पंतप्रधान कार्यालय
पॅरिस ऑलिंपिकच्या भारतीय चमूबरोबर पंतप्रधानांनी साधलेला संवाद
Posted On:
05 JUL 2024 5:06PM by PIB Mumbai
सूत्रसंचालकः परम आदरणीय पंतप्रधान महोदय, माननीय मंत्रीगण, डॉ. पी. टी. उषा.
सूत्रसंचालकः - परम आदरणीयपंतप्रधान जी, माननीय मंत्रीगण, डॉ पी.टी. उषा। आज आपले पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे सर्व खेळाडू तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आले आहेत. सरांनी मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. सुमारे 98 लोक ऑनलाईन जोडले गेले आहेत सर, कारण त्यांचे परदेशात प्रशिक्षण सुरू आहे, देशाच्या इतर केंद्रांमध्ये प्रशिक्षण सुरू आहे. आणि पुढच्या काही दिवसांत तुम्ही सर्व जण पॅरिसला रवाना व्हाल. मी सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावे, त्यांना प्रोत्साहित करावे.
धन्यवाद सर!
पंतप्रधान- तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत! आणि जे मित्र सर्व ऑनलाइन जोडलेले आहेत त्यांचे देखील स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण आज तुम्ही जाण्याच्या मनःस्थितीत असाल आणि जिंकण्याच्या मनःस्थितीत असाल. आणि तुम्ही जिंकून जेव्हा परत याल, तेव्हा स्वागत करण्याच्या मनःस्थितीत मी आहे. आणि तसेही माझा असा प्रयत्न असतो की क्रीडा विश्वाशी संबंधित आपल्या देशातील जे तारे आहेत त्यांची मी भेट घेत राहीन, त्यांच्याकडून नव्या गोष्टी जाणून घेईन, त्यांच्या प्रयत्नांची माहिती घेईन. माझा प्रयत्न असा असतो सर्वांसोबत direct interaction करेन, जेणेकरून first time information मिळते. खेळाचा एक स्वभाव असतो, जसा प्रत्येक विद्यार्थ्याचा असतो. जेव्हा तो परीक्षेचा पेपर लिहायला जातो तेव्हा exam साठी तो संपूर्ण घराला ही खात्री देतो की तुम्ही काळजी करू नका मी वरचा क्रमांक मिळवूनच येणार आहे. आणि ज्यावेळी त्याला लक्षात येते की examination मध्ये काय होणार आहे, काय करू शकणार आहे, ठीक गेला, नाही गेला. मग तिथून निघाल्याबरोबर तो सांगायला सुरू करतो. पंख्याचा खूप आवाज येत होता. खिडकी उघडी होती, पण काही बरे वाटत नव्हते. शिक्षक वारंवार माझ्याकडेच पाहात होते.
तर मग तुम्ही पाहिले असतील असे students, त्यांच्याकडे अनेक बहाणे असतात आणि नेहमीच ते परिस्थितीला दोष देत राहतात. आणि अशा लोकांची जीवनात कधीच प्रगती होत नाही. ते बहाणे तयार करण्यात तरबेज होतात, पण कधीच प्रगती करू शकत नाहीत. पण मी पाहिले आहे की मी अनेक खेळाडूंना ओळखतो, ते कधीही परिस्थितीला दोष देत नाहीत. ते नेहमीच असे सांगताना दिसतील, ती जी technique, माझ्यासाठी नवीन होती. तो जे करायचा त्याचा मला अंदाज आला नाही की ही सुद्धा एक पद्धत असू शकते. सांगण्याचे तात्पर्य हे आहे मित्रांनो, आपण खेळायला चाललो आहोत. आपण आपल्या best performance साठी जात आहोत. पण ऑलिंपिक हे शिकण्यासाठी देखील एक खूप मोठे मैदान असते. आता एक तर मी आपला खेळ खेळू आणि टेलिफोन करून सगळ्यांना सांगत राहू की बघा ना आज असे झाले, तसे झाले, दुसरे असतात ते इतर सर्व खेळ पाहायला जातात. माझा देश कसा खेळत आहे, दुसरा देश कसा खेळत आहे. तो सर्व गोष्टींचे अतिशय बारकाईने निरीक्षण करतो. तो absorb करण्याचा प्रयत्न करतो आणि येऊन आपल्या प्रशिक्षकांना देखील सांगेल . अहो नाही, मी पाहिले, त्याने तर खूपच मोठी कमाल केली. last movement मध्ये मला देखील सांगा की ती कोणती technique होती. कधी तो व्हिडियो दहा वेळा पाहतो की त्याने त्याला कशा प्रकारे पालथे केले होते. म्हणजे जो शिकण्याच्या वृत्तीने काम करतो त्याच्यासाठी शिकण्याची अनेक संधी असतात बरं का. ज्याला तक्रारींसह जगायचे आहे त्याच्यासाठी देखील संधींची कमतरता नसते. जगातील समृद्ध-समृद्ध देश देखील, उत्तमात उत्तम सुविधांसह आलेले लोक देखील कदाचित तक्रारी करताना दिसू शकतील. आणि आपल्यासारख्या देशातून लोक जातात, अनेक अडचणी असतात, अनेक गैरसोयी होतात, पण हृदयात, त्यांच्या मनात असतो माझा देश, माझा तिरंगा ध्वज. आणि म्हणूनच तो अडचणींना, गैरसोयींना अगदी बाजूला सारतो. तो आपल्या मिशनच्या मागे लागतो. आणि म्हणूनच मित्रांनो माझी पक्की खात्री आहे की यावेळी देखील खेळांच्या मैदानात तुम्ही भारताचे नाव उज्ज्वल करून याल. जे पहिल्यांदा जात आहेत, ज्यांना ऑलिंपिकमध्ये जाण्याची पहिली संधी मिळत आहे, असे कोण-कोण आहेत. अच्छा, कन्यांची संख्या जास्त आहे, पैलवानांची संख्या जास्त आहे, आहे? बरं जे पहिल्यांदा जात आहेत, त्यांच्या मनात काय सुरू आहे. मला जरा ऐकायचे आहे, तुम्ही कोणता विचार करत आहात? तुमच्यापैकी कोणीही सांगा, हा सांगा. तुम्हाला काही सांगायचे आहे ना? तिथे मागे. हा सांगा.
