खूप अभिनंदन.

पंतप्रधान: पा जी

जसप्रीत बुमराह: नाही सर, जेव्हा मी भारतासाठी गोलंदाजी करतो तेव्हा मी अत्यंत निर्णायक टप्प्यांवर गोलंदाजी करतो, मग तो नवीन चेंडू असो किंवा….

पंतप्रधान : इडली खाऊन उतरता काय मैदानात?

जसप्रीत बुमराह: नाही, नाही, जेव्हा जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हा मला त्या परिस्थितीत गोलंदाजी करावी लागते. त्यामुळे मला खूप चांगले वाटते की जेव्हा मी संघाला मदत करू शकतो आणि कोणत्याही कठीण परिस्थितीतून सामना जिंकून देऊ शकतो, तेव्हा मला खूप आत्मविश्वास मिळतो आणि मी पुढच्या वाटचालीतही तो आत्मविश्वास बाळगतो.  आणि विशेषत: या स्पर्धेत अशी वेळ खूपदा आली की  मला धावगतीचं समीकरण कठीण असताना षटके टाकायची होती आणि अशा परिस्थितीतही मी संघाला मदत करू शकलो आणि सामना जिंकून देऊ शकलो.

पंतप्रधान: मी जेवढं क्रिकेट पाहिलं आहे, त्यावरून नेहमी असं वाटतं की 90 नंतर कितीही विजयाची मनस्थिती असली तरी, आणि सगळे नीट असले तरीही फलंदाज 90 नंतर थोडा गंभीर होतो. मग शेवटचे षटक असेल, विजय-पराजय एका चेंडूवर अवलंबून असेल, तर किती मोठा ताण असणार. अशा परिस्थितीत, अशा वेळी तुम्ही स्वतःला कसे सावरता? जसप्रीत बुमराह: जर मला वाटत असेल की मी हरेन किंवा मला सामन्यात काहीतरी जास्त करावे लागेल, तर मी चूक करू शकतो, घाबरून जाऊ शकतो, गर्दीकडे पाहिले किंवा घाबरून इतर लोकांकडे बघू लागल तर कदाचित माझ्याकडून चूक होऊ शकते. मग अशा वेळी मी लक्ष केंद्रित करतो, स्वतःबद्दल विचार करतो की मी काय करू शकतो. आणि जेव्हा मी यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे, तेव्हा मी संघाला मदत करण्यासाठी काय केले, हे आठवतो. त्यामुळे मी चांगले दिवस आठवण्याचा प्रयत्न करतो, की मी कशाप्रकारे संघाला मदत केली होती. मी अशा सर्व गोष्टी आठवतो आणि माझ्याकडून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो.

पंतप्रधान: पण हा खूपच ताण असेल मित्रा, पराठ्यांशिवाय तर दिवस जात नाही.

जसप्रीत बुमराह: नाही सर, वेस्ट इंडिजमध्ये इडली-पराठे काही मिळत नव्हते. जे मिळेल ते चालवून घेत होतो आम्ही. पण तो एक अतिशय चांगला अनुभव होता, खूपच चांगला होता. आम्ही सतत प्रवास करत होतो आणि एक संघ म्हणून स्पर्धा खूप चांगली झाली. पहिल्यांदाच विश्वचषक जिंकलो. इतक्या भावना अनुभवल्या नव्हत्या, त्यामुळे माझ्या मनात खूप अभिमानाची भावना आहे आणि यापेक्षा चांगले मला आधी कधीच वाटले नव्हते.

पंतप्रधान: तुम्ही खूप चांगले काम केले आहे, देशाला तुमचा अभिमान वाटतो, खरोखरच तुमचा अभिमान वाटतो.

पंतप्रधान: होय, हार्दिक, मला सांगा.

