आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
माता, नवजात शिशू आणि बालक आरोग्य भागीदारीच्या संचालक मंडळाच्या जिनिव्हा येथील 33 व्या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी केले बीजभाषण
महिला, मुले आणि किशोरवयीनांच्या कल्याणासाठी भागीदारीच्या वचनबद्धतेची नड्डा यांनी केली प्रशंसा, या मुद्द्यावर केंद्र सरकार आणखी काम करेल अशी दिली ग्वाही, युवकांच्या सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन
शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीला चालना देणे आणि 2030 नंतर काय करता येईल यावर भर देण्याचे महत्त्व केले विशद
Posted On:
05 JUL 2024 4:42PM by PIB Mumbai
माता, नवजात शिशू आणि बालक आरोग्य भागीदारीच्या (पीएमएनसीएच) संचालक मंडळाच्या 33 व्या बैठकीचे काल 4 जुलै रोजी जिनिव्हा येथे उद्घाटन झाले. आज 5 जुलै रोजी संमेलनाचा समारोप होईल.
सत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि पीएमएनसीएचचे उपाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी उद्घाटन सत्रात व्हिडिओ संदेश दिला. त्यांनी महिला, मुले आणि किशोरवयीनांच्या कल्याणासाठी पीएमएनसीएचच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली. या मुद्द्यावर केंद्र सरकार आणखी काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. युवकांच्या सक्रिय सहभागाला केंद्र सरकार प्रोत्साहन देईल हे आश्वासन त्यांनी दिले. शाश्वत विकास उद्दिष्टांना चालना देणे आणि 2030 नंतर काय करता येईल त्या विषयपत्रिकेवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व विशद केले. भागीदारीची ताकद आणि समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकजुटीने काम करणाऱ्या अनेक संबंधितांबद्दलही त्यांनी सांगितले.
या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक आराधना पटनायक करत आहेत.
महिला, मुले आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्य, कल्याण आणि अधिकारांचे संरक्षण तसेच प्रचार करण्यासाठी वचनबद्ध असलेली पीएमएनसीएच ही जगातील सर्वात मोठी भागीदारी आहे. जगातल्या प्रत्येक महिला, बालकाला आणि किशोरवयींनाना आरोग्य आणि कल्याणाच्या हक्काची जाणीव व्हावी यासाठी ही भागीदारी काम करते. याचे कामकाज एक संचालक मंडळ पाहते. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सचिवालयाद्वारे या भागीदारीचे प्रशासकीय काम चालवले जाते.
या 33 व्या बैठकीच्या निमित्ताने मंडळाच्या सदस्यांना 2021-2025 या चालू धोरण कालावधीत माता, नवजात आणि बाल आरोग्य, लैंगिक आणि प्रजनन आरोग्य व अधिकार आणि किशोरवयीन कल्याणाच्या उद्दिष्टांना चालना देताना प्रमुख प्राधान्यक्रमावर सहमतीची संधी मिळाली आहे. सन 2026-2030 भागीदारी धोरणाच्या विकासासाठी प्राधान्यक्रमांवरही चर्चा सुरू होईल.
***
S.Kakade/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2031067)
Visitor Counter : 56