खेळाडू- मला खूपच चांगले वाटत आहे. मी पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये जात आहे.
पंतप्रधान- तुमचा परिचय सांगा.
खेळाडू- माझे नाव रमिता जिंदल आहे आणि एयर रायफल्स शूटिंगमध्ये मी पहिल्यांदाच ऑलिंपिक्समध्ये जात आहे. त्यामुळे तिथे जाण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे कारण सुरुवातीपासूनच मी जेव्हापासून खेळायला सुरूवात केली तेव्हापासून ऑलिंपिकमध्ये जाण्याचे माझे स्वप्न होते. त्यामुळे माझ्यामध्ये उत्साह देखील आहे आणि देशासाठी तिथे काहीतरी करून येण्याची प्रेरणा देखील आहे.
पंतप्रधान – तुमचे प्रशिक्षण कुठे-कुठे झाले आहे?
खेळाडू– मी हरियाणाची आहे पण मी चेन्नईमध्ये प्रशिक्षण घेत आहे.
पंतप्रधान – तुमच्या कुटुंबातील कोणी क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे की तुम्हीच खेळायला सुरुवात केली?
खेळाडू – नाही, मीच सुरुवात केली आहे.
पंतप्रधान – अच्छा, नाही तर हरियाणा मध्ये तर प्रत्येक घरात खेळाडू सापडेल. बसा. आणखी कोणी तरी काही तरी सांगा जे पहिल्यांदा चालले आहेत. आपल्या मुली तर बरेच काही सांगू शकतात. द्या द्या, त्यांना बोलायचे आहे काही तरी.
खेळाडू - सर माझे नाव रितिका आहे आणि मी हरियाणा, रोहतकची आहे. मी अतिशय खुश आहे, मी पहिल्यांदाच जात आहे. Excitement देखील खूप जास्त आहे की मी आपली कामगिरी करेन, संपूर्ण देशाचे लक्ष माझ्याकडे असेल. सर्व लोक प्रार्थना देखील करत आहेत आणि मी देखील माझे 100 टक्के देईन.
पंतप्रधान – शाब्बास! आणखी, काही बोला ना, हा द्या ना, तुम्ही संकोच करत आहात, बोलायचे आहे तुमची body language सांगत आहे.
खेळाडू – माझे नाव अंतिम तंगाड़ा आहे आणि मी 53 kg मध्ये wrestling करत आहे. मी आता 19 वर्षांची आहे आणि ऑलिंपिक खेळायला जाणार आहे. अतिशय आनंद होत आहे मला. आतापर्यंत ऑलिंपिकमध्ये कुस्तीमध्ये केवळ एकच पदक मिळाले आहे आणि ते देखील Bronze मिळाले आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की यापेक्षा देखील चांगले पदक मी घेऊन यावे.
पंतप्रधान – शाब्बास! बरं तुमच्यामध्ये 18 पेक्षा कमी वयाचे कोण कोण आहेत? ज्यांचे वय 18 पेक्षा कमी आहे. एक, हो, तुम्ही सांगा जरा.
खेळाडू - नमस्कार, मी धिनिधी देसिंघू. मी 14 वर्षांची आहे. मी केरळची आहे पण सामान्यतः मी कर्नाटकचे प्रतिनिधित्व करते. भारतीय चमूचा एक भाग म्हणून ऑलिंपिकला जाण्यासाठी मी अतिशय उत्साहित आहे. या वर्षी अशा असामान्य संघाचा एक भाग असणे ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची आणि बहुमानाची बाब आहे. मला हे ठाऊक आहे की माझ्या प्रवासाची ही नुकती एक सुरुवात आहे आणि मला आणि इथे असलेल्या सर्वांनाच अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. मला आशा आहे की आम्ही आमच्या देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू आणि मला आशा आहे की आम्ही खूप मोठी कामगिरी आणि जीवनातील सर्वाधिक गौरवास्पद लक्ष्ये साध्य करून माघारी येऊ.