हार्दिक पांड्या: सर्वप्रथम सर, आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद आणि मी सांगू इच्छितो की मी मुलाखतीच्या वेळी जे काही बोललो ते मी बोललो कारण हे सहा महिने माझ्यासाठी खूपच रंजक होते, या काळात खूप चढ-उतार होते. मी मैदानावर गेलो आणि जनतेने हुर्यो केली आणि बऱ्याच गोष्टी घडल्या आणि मला नेहमीच विश्वास वाटत होता की जर मी उत्तर दिले तर मी ते खेळातूनच देईन, माझ्या शब्दांमधून कधीच नाही. आणि याचा अर्थ मी त्यावेळीही नि:शब्द होतो आणि आताही मी नि:शब्द आहे कारण जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपला नेहमी संघर्ष सुरू असतो. मला जीवनात नेहमी विश्वास वाटत असे की तुम्ही तुमचे युद्ध लढत राहा आणि मैदान सोडू नका कारण तेच कठीण काळ दाखवते आणि यशसुद्धा तेच दाखवते. त्यामुळे विश्वास होता की सर ठाम राहू, मेहनत करू आणि तुम्हाला सांगू का, संपूर्ण संघ, खेळाडू, कर्णधार प्रशिक्षक यांचा पाठिंबा खूप चांगला होता. आणि फक्त तयारी केली, तयारी केली आणि तुम्हाला सांगतो, देवाने असे नशीब दिले की मला शेवटच्या षटकात संधी मिळाली.

पंतप्रधान: नाही, तो ओव्हर तुमच्यासाठी ऐतिहासिक होता, पण तुम्ही सूर्याला काय सांगितले?

हार्दिक पांड्या: जेव्हा सूर्याने झेल घेतला तेव्हा आमची पहिली प्रतिक्रिया होती, आम्ही सर्वांनी आनंद साजरा केला. मग माझ्या लक्षात आले की मी सूर्याला विचारले पाहिजे की सूर्या ठीक आहे ना.. त्यामुळे आधी खातरजमा केली की भाऊ, आपण आनंद तर साजरा केला आहे, पण.. तो नाही-नाही म्हणाला. खेळ फिरवणारा झेल त्याने घेतला, जिथे आम्ही तणावात होतो, ते आम्ही सर्वजण खूप आनंदी झालो.

पंतप्रधान: काय म्हणता सूर्या...

सूर्यकुमार यादव: मी तर हरवून गेलो सर! सर, त्या क्षणी एकच विचार होता की मी काहीही केले तरी चेंडू पकडेन. पकडता येईल की नाही याची मला कल्पना नव्हती. मी चेंडू आत ढकलणार असे वाटले होते. एक धाव असो, दोन धावा असो, जास्तीत जास्त कारण वाराही तसाच वाहत होता. आणि एकदा चेंडू माझ्या हातात आला तेव्हा तो उचलून पलीकडे फेकून देईन, असे वाटले होते, तेव्हा मला दिसले कि रोहित पण त्या वेळी खूप दूर होता. आणि मग मी तो चेंडू उडवला आणि माझ्याच हातात आला. पण आम्ही याचा खूप सराव केला आहे.

मला एक गोष्ट मला नेहमी वाटत असे की मी नेहमी फलंदाजी करतो, पण षटके संपल्यानंतर मी संघासाठी आणखी काय योगदान देऊ शकतो, मग ते क्षेत्ररक्षण असो किंवा आणखी काही. 

पंतप्रधान : अशा प्रकारे पुन्हा पुन्हा आदळणारा चेंडू पकडण्याचा तुमचा सराव आहे का?

राहुल द्रविड: सूर्या खरेच सांगतो आहे, त्याने यापूर्वी सरावात असे 185, 160 झेल घेतले आहेत.

पंतप्रधान: होय? 

सूर्यकुमार यादव: एकूण सांगायचे म्हणजे सर, स्पर्धेच्या सुरुवातीपासून आणि त्यापूर्वी आयपीएल पासून मी असे बरेच झेल घेतले होते, पण अशा वेळी देव झेल घेण्याची अशी संधी देईल हे मला माहीत नव्हते, पण सराव होता. आधीच अशा झेलांचा सराव केला होता आणि त्यामुळे मी खूप शांत होतो आणि अशी परिस्थिती आधीही आली होती. पण तेव्हा स्टँड मध्ये कोणीच बसले नव्हते, पण या वेळी जरा जास्तच लोक बसले होते. पण त्या क्षणी खूप छान वाटलं...

