विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवीन सहज-सुलभ उपयुक्त ट्रॅक्टर - अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

Posted On: 28 JUN 2024 11:28AM by PIB Mumbai

अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांची कृषी उत्पादकता वाढवण्यात अलीकडेच नव्यानं तयार करण्यात आलेले आटोपशीर, परवडण्याजोगे आणि सहज हाताळण्याजोगे ट्रॅक्टर कमी खर्चात लाभदायक ठरत आहेत. हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांना वितरित करता यावेत या उद्देशाने एका सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाने ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी उत्पादन प्रकल्प स्थापन उभारण्याची योजना आखली आहे.

भारतात अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांचे प्रमाणे सुमारे 80% आहे. त्यापैकी अनेकजण आजही बैलजोडीच्या नांगराचा वापर करतात ज्याचा देखभालीचा आणि एकूणच खर्च अधिक असून शेतीतून मिळणारे अल्प उत्पन्न हे देखील शेतकऱ्यांसमोरचे आव्हान आहे. बैलांच्या नांगराची जागा आता पॉवर टिलर घेत असले तरी, ते वापरण्याच्या दृष्टीने अवजड असतात. तर दुसरीकडे ट्रॅक्टर्स लहान शेतकऱ्यांच्या उपयोगाचे नसून बहुतांश लहान शेतकऱ्यांना ते परवडत नाहीत.

या समस्येवर उपाय शोधण्यासाठी सी एस आय आर -केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्थेने  (CSIR- CMERI) विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या समानता, सशक्तीकरण आणि विकास विभागाच्या सहाय्याने अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांसाठी आटोपशीर, परवडणाऱ्या आणि सहज हाताळण्यायोग्य तसेच कमी अश्वशक्तीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे.

या तंत्रज्ञानाचा प्रसार त्यांनी सध्या कार्यरत असलेल्या अनेक स्वयंसहाय्यता गटांमध्ये केला असून या विशिष्ट तंत्रज्ञानासाठी नवीन स्वयंसहाय्यता गट तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न देखील सुरु आहेत. याशिवाय याप्रकारच्या ट्रॅक्टरच्या उत्पादनासाठी स्थानिक कंपन्यांना परवाने देण्याबद्दल CSIR- CMERI विचारविनिमय करत असून तसे झाल्यास त्याचे लाभ स्थानिक शेतकऱ्यांना मिळू शकतील.

हा ट्रॅक्टर 9 एचपी डिझेल इंजिनने 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स स्पीडसह विकसित केला आहे, यात 540 pto हा 6-स्प्लिन शाफ्ट आहे ज्याचा वेग @540 रेव्होल्यूशन प्रति मिनिट इतका आहे. ट्रॅक्टरचे एकूण वजन सुमारे 450 किलोग्रॅम आहे, त्याच्या पुढील आणि मागील चाकाचे आकार अनुक्रमे 4.5-10 आणि 6-16 आहेत. व्हीलबेस, ग्राउंड क्लीयरन्स आणि टर्निंग त्रिज्या अनुक्रमे 1200 मिमी, 255 मिमी आणि 1.75 मीटर आहेत.

या ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतीची कामे जलदगतीने होऊ शकतील कारण बैलगाडीला ज्या कामासाठी काही दिवस लागतात त्या तुलनेत ते काम काही तासांत पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांचे भांडवल आणि देखभाल खर्च देखील कमी होईल.

म्हणूनच हे परवडण्याजोगे, आटोपशीर ट्रॅक्टर अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांच्या उपयोगी येऊन बैलगाडीच्या नांगराची जागा घेतील. 

हे तंत्रज्ञान जवळपासच्या गावांमध्ये आणि विविध उत्पादकांना दाखवण्यात आले आहे. रांची येथील एका एमएसएमई ने या ट्रॅक्टर्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात रुची दाखवली आहे. शेतकऱ्यांना विविध राज्य सरकारांच्या निविदांच्या माध्यमातून अनुदानित दराने ट्रॅक्टर्स पुरवण्याची त्यांची योजना आहे.

 ***

NM/BhaktiS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2029279) Visitor Counter : 752