पंतप्रधान:- आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
खेळाडू:- धन्यवाद सर.
पंतप्रधान:- अच्छा, जे खेळाडू तीन हून अधिक वेळा ऑलिंपिक मध्ये खेळले आहेत असे कोण कोण आहेत ? More than three times. जरा त्यांच्याकडून ऐकूया. हां बोला. या झारखंड वाल्यांना तर काहीही बोलण्याची मुभा आहे.
खेळाडू:- नमस्ते सर, माझे नाव दीपिका कुमारी आहे. मी तिरंदाजी या खेळाचे प्रतिनिधित्व करते आणि मला अत्यानंद आहे की माझे हे चौथे ऑलिंपिक आहे आणि याबाबत मी फारच उत्साही आहे आणि मला बराच अनुभव आहे. तर माझी मनोकामना आहे की त्या अनुभवाचा मी वापर करेन. आणि त्याच उत्साहात आणि त्याच आत्मविश्वासाने मी प्रतिनिधित्व करून आपले 200 टक्के देईन. धन्यवाद सर.
पंतप्रधान:- अच्छा इथे जे नवीन खेळाडू पहिल्यांदाच जात आहेत त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल ? जे पहिल्यांदाच चालले आहेत या संघाच्या माध्यमातून.
खेळाडू:- सर मी सांगेन की येथे उत्साह नक्कीच खूप जास्त असतो पण मी त्यांना सांगेन की त्या झगमगाटात त्यांनी गुंतून जाऊ नये. जेवढे शक्य होईल तेवढे स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि अशा प्रकारे लक्ष केंद्रित करत संपूर्ण आत्मविश्वासासह खेळाचा आनंद घ्या. मी म्हणेन की पदक जिंकण्याच्या मागे धावू नका. खेळाडूंनी आपली कामगिरी करावी, चांगली कामगिरी करावी ज्यायोगे पदके त्यांच्याकडे येतील.
पंतप्रधान:- आपण तीनवेळा जाऊन आलात. पहिल्यांदा गेलात तेव्हा त्यातून काहीतरी शिकला असाल. आपण येऊन त्याचा सराव केला असेल. दुसऱ्यांदा गेलात तेव्हा आणखी काही शिकला असाल. मला कळेल का की आपण अशा कोणत्या बाबी नव्याने अंगीकारल्यात की ज्यामुळे आपला विश्वासही वाढला आणि आपल्याला वाटतंय का की आपण देशासाठी काहीतरी देऊ शकाल किंवा असे तर नाही ना की नियमित जो सराव करत होताच तोच करत राहिलात. कारण बहुतांश वेळा मी पाहिले आहे. जसे की मला स्वतःलाच. योगा वगैरे करण्याची सवय आहे, त्यामुळे मला स्वतःला असे वाटत आहे. पण मी पाहिले आहे की जो एक ताल निर्माण होतो की ज्यामुळे आपण जिथून सुरूवात केली आहे तिथूनच अचानकपणे सुरुवात होते. मग मात्र मी थोडासा भिडस्तपणे विचार करतो की नाही आज या दोन गोष्टी सोडून नवीन दोन गोष्टी करून पाहतो. तसं तर प्रत्येकालाच सवय झालेली असते की त्यांची जी जुनी सवय आहे त्याचेच ते अनुकरण करत राहतात आणि मग त्यांना असे वाटते की मी बऱ्यापैकी केले तर आपले याबाबत नेमके काय म्हणणे आहे?
खेळाडू:- सर, जुनी जी चांगली सवय आहे ती आम्ही सुरूच ठेवतो. जसे की याआधी जर एखाद्या सामन्यात आमचा पराभव झाला असेल तर त्यातून आम्हाला काही शिकता येते. आणि सरावात ती चूक आम्ही करणार नाही याची काळजी घेतो. त्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा सराव करतो. ज्यायोगे आम्हाला त्याची सवय होऊन जाईल, जी चांगली सवय आहे ती आमच्यात भिनेल. तीच गोष्ट आम्ही पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करतो.
पंतप्रधान:- कधी कधी वाईट सवय सुद्धा कायमची सवय होऊन बसते. अंगवळणी पडते.
खेळाडू:- सर होतं असं कधी कधी. बऱ्याचदा वाईट सवयी सुद्धा अंगवळणी पडतात. पण यावेळी आम्ही स्वतःशी संवाद साधतो आणि स्वतःला आठवण करून देतो की या गोष्टी कशा प्रकारे चांगल्या गोष्टींमध्ये परावर्तित होतील.
पंतप्रधान:- बरं, आणखी कोण आहे जे तीन वेळा जाऊन आले आहेत.
खेळाडू:- नमस्ते सर, मी पूवाम्मा एम आर. ॲथलेटिक्स खेळाचे प्रतिनिधित्व करते. 2008 मध्ये जेव्हा मी ऑलिंपिक मध्ये भाग घेतला होता, तेव्हा मी अठरा वर्षांची होते. माझा सहभाग तेव्हा राखीव खेळाडूंमध्ये होता, सर. त्यानंतर 2016 मध्ये आम्ही संघाबाहेर होतो. तसेच, 2002 नंतर आम्ही अंतिम फेरीत प्रवेश करू शकलो नाही, तर यावेळी आम्हाला राष्ट्रीय विक्रम नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश करायचा आहे.