राहुल द्रविड: सूर्या बरेच काही सांगत आहे, त्याने यापूर्वी सरावात असे 185, 160 झेल घेतले आहेत.

पंतप्रधान: होय?

सूर्यकुमार यादव: टोटल म्हणजे सर, मी जेव्हा टूर्नामेंटच्या सुरुवातीपासून आणि आयपीएलनंतर येत होतो, तेव्हा मी असे बरेच झेल घेतले होते, पण अशा वेळी देव अशी झेल घेण्याची संधी देईल हे मला माहीत नव्हते, पण माझ्याकडे होते. त्याने आधीच अशा झेलांचा सराव केला आहे आणि त्यामुळे तो खूप शांत होता आणि त्याला माहित होते की अशी परिस्थिती आधीही आली होती. पण मागे स्टँडवर कोणीच बसले नव्हते, त्यावेळी अजून काही लोक बसले होते. पण त्या क्षणी खूप छान वाटलं...

पंतप्रधान: मी तुम्हाला सांगतो की मी तुमची स्तुती केल्याशिवाय राहू शकत नाही… कारण एक तर, संपूर्ण देशाचा मूड… चढ-उतार खूपच तणावपूर्ण होते आणि त्यात संपूर्ण परिस्थिती बदलून टाकणारा तो प्रसंग… ही खूपच मोठी गोष्ट घडली आणि जर का हे तुमच्या आयुष्याशी संबंधित असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान व्यक्ती आहात…

सूर्यकुमार यादव: सर, शिरपेचात आणखी एक तुरा जोडला गेला आहे… मला छान वाटते आहे…

पंतप्रधान: तुमचे खूप खूप अभिनंदन!

सूर्यकुमार यादव: धन्यवाद सर!

पंतप्रधान: तुमच्या वडिलांच्या विधानाची देशभरात पुन्हा पुन्हा चर्चा होत आहे. त्यांना विचारले असता तुमच्या वडिलांनी अतिशय हृदयस्पर्शी उत्तर दिले… ते म्हणाले, हे बघा, आधी देश, नंतर मुलगा, ही फार मोठी गोष्ट आहे! हो अर्शदीप, मला सांगा... 

अर्शदीप सिंह: धन्यवाद सर , सर्वप्रथम तुम्ही आम्हाला तुम्हाला भेटण्याची संधी दिली त्याबद्दल आणि त्यानंतर क्रिकेट विषयी खूपच चांगल्या भावना आहेत सर... खूप छान वाटत आहे की ही स्पर्धा आम्ही जिंकलो आहोत आणि गोलंदाजीत मी आधी सांगितले तसे खूप छान वाटते जेव्हा जस्सी भाई खेळपट्टीच्या एका कडेला जाऊन चेंडू टाकतात. तर फलंदाजावर खूप जास्त दबाव कायम राखतात आणि फलंदाज मग माझ्या गोलंदाजीवर प्रयत्न करतात त्यामुळे मला भरपूर विकेट्स मिळतात आणि इतर गोलंदाजांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे. मी तर म्हणेन त्यांची फळे मला मिळत राहतात आणि तिथे खूप मजा येत होती, मला विकेट्स मिळत होत्या आणि याचे श्रेय सर्व संघाला दिले पाहिजे.

पंतप्रधान: अक्षर जेव्हा शाळेत खेळायचा तेव्हा बहुतेक एकदा मला त्याला पुरस्कार देण्याची संधी मिळाली होती.

अक्षर पटेल: 8वीत असताना…

पंतप्रधान: माझा स्वतःचा क्रीडाविश्वाशी संबंध आलेला नाही… पण क्रीडा विश्वात काहीही घडामोडी झाल्या की मग माझे मन सुद्धा त्यामध्ये गुंतू लागते.

