आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज जम्मू येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (All India Institute of Medical Science - AIIMS) अर्थात एम्सला भेट देऊन केली पाहणी
Posted On:
07 JUL 2024 9:21PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज जम्मू येथील विजयपूर मधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (All India Institute of Medical Science - AIIMS) अर्थात एम्सला भेट दिली. यानिमीत्ताने झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्राध्यापक, निवासी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना संबोधितही केले.
वैद्यकीय विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये परस्पर सहकार्यापूर्ण समन्वय वाढवणे महत्वाचे असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी यावेळी बोलताना सांगितले. अॅलोपॅथी आणि आयुर्वेद या दोन्ही शाखांचे स्वतःचे वेगळे महत्त्व आणि सामर्थ्य आहे, आणि या दोन्ही शाखा आरोग्यसेवांची परिणामकारता वाढवण्यासाठी एकमेकांना पूरक आहेत असेही आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यावेळी म्हणाले.
आपण सगळ्यांनीच आजवरचा ज्ञान, सेवा आणि संशोधनाचा पाठपुरावा सुरू ठेवावा अशा शब्दांत नड्डा यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्राध्यापक, निवासी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्यासमर्पण वृत्तीचे आणि कठोर परिश्रमाचेही नड्डा यांनी कौतुक केले. आरोग्यसेवा आणि शिक्षणातील सातत्यपूर्ण उत्कृष्टता आणि नाविन्यता महत्वाची असते यावर त्यांनी आपल्या संबोधनात भर दिला.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे जम्मू इथले केंद्र म्हणजे असंख्य व्यक्तींच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतीक आहे ही बाब त्यांनी नमूद केली. केवळ जम्मू - काश्मीरच्याच नाही, तर लेह आणि पंजाब तसेच हिमाचल प्रदेशसारख्या शेजारच्या राज्यांसाठीही ही संस्था म्हणजे आशेचा किरण असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. लाखो लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी या संस्थेला आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या संस्थेने आजवर कधीही कौशल्य आणि प्रतिभेसोबत कधीही तडजोड केलेली नाही, आणि त्यातूनच अथक परिक्षमांतून नि:स्वार्थीपणा, समर्पण, क्षमता, सचोटी, अभिनवता आणि विश्वास यांचा मिश्रण असलेली एम्स संस्कृती घडवली आहे ही बाब नड्डा यांनी आवर्जून अधोरेखीत केली.
आपल्या या भेटीदरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि इतर मान्यवरांनी या संस्थेतील विविध विभाग आणि शाखांना भेटी दिल्या. त्यांनी डिजिटल लायब्ररीला भेट देत ई - बुक्स, ई - जर्नल्स बाबत समजून घेतले, यावेळी त्यांनी छापील पुस्तके आणि व्यावसायिक नियतकालिकांच्या प्रतींचीही पाहणी करत त्याबाबत समजून घेतले.
आपल्या या भेटीदरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या माध्यमातून जम्मू - काश्मीरमधील जनतेला उपलब्ध असलेल्या जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा आणि सेवांचीही पाहणी केली.
***
S.Kane/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2031455)
Visitor Counter : 85