पंतप्रधान:- यातून आपला आत्मविश्वास दृगोच्चर होत आहे, धन्यवाद. आपल्याला हार्दिक शुभेच्छा. हे जे खेळाडू बाहेरून आपल्याशी ऑनलाईन संवाद साधू इच्छीत आहेत त्यांनाही आपले काही अनुभव सामायिक करायचे असतील. यामुळे सर्व खेळाडूंना आनंद होईल. ज्यांना कोणाला बोलायला आवडेल त्यांनी कृपया हात वर करून व्यक्त व्हायला सुरूवात करा.
खेळाडू:- नमस्कार सर.
पंतप्रधान:- नमस्ते.
खेळाडू:- मी पी व्ही सिंधू. सर, माझे हे तिसरे ऑलिंपिक आहे. मी यात भाग घेत आहे. तर, पहिल्या ऑलिंपिक मध्ये मी रौप्य पदक पटकावले होते आणि 2020 मध्ये टोकियो ऑलिंपिक मध्ये कांस्यपदक घेऊन आले होते. तर यावेळी मी पदकाचा रंग बदलून पदक घेऊन येईन. अर्थातच, आता माझ्या गाठीशी दांडगा अनुभव आहे. पण नक्कीच ही कामगिरी सोपी नसेल. पण मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन आणि यावेळी आणखी पदक पटकावण्याची मला आशा आहे, सर.
पंतप्रधान:- हे जे नवीन खेळाडू सहभागी होत आहेत त्यांच्यासाठी काय संदेश द्याल.
खेळाडू:- सर्वप्रथम, मी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देईन. बरेच जण विचार करतात की ऑलिंपिक्स आहेत, यात कशी कामगिरी करावी लागेल आणि काही काही जणांवर बराच दबावही असतो. तो उत्साहही असतो. त्यांना ठाऊक असते की ऑलिंपिक्स मध्ये खेळण्याची पहिलीच वेळ आहे आणि आपल्याला ऑलिंपिक मध्ये उत्तम कामगिरी करून दाखवायची आहे. पण मी असे सांगेन की इतर कोणत्याही स्पर्धेप्रमाणेच ही देखील एक स्पर्धा आहे. आपल्याला केवळ लक्ष केंद्रित करायचे आहे आणि आपल्यात स्वतःबद्दल हा विश्वास हवा की आम्ही हे करू शकू आणि नक्कीच सर्व खेळाडू अथक परिश्रम करत आहेत. तेव्हा मला खात्री आहे की त्यांनी त्यांचे शंभर टक्के योगदान द्यावे. असा विचार करू नये की ही कोणतीतरी वेगळी स्पर्धा आहे आणि ही आपल्याला कठीण जाऊ शकते. पण मला त्यांना केवळ एवढेच सांगायचे आहे की ही सुद्धा इतर स्पर्धां सारखीच एक स्पर्धा आहे. मला त्यांना सांगायचे आहे की त्यांनी आपले शंभर टक्के योगदान द्यावे. धन्यवाद सर.
पंतप्रधान:- आणखी कोण आहेत की ज्यांची बाहेरून संवाद साधण्याची इच्छा आहे.
खेळाडू:- नमस्ते सर, मी प्रियांका गोस्वामी.
पंतप्रधान:- नमस्ते जी. आपले बाळकृष्ण कुठे आहेत ?
खेळाडू:- सर, इथे माझ्यासोबतच आहेत. स्वित्झर्लंड मध्येच आहेत.
पंतप्रधान:- तर यावेळी सुद्धा बाळकृष्णाला घेऊन गेला आहात ना.
खेळाडू:- हो सर, त्यांचेही हे दुसरे ऑलिंपिक आहे. सर्वप्रथम सर, आपले अभिनंदन की आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झालात आणि आम्हा सर्व खेळाडूंना आपल्याशी दुसऱ्यांदा संवाद साधण्याची आणि भेटण्याची संधी मिळत आहे. आणि सर जसे की हे दुसरे ऑलिंपिक्स असून गेल्या तीन महिन्यांपासून मी ऑस्ट्रेलियामध्ये सरकारच्या सहयोगाने प्रशिक्षण घेत आहे. तसेच, आता स्वित्झर्लंड मध्ये प्रशिक्षण घेत असून Tops च्या माध्यमातून आम्हाला सरकारकडून बरेच सहाय्य मिळत आहे. दुसऱ्या देशात जाऊन आम्ही आपला सराव करत आहोत. त्यामुळे, मला आशा आहे की सर्व खेळाडू ऑलिंपिक मध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी करून चांगला निकाल आणतील, आणि जास्तीत जास्त पदके मिळवतील.
पंतप्रधान:- बरं, आपली एक तक्रार असायची की आपला खेळ असा आहे की तो बघायला कोणी नसतं तर तिथे सराव करत असताना तुमचा खेळ बघण्यासाठी कोणी उपस्थित असायचे का ?