अक्षर पटेल: त्या झेलामध्ये हेच होते की त्यांची भागीदारी बनलेली होती, पहिल्या षटकात विकेट पडली होती, त्यानंतर पडली नव्हती आणि जेव्हा कुलदीप चेंडू टाकत होता, तेव्हा मी ज्या बाजूला उभा होतो,त्याच बाजूला वारा वाहात होता, तर मी उभा होतो आणि त्याने जेव्हा फटका मारला तेव्हा मला वाटले की सहज झेल पकडता येईल पण तो वाऱ्याने इतका वेगाने जाऊ लागल्यावर पहिल्यांदा मी विचार करत होतो मी डाव्या हाताने पकडेन पण जेव्हा चेंडू गेला तेव्हा बोललो की हा तर उजव्या हाताच्या दिशेने येत आहे मग मी उडी मारली त्यावेळी आणि जेव्हा हातात इतक्या जोराने आवाज आला त्यावेळी मला जाणीव झाली की मी हातामध्ये चेंडू पकडला आहे आणि मला असे वाटते 10 पैकी 9 वेळा असे झेल सुटतात पण नशीबवान होतो की विश्वचषक स्पर्धेत यावेळी जेव्हा संघाला गरज होती तेव्हा तो झेल पकडला मी...   

पंतप्रधान: तर मग अमूलचे दूध काम करत आहे वाटतं?

(हशा उसळला)

कुलदीप यादव: खूप खूप आभारी आहे सर.

पंतप्रधान: कुलदीप म्हणू की देश दीप म्हणू?

कुलदीप यादव: सर सर्वात आधी तर देशाचाच आहे obviously सर… भारतासाठी सर्वच सामने चांगले वाटतात खेळायला, खूप मजा देखील येते आणि खूप अभिमान देखील वाटतो आणि संघात माझी भूमिका देखील तशीच आहे आक्रमक फिरकी गोलंदाजाची. त्यामुळे नेहमीच मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करतो त्यामुळे कर्णधार आणि प्रशिक्षकांची नेहमीच अशी योजना असते आणि माझी भूमिका देखील ही आहे की मधल्या षटकांमध्ये विकेट काढायच्या आणि जलदगती गोलंदाज चांगली सुरुवात देतात, एक दोन विकेट काढतात, थोडे सोपे होऊन जाते मधल्या षटकात गोलंदाजी करणे. त्यामुळे खूपच चांगले वाटते, खूप चांगल्या भावनांचा अनुभव येत आहे. तीन विश्वचषक खेळलो आहे आणि ही चांगली संधी होती. ट्रॉफी उचलली तर खूप आनंद होत आहे सर…

पंतप्रधान: तर मग कुलदीप तुझी कर्णधारालाच नाचायला लावायची हिंमत कशी काय झाली?

कुलदीप यादव: कर्णधाराला मी नाही नाचवले!

पंतप्रधान: अरे यावर ते ते नको का?

कुलदीप यादव: मी त्यांना म्हणालो होतो हे करा म्हणून... जेव्हा त्यांनी सांगितले की काही करत नाही, तेव्हा मी त्यांना सांगितले की हे करू शकता. पण मी जसे सांगितले तसे नाही केले त्यांनी...

पंतप्रधान: याचा अर्थ तक्रार आहे?

पंतप्रधान: 2007 मधील सर्वात लहान वयाचे खेळाडू आणि 2024 च्या विजयी संघाचे कर्णधार... यांचा अनुभव कशा प्रकारचा आहे?