खेळाडू:- हो सर, परदेशात तर या खेळालाही इतर खेळांइतकेच महत्त्व दिले जाते. आणि आपल्या देशात थोडासा कमी पाठिंबा मिळत होता. मात्र, जेव्हापासून आपण स्वतःही या दृष्टीकोनातून प्रोत्साहन देत आहात की सर्व खेळ पहाण्यासाठी, प्रत्येक खेळाडूसाठी आपण हे म्हणत आहात, तेव्हा आपल्या देशात सुद्धा आता अनेक लोक हा खेळ पाहत आहेत आणि याला बराच पाठिंबा मिळत आहे. कोणी आपला खेळ पाहत आहेत. यामुळे खेळाडू आणि आम्हालाही बराच पाठिंबा मिळतो आणि चांगली कामगिरी करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळते.
पंतप्रधान - चला, तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, तेथून आणखी कोणाला बोलण्याची इच्छा आहे का ?
खेळाडू - सर, नमस्कार सर, मी निखद बोलत आहे. मी ऑलिम्पिक स्पर्धेत मुष्टियुद्धात 50 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याची ही माझी पहिलीच वेळ असून मी खुपच उत्साहात आहे, पण त्याच वेळी मी स्वतःवरही लक्ष केंद्रित करत आहे. कारण, सर्व देशवासीयांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत. मला त्यांच्या अपेक्षा सार्थ ठरवायच्या आहेत आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करुनच परतण्याची माझी इच्छा आहे.
पंतप्रधान - खूप खूप शुभेच्छा. निरज काही तरी म्हणत होता.
खेळाडू - नमस्ते सर!
पंतप्रधान - नमस्ते भैय्या.
खेळाडू - तुम्ही कसे आहात, सर ?
पंतप्रधान - मी तसाच आहे, तुझा चुरमा अजूनही माझ्यापर्यंत पोहोचला नाही.
खेळाडू - यावेळी चुरमा घेऊन येईन सर. मागच्या वेळी दिल्लीत साखर असलेला चुरमा आणला होता. यावेळी मात्र हरियाणाच्या देशी तुपात बनवलेला चुरमा घेऊन येईन.
पंतप्रधान - तेच तर, बंधू? यावेळी मला तुझ्या आईच्या हातचा चुरमा खाण्याची इच्छा आहे.
खेळाडू - नक्की सर!
पंतप्रधान - हं, आता बोल.
खेळाडू - बिलकुल सर. आता आम्ही देशाबाहेर जर्मनीमध्ये आहोत आणि आमचे प्रशिक्षण जोरात सुरू आहे. यावेळी मी खूप कमी स्पर्धांमध्ये सहभागी झालो होतो, कारण मध्यंतरी मला एक ईजा झाली होती. पण, आता मी ठीक आहे. आता काही दिवसांपूर्वीच फीनलॅंडमध्ये मी एका स्पर्धेत सहभागी झालो होतो, आणि तिथे मला चांगले प्रदर्शन करता आले, ऑलम्पिक ची तयारी करण्यासाठी आमच्याकडे आणखी एक महिना आहे, आणि आमचे प्रशिक्षण जोरात सुरू आहे. स्वतःला संपूर्ण तंदुरुस्त करूनच पॅरिस मध्ये जाऊ आणि आपल्या देशासाठी संपूर्ण क्षमतेने प्रदर्शन करू यासाठी प्रयत्न करत आहोत. कारण ऑलम्पिक स्पर्धा चार वर्षातून एकदाच होतात. मी सर्व खेळाडूंना हे सांगू इच्छितो की चार वर्षांनी ही संधी मिळत आहे , तेव्हा आपल्या अंतरंगात डोकावून आपली ती क्षमता शोधून काढा ज्यामुळे क्रीडांगणात तुम्ही सर्वोत्तम प्रदर्शन करू शकाल. टोक्यो ऑलम्पिक ही माझी पहिलीच ऑलम्पिक स्पर्धा होती आणि पहिल्या ऑलम्पिक स्पर्धेत मला खूप मोठे यश चाखायला मिळाले. देशासाठी सुवर्णपदक जिंकता आले. आणि हे घडू शकले याचे कारण, माझ्या मनात कुठलीही भीती नव्हती, मी निडर होऊन खेळलो, हेच असल्याचे मी मानतो. यासोबतच, माझा माझ्यावर विश्वास होता, प्रशिक्षणही खूप चांगले झाले होते. आणि म्हणूनच मी सर्व खेळाडूंना हे सांगू इच्छितो की, आपला स्वाभाविक खेळ प्रदर्शित करा, कोणालाही घाबरण्याची, कुणाची भीती बाळगण्याची गरज नाही. कारण, आपले प्रतिस्पर्धी देखील आपल्यासारखेच सामान्य मनुष्य आहेत. खूप वेळा आपल्याला असे वाटते की कदाचित युरोपातील खेळाडू जास्त ताकदवान आहेत किंवा अमेरिकेतील क्रीडापटू किंवा इतर देशांमधले क्रीडापटू जास्त ताकदवान आहेत. पुन्हा तेच सांगतो की, जर आपण आपली क्षमता ओळखली की, हो आपण इतकी मेहनत करत आहोत, आपले घरदार सोडून इतके दूर आलो आहोत तर काहीही साध्य करणे शक्य आहे.
पंतप्रधान - चला, खूप चांगली युक्ती सांगितली आहे तुम्ही सगळ्यांना, मी तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचे स्वास्थ चांगले राहो. एका महिन्यात कोणती नवीन इजा न होवो, बंधू!
खेळाडू - नक्कीच सर! तोच प्रयत्न करत आहोत.
पंतप्रधान - पहा मित्रांनो, या संवादातून दोन-तीन चांगल्या गोष्टी लक्षात आल्याचे आपण पाहिलेच असेल. तुमच्यापैकी जे कोणी अनुभवी खेळाडू आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याची संधी मिळत आहे. या माहितीचे एक विशिष्ट महत्त्व असते. जसे की त्यांनी तुम्हाला सांगितले की तेथील थाटामाटात हरवून जाऊ नका, स्वतःला विसरू नका. हे खूपच महत्त्वाचे आहे.
अन्यथा, बरेचदा असे घडते की या थाटामाटाचा आपल्यावर इतका प्रभाव पडतो की, कदाचित, आपण जे करण्यासाठी येथे आलो आहोत, त्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. दुसरे म्हणजे ईश्वराने आपल्याला एका ठराविक प्रकारचे शरीर दिले आहे, इतर खेळाडू कदाचित आपल्यापेक्षा शरीराने मोठे आणि ताकदवान असतील. पण आपण असे मनात पक्के केली पाहिजे की, हा खेळ शरीराचा नाही. येथे खेळासाठी तुमचे कौशल्य आणि तुमची प्रतिभा महत्त्वाची आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूचे शरीर आपल्यापेक्षा कदाचित दोन फूट उंच असेल, आणि जास्त तंदुरुस्त असेल, याची पर्वा करू नका. तुमचा तुमच्या प्रतिभेवर विश्वास असला पाहिजे आणि मग तुमच्यासमोर कितीही मोठ्या शरीराचा, कितीही तगडा, दिसायला एकदम शानदार प्रतिस्पर्धी असला तरीही तोच जिंकेल असे मानण्याचे कारण नाही. आपल्या जवळ जे कौशल्य आहे, आपली जी प्रतिभा आहे त्यावरच लक्ष केंद्रित करण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत. आणि हेच गुण आपल्याला यश मिळवून देतील. आपण असे बरेच लोक पाहिले असतील ज्यांना बऱ्याच गोष्टी येत असतात. मात्र, परीक्षेत ते गोंधळून जातात. त्यांना असे वाटते की, हे आठवतच नाहीये. मग ते विचार करू लागतात आणि मग कशाचा तरी परस्पर संबंध जोडतात. खरे तर या गोंधळाचे मूळ कारण म्हणजे त्यांचे परीक्षेवर लक्ष केंद्रित नसणे हे असते. या गोंधळाचे मूळ कारण आहे, जर मी चांगले यश संपादित करू शकलो नाही तर घरचे लोक काय म्हणतील? हा विचार. जर मी चांगले गुण मिळू शकलो नाही तर काय होईल? अशा विचारांच्या तणावाखाली तुम्ही राहता. मित्रांनो, तुम्ही अशा चिंता करणे सोडून द्या. तुम्ही चांगले खेळा, बस, इतकेच! पदके तर मिळतीलच आणि मिळाले नाहीत तर काय फरक पडतो. कधीही तणावाखाली राहू नका. हो, पण आपले संपूर्ण कसब पणाला लावून क्रीडांगणात प्रदर्शन करायचे आहे हा विचार मनात असू द्या, आपल्या प्रदर्शनात कसलीही कसर ठेवू नका. दुसरे म्हणजे, कदाचित तुम्हाला हे माहीतच असेल की, तुमचे हे जे प्रशिक्षक आहेत ते सर्वजण तुमची शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करतात, त्यांनी देखील तुम्हाला समजावून सांगितले असेल. क्रीडा विश्वात जितके महत्त्व सरावाला आहे, जितके महत्त्व सातत्याला आहे, तितकेच महत्त्व झोपेला देखील आहे. कधी कधी असे होते की, उद्या सकाळी सामना होणार आहे तर आज रात्री झोपच येत नाही. झोपेचा अभाव आपले जितके नुकसान करतो तितके नुकसान कदाचितच इतर कोणतीही गोष्ट आपल्याला पोहोचवत असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, असा कसा पंतप्रधान आहे जो आपल्याला झोपायला सांगत आहे. पण मी आपल्याला आग्रह पूर्वक सांगत आहे की क्रीडा जगतात चांगल्या कामगिरीसाठी चांगली झोप खूप आवश्यक आहे, जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी देखील झोप खूप आवश्यक आहे. आज-काल वैद्यक शास्त्र देखील झोपेवर खूप भर देत आहे. तुम्ही किती वेळ झोप घेता, तुम्हाला किती काळासाठी सलग झोप लागते, याला खूप महत्त्व दिले जाते. वैद्यक शास्त्रात या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला जात आहे. आणि म्हणूनच तुम्हाला कितीही उत्साह वाटत असला तरीही आपली झोप पूर्ण करणे आवश्यक आहे. तसे पाहता तुम्ही लोक इतकी मेहनत करता की तुम्हाला झोप येणे स्वाभाविक आहे, तुम्ही इतकी शारीरिक मेहनत करता की तुम्हाला गाढ झोप लागणे स्वाभाविक