रोहित शर्मा: सर खरं सांगू जेव्हा 2007 मध्ये मी पहिल्यांदा संघात आलो होतो आणि एक टूर आम्ही आयर्लंडमध्ये केली होती जिथे राहुल भाई कर्णधार होते. त्यानंतर आम्ही थेट दक्षिण आफ्रिकेला गेलो विश्व चषकासाठी. तर तिथे पहिल्यांदा विश्व चषक जिंकला. विश्वचषक जिंकल्यावर पहिल्यांदा भारतात आलो आम्ही तेव्हा संपूर्ण मुंबई रस्त्यात होती. आम्हाला विमानतळावरून वानखेडे स्टेडीयमवर जायला पाच तास लागले. तर 2-3 दिवसांनी मला जाणवले की विश्वचषक जिंकणे खूपच सोपे आहे. पण त्यानंतर विश्व चषक येत गेले, अनेकदा आम्ही जवळ पोहोचलो पण जिंकू शकलो नाही. या विश्वचषकात एक गोष्ट अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो की लोकांमध्ये खूपच desperation आणि खूप hunger होती जेव्हा आम्ही येथून West Indies ला गेलो… खूप अडचणी होत्या त्या तिथे जेव्हा आम्ही New York मध्ये पहिल्यांदा क्रिकेट होत होते, तिथे कधीच क्रिकेट झाले नव्हते, सराव करण्यासाठी मैदाने चांगली नव्हती. पण कोणत्याही मुलाचे त्या गोष्टीकडे लक्ष नव्हते, त्यांचे लक्ष केवळ एकाच गोष्टीवर होते की आपण बार्बाडोसमध्ये फायनल कसे खेळू? तर मग यामुळे म्हणजे अशा संघाचे कर्णधारपद भूषवण्यास देखील खूप चांगले वाटते की सर्वांचे लक्ष्य एकच आहे की कसे जिंकायचे आहे आणि जेव्हा आम्ही लोकांच्या चेहऱ्यावर इतके हसू आहे आणि लोक enjoy करत आहेत एकमेकांसोबत, रात्रभर रस्त्यावर फिरत आहेत भारताचा झेंडा घेऊन, तर मग खूप चांगले वाटते आणि आमचा हा जो ग्रुप आहे या ठिकाणी, आमचे aim देखील हेच आहे की आम्ही next generation ला कसे inspire करत जाऊ जसे ज्यावेळी राहुल भाई आणि सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली, लक्ष्मण हे सर्व लोक खेळत होते… तर आम्ही सर्व त्यांना पाहात होतो तर त्यांनी आम्हा सर्व मुलांना inspire केले आहे आमची देखील एक responsibility आहे की ज्या भावी generation येतील, त्यांना आम्ही कशा प्रकारे inspire करू शकतो आणि कदाचित या विश्वचषकापासून I am sure की आगामी पिढीत तो उत्साह नक्कीच राहील.

पंतप्रधान: रोहित तुम्ही नेहमीच इतके serious असता का?

रोहित शर्मा: सर हे तर actually ही मुलेच सांगू शकतील.

पंतप्रधान: सर्व सामने जिंकणे आणि यावेळी तर तुमचा गट देखील मोठा होता. अनेक नवे देश देखील जोडले जात आहेत आता आणि क्रिकेटमध्ये ही गोष्ट खरी आहे की जो खेळतो तो इतकी मेहनत करून येतो की त्याला कदाचित याचा अंदाज येत नाही की मी किती मोठे काम केले आहे कारण तो सातत्याने करत आलेला आहे. देशावर तर प्रभाव असतोच, पण क्रिकेटचे एक वैशिष्ट्य आहे. भारताचा क्रिकेट प्रवास अतिशय यशस्वी राहिलेला आहे. त्याने आता इतर खेळांना देखील प्रेरणा देण्याचे काम सुरू केले आहे. आणि खेळातील लोक देखील विचार करतात की क्रिकेटमध्ये होऊ शकते तर यामध्ये का नाही होऊ शकणार? म्हणजेच ही खूप मोठी सेवा तुमच्या माध्यमातून होत आहे.

स्वत:ला आणि देशाला जर आपल्याला पुढे न्यायचे असेल, तर सर्व खेळांमध्ये अशीच भावना निर्माण करावी लागेल की, आपल्याला जगज्जेते  बनायचे आहे आणि आज मी पाहतोय की, देशातील छोट्या-छोट्या गावांमधून प्रतिभावान खेळाडू पुढे येत आहेत ... द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या  शहरांमधून खेळाडू मिळत आहेत  … यापूर्वी तर मोठी शहरे आणि मोठ्या  क्लबमधून खेळाडू यायचे.  आता तसे नाही, तुम्ही पहा , तुमच्या संघातील  अर्ध्याहून अधिक खेळाडू  छोट्या छोट्या शहरांमधून आलेले  आहेत. हा खरे तर विजयाचा प्रभाव आहे आणि ज्याचे परिणाम आपल्याला दीर्घकाळ दिसून येतात . अफगाणिस्तानच्या मंत्र्याचे  विधान लक्ष वेधून घेणारे होते . त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध  शेवटच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, हा प्रवास त्यांच्यासाठी  खूप यशस्वी ठरला, मात्र त्यांनी  त्याचे श्रेय भारताला दिले. अफगाणिस्तान क्रिकेट संघाने केलेल्या प्रगतीचे श्रेय जर  कोणाला जात असेल तर ते भारताला जाते कारण भारतातील लोकांनी आमच्या मुलांना तयार केले आहे.

पंतप्रधान : तुम्ही लोकांनी राहुलला 20 वर्षांनी लहान केले आहे.

राहुल द्रविड: नाही, याचे श्रेय या मुलांना जाते, कारण आम्ही… मी नेहमीच म्हणतो की मी खेळाडू होतो आणि प्रशिक्षक देखील होतो. आपण केवळ  या मुलांना पाठिंबा देऊ  शकतो. या संपूर्ण स्पर्धेत मी एकही धाव केली नाही, एकही विकेट घेतली नाही, एकही झेल पकडला नाही. आपण केवळ पाठिंबा देऊ  शकतो आणि केवळ मीच नाही , आमची जी संपूर्ण टीम असते , सपोर्ट स्टाफची एक टीम असते , अन्य प्रशिक्षक असतात. माझ्या मते अनेक सपोर्ट स्टाफची जी टीम असते , ते खूप मेहनत करतात, ते काम करतात आणि आम्ही केवळ  या मुलांना पाठिंबा देऊ शकतो. जेव्हा दबावाची स्थिती असते, धावा करायच्या असतात , विराटला , बुमराहला किंवा हार्दिकला किंवा रोहितला, सगळ्यांना , तेव्हा हे लोक करतात, तेव्हा आम्ही  केवळ त्यांच्या पाठीशी उभे राहू शकतो , त्यांना जे हवे आहे ते आम्ही त्यांना देऊ शकतो आणि संपूर्ण श्रेय त्यांना जाते, त्यांनी मला एवढा आनंद साजरा करण्याची संधी दिली, मी या मुलांचा आभारी आहे ज्यांनी माझ्याबरोबर इतका चांगला वेळ घालवला, खूप चांगला अनुभव दिला आहे, म्हणून मी एवढेच सांगू इच्छितो की या स्पर्धेत सांघिक भावना खूप चांगली होती, या संघात अकरा खेळाडू खेळले  आणि चार खेळाडू बाहेर बसले होते. यातील  मोहम्मद सिराज अमेरिकेत पहिले तीन सामने खेळला होता , आम्ही तिथे अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवत होतो . त्यामुळे  तो या स्पर्धेत फक्त 3 सामने खेळला आणि आमच्या संघात तीन असे खेळाडू होते ज्यांनी एकही सामना खेळला नाही. संजू एकही सामना खेळला नाही, युजी चहलला देखील एकही सामना खेळायला मिळाला नाही आणि यशस्वी जयस्वालला देखील  एकही सामना खेळायला मिळाला नाही, मात्र  त्यांच्यात जी खिलाडू वृत्ती होती, जो उत्साह होता बाहेर,  त्यांनी कधीच नाराज असल्याचे दाखवले  नाही. आणि ती आमच्यासाठी आणि आमच्या टीमसाठी अतिशय  महत्त्वाची गोष्ट होती आणि जेव्हा तुम्ही अशा मोठ्या स्पर्धा खेळता तेव्हा बाहेर बसलेल्या खेळाडूंची  जी वृत्ती असते, त्यांची जी खिलाडू वृत्ती असते, मला त्याचे खूप कौतुक वाटते.