आहे. मात्र शारीरिक मेहनतीमुळे येणारी झोप एक वेगळी बाब आहे आणि सर्व चिंतांमधून मुक्त होऊन झोपणे ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि, म्हणूनच मी तुम्हाला आग्रह पूर्वक सांगतो की झोपेच्या बाबतीत कसलीही तडजोड करू नका. स्पर्धेच्या ठिकाणी तुम्हाला काही दिवस आधीच पाठवले जाते कारण, तुम्ही थकवा, जेटलॅग यासारख्या समस्यांमधून, अडचणींमधून मुक्त व्हाल, तेथे गेल्यावर तुम्हाला परिसराशी जुळवून घ्यायला मदत होईल आणि त्यानंतर तुम्ही क्रीडांगणात उतरून आपले सर्वोत्तम प्रदर्शन करू शकाल. याच उद्देशाने सरकार खेळाडूंसाठी ही व्यवस्था करत आहे. खेळाडूंच्या सुविधेसाठी यावेळी देखील काही नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, असे असूनही तेथे प्रत्येकाला सर्व सुविधा उपलब्ध होतीलच की नाही हे मी सांगू शकत नाही. सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला आहे, हे मात्र खरे! या काळात आम्ही त्या देशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना देखील सक्रिय बनवतो, एकत्र आणतो आणि त्यांनी आपल्या खेळाडूंशी जोडले जावे यासाठी आग्रह करतो. शिस्तीच्या काही नियमांमुळे हे लोक खेळाडूंच्या अगदी जवळ जाऊ शकत नाहीत, मात्र, तरी देखील हे लोक खेळाडूंची काळजी घेतात, त्यांच्याबद्दल विचार करतात. ज्याचे सामने पूर्ण झाले आहेत अशा खेळाडूंची तर खूपच चिंता करतात.
पण आम्ही प्रयत्न करतोय जेणेकरून हे सगळ आपण सर्वांसाठी आरामदायी राहावे, आपल्याला असुविधा होऊ नये आणि याचे नक्कीच सकारात्मक परिणाम होतील. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी पुन्हा एकदा तुमची वाट पाहीन. जेंव्हा 11 ऑगस्टला भेट द्याल तेंव्हा स्पर्धा पूर्ण झालेली असेल. तुमच्यातील काही जण लवकर जातील आणि काही जण लवकर परत येतील, असा क्रम असतोच. पण मी प्रयत्न करेन की 15 ऑगस्ट रोजी जेंव्हा लाल किल्ल्यावर कार्यक्रम आयोजित केला जाईल तेव्हा तुम्हीही त्यात उपस्थित राहावे. जेणेकरून देशाला दिसेल की आमचे बांधव इथून ऑलिम्पिक खेळायला गेले होते, कारण ऑलिम्पिक खेळायला जाणे ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. ते खेळामध्ये जी काही कामगिरी करतात, जे काही जिंकून आणतात ते मोलाची भर घालणारे असत. पण देशात इतके खेळाडू असताना ती कामगिरी महत्त्वाची ठरते. खेलो इंडियामधून बाहेर पडल्यानंतर तुमच्यापैकी किती खेळाडू झाले? बरं, तेही बरेच लोक आहेत. तर तुम्ही कोणता खेळ खेळत आहात?कसे खेळत आहात? कृपया मला सांगा.
खेळाडू – नमस्कार सर, माझ नाव सिफत आहे आणि मी शूटिंग करते, यासाठी खेलो इंडियाने मला खूप मदत केली आहे. कारण दिल्लीत प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि त्या योजनेचा फायदा घेऊन जो काही त्याचा परिणाम झाला, जे काही मला मिळाले ते खेलो इंडियामुळेच.
पंतप्रधान – चला चांगली सुरुवात आहे.
खेळाडू – होय जी.
पंतप्रधान – तुमचं काय ?
खेळाडू: नमस्कार, माझे नाव आहे मनु भाकर. मी यावेळी दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 2018 जी पहिली खेलो इंडिया शालेय स्पर्धा होती,त्यात मी राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. तिथून पुढे मी अग्रमानांकित मुख्य गटात आलो आणि तेव्हापासून एकच ध्यास होता की मला भारताची जर्सी हवी आहे आणि भारतासाठी खेळायचे आहे आणि खेलो इंडिया हे असे व्यासपीठ आहे ज्याने अनेकांना मार्गदर्शन केले आहे असे मला वाटते. तिथले असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना मी आज माझ्या संघात पाहतो, जे माझ्यासोबत खेळतात आणि माझ्यापेक्षा ज्युनियरही अनेक आहेत. जे खेलो इंडिया कडून आले आहे, आणि त्याचे एक पुढचे मोठे पाऊल म्हणजे टॉप्स, ज्याचा मला 2018 पासून पाठिंबा मिळाला आहे, आणि मी खूप आभारी आहे की त्यांच्या पाठिंब्यामुळे, एखाद्या खेळाडूला ज्या काही छोट्या समस्या येतात, त्या सोडवल्या जातात. 'खेलो इंडिया' आणि 'टॉप्स'ने माझ्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. होय सर, आज मी येथे आहे, हे त्यांच्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या सहकार्यामुळे आहे.