पंतप्रधान: मला बरे वाटले  की एक प्रशिक्षक म्हणून संपूर्ण संघाकडे तुमचे लक्ष असणे  आणि मला वाटते की तुमची  ही 3-4 वाक्ये जो कोणी ऐकेल त्याला असे वाटेल की हे शक्य आहे , आपण काही लोकांना मैदानात पाहिले नाही मात्र ते देखील मैदानात रंग भरतात , मैदानाला जोडून ठेवतात  आणि क्रिकेटमध्ये मी पाहिले आहे की प्रत्येकाचे काही ना काही योगदान असतेच. एवढ्या मोठ्या संघभावनेची गरज असते तेव्हाच हे घडते. पण राहुल, मला हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की आता 2028 मध्ये अमेरिकेत ऑलिम्पिक होणार आहे, आणि   ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झालेला आहे, आणि मला वाटते की आता लोकांचे लक्ष  विश्वचषकापेक्षा ऑलिंपिककडे असेल. भारत सरकार किंवा क्रिकेट बोर्ड किंवा तुम्ही सर्वांनी ऑलिम्पिकची तयारी म्हणजे काय ? काय करावे लागेल  यावर थोडा गांभीर्याने विचार करायचा असेल तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?

राहुल द्रविड: नक्कीच मोदीजी, ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची  खरंतर क्रिकेटपटूना  संधी मिळत नाही, कारण 2028 मध्ये यावेळेस पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटला स्थान मिळाले आहे. … त्यामुळे मला वाटते की  देशासाठीही आणि क्रिकेट बोर्डासाठी, क्रिकेटपटूंसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यांना त्या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी करायची आहे आणि जसे तुम्ही आधी म्हटले ,तसे इतर खेळ देखील आहेत, त्यांच्यासोबत राहणे,  कारण तिथे कितीतरी उत्तम खेळाडू आहेत.  त्यांनी आपल्या देशाचा गौरव वाढवला आहे आणि एवढी मोठी स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश ही क्रिकेटसाठी अभिमानाची बाब आहे. आणि मला पूर्ण आशा आहे की त्यावेळी बोर्डात जे कुणी असतील , आपले बीसीसीआयचे जे पदाधिकारी असतील, ते या स्पर्धेसाठी पूर्ण तयारी करतील.  मला पूर्ण विश्वास आहे की या संघातले अनेक खेळाडू त्यात असतीलच  … मला पूर्ण आशा आहे की रोहित, विराट सारखे अनेक युवा खेळाडू  असतील.

पंतप्रधान: हो, 2028 पर्यंत तर बरेच जण असतील! 2028 पर्यंत अनेक खेळाडू  असतील!

राहुल द्रविड: त्यामुळे मला पूर्ण आशा आहे की हे खेळाडू खेळतील  आणि सुवर्णपदक  जिंकणे म्हणजे दुसरी कुठली आनंदाची गोष्ट असूच  शकत नाही, त्यामुळे त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील....

पंतप्रधान : मी पाहू शकतो की, कदाचित काही लोक विजयानंतर आनंदाचे अश्रू पाहतात तेव्हा  पराभवाचे क्षण किती कठीण गेले असतील याची जाणीव होते. पराभवाच्या क्षणी, त्या वातावरणात, खेळाडू किती वेदना सहन करतो हे लोकांना जाणवत नाही. कारण प्रचंड मेहनत घेऊनच  ते खेळायला उतरलेले असतात आणि अंतिम क्षणी विजय हुलकावणी देतो. आणि जेव्हा ते जिंकतात तेव्हा त्यांच्या आनंदावरून समजते की पराभवाचे ते क्षण किती कठीण गेले असतील आणि मी त्या दिवशी या सर्वाना  पाहिले होते, मला स्वतःला जाणवले होते  आणि विश्वास देखील होता की आपण यावर मात करून नव्या उमेदीने उत्तम कामगिरी करू  आणि आज मला वाटते की तुम्ही  ते करून दाखवले आहे. तुम्ही सगळे खूप खूप  अभिनंदनासाठी पात्र आहात!

 

* * *

Akude/Tupe/JPS/Suvarna/Ashutosh/Madhuri/Shailesh/Sushama/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2031520) Visitor Counter : 85