पंतप्रधान: तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.आणखी कोणी आहेत जे काही बोलू इच्छितात ? ज्यांना त्यांच्या मतानुसार काहीतरी सांगायचे आहे.
खेळाडू - नमस्कार सर! मी हॉकी संघातील हरमनप्रीत सिंग आहे. तर सर, गेल्या वेळी आम्ही 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे ते पाहणे हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण होता. कारण भारतीय हॉकीचा इतिहास खूप गौरवास्पद आहे आणि मी आता सुविधांबद्दल बोलतो.
पंतप्रधान- प्रत्येकजण तुमच्या संघाला पाहत आहे.
खेळाडू - तर सर, आम्ही बंगलोरच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या आवासात राहतो. आम्हाला सर्वोत्तम सुविधा मिळतात. जसे तुम्ही रिकव्हरीबद्दल म्हटल्याप्रमाणे, तुम्ही झोपेबद्दल म्हणालात, आम्हाला आमच्या रिकव्हरीसाठी आहारापासून इतर सर्व गोष्टी खूप चांगल्या मिळत आहेत. आणि यावेळी देखील आम्ही कठोर परिश्रम करत आहोत तसेच आमचा संघ सुद्धा खूप मजबूत आहे. त्यामुळे आशा करतो सर यावेळी आणखी चांगलं करू आणि देशासाठी पदक घेऊन येऊ.
पंतप्रधान– कदाचित देशात कोणत्याही एका खेळावर सर्वात जास्त दबाव असेल तर तो हॉकीवर आहे, कारण देशातील प्रत्येकाचा असा विश्वास आहे की हा आमचा खेळ आहे. सर्वात जास्त दडपण हॉकीपटूंवर आहे, कारण देशातील प्रत्येक मुलाचा असा विश्वास आहे की हा आमचा खेळ आहे, आम्ही हरणार कसे? बाकी ते म्हणतात हो भावा, आमच्या लोकांनी प्रयत्न केले, प्रयत्न करतोय, आम्ही उपाय शोधत आहोत. हॉकीच्या बाबतीत ते तडजोड करत नाहीत त्यामुळे त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागते. पण मी तुम्हाला शुभेच्छा देतो, तुम्ही नक्कीच पदक आणाल, मला पूर्ण विश्वास आहे
खेळाडू- धन्यवाद पंतप्रधानजी
तप्रधान- चला तर मग! मी तुम्हाला सांगू इच्छितो की देशासाठी काहीतरी करण्याची ही संधी आहे. तुम्ही तुमच्या तपश्चर्येने या स्थानावर पोहोचला आहात. आता देशाला काहीतरी देण्याची तुमच्याकडे संधी आहे. आणि आपल्याला देशाला जर काही द्यायचे असेल तर खेळाच्या मैदानात आपले सर्वोत्कृष्ट द्यावे लागते. जो खेळाच्या मैदानात आपले सर्वोत्तम देतो तो देशाला गौरव मिळवून देतो. आणि मला खात्री आहे की आमचे सर्व मित्र यावेळी सर्व जुने रेकॉर्ड तोडतील. 2036 मध्ये आपल्या देशात ऑलिम्पिकचे आयोजन करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती होणे आवश्यक आहे. आम्ही आमच्या दिशेने प्रयत्न करत आहोत आणि यासाठीच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक तयारी करण्यासाठी बरेच काम चालू आहे. सर्व तज्ञ लोक त्यावर काम करत आहेत. तुम्ही लोक सुद्धा आत्ता ज्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जात आहात तेंव्हा तिथे स्पर्धे आधी किंवा स्पर्धेनंतर काय व्यवस्था आहे ? हे पाहावे लागेल. यावेळी ऑलिम्पिक फ्रान्समधील वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केले जात आहे आणि त्यापैकी एक ठिकाण तर पूर्णपणे दूरच्या बेटावर आयोजित केले जात आहे. त्यामुळे तिथे वेगळ्या प्रकारचे वातावरण असेल. पण तरीही, तुम्हाला तेथील व्यवस्थांमध्ये स्वारस्य असल्यास, त्यांचे निरीक्षण करा, त्यांची नोंद घ्या, कारण 2036 ची तयारी करताना आम्हाला खेळाडूंकडून मिळालेली माहिती खूप उपयुक्त ठरेल. तिथे हे होतं,ते होतं , या गोष्टीचा अभाव होता, त्या गोष्टीचा अभाव होता, त्यामुळे अशा गोष्टींचे निरीक्षण केले तर 2036 साठी आपल्याला काय करायचे आहे यात खूप मदत होईल. मी एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.
***
JPS/SP/SM/SN/GD/PK
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2031244)
Visitor Counter : 161
Read this release in:
Tamil
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada