संरक्षण मंत्रालय

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी भारतीय लष्कराच्या डी 5 मोटारसायकल मोहिमेला दिल्लीतून केले रवाना

Posted On: 27 JUN 2024 7:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2024

 

भारतीय लष्कराच्या डी 5 मोटारसायकल मोहिमेला लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे झेंडा दर्शविला. वर्ष 1999 च्या कारगिल युद्धातील भारताच्या विजयाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय लष्कराकडून ही मोहीम आयोजित केली जात आहे. आजच्या कार्यक्रमाला लष्कर उपप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, वरिष्ठ सेनाधिकारी, कारगिल युद्धातील अधिकारी, वीर नारी आणि माजी सैनिक उपस्थित होते. मोहिमेला झेंडा दर्शविण्यापूर्वी लष्करप्रमुखांनी बाईकस्वारांशी संवाद साधला आणि मोहिमेतील पथकाच्या प्रमुखाकडे ध्वज सोपवला. आर्मी वाइव्ह्स वेल्फेअर असोसिएशनच्या  (आवा) अर्चना पांडे यांनी या कार्यक्रमात वीर नारींचा सत्कार केला.

या देशव्यापी मोहिमेला  12 जून  2024 रोजी देशाच्या तीन कोपऱ्यातून म्हणजे पूर्वेला दिनजन, पश्चिमेला द्वारका आणि दक्षिणेला धनुषकोडी येथून सुरुवात झाली. प्रत्येकी आठ मोटारसायकलस्वारांचा समावेश असलेल्या तीन पथकांनी  दिल्लीला पोहोचण्यापूर्वी विविध भूप्रदेश आणि आव्हानात्मक मार्गांवरून प्रवास केला. त्यानंतर दिल्ली छावणी क्षेत्रात 26 जून 2024 रोजी माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) दीपक कपूर यांनी पथकांना झेंडा दाखवला. जनरल दीपक कपूर यांनी कारगिल युद्धवीरांचे कौतुक केले. तसेच या मोहिमेतील पथकांची प्रशंसा करून मोहिमेला साहाय्य केल्याबद्दल  प्रायोजकांचे आभार मानले. या कार्यक्रमाला सेवेतील अधिकारी, कारगिल युद्धातले वीर, वीर नारी आणि लष्करी कुटुंबे असे मिळून सुमारे 500 व्यक्ती उत्साहाने सहभागी उपस्थित होत्या.

दिल्लीच्या पुढे पथकांनी आता दोन वेगवेगळ्या मार्गांनी द्रासकडे मार्गक्रमण केले आहे. एक पथक अंबाला, अमृतसर, जम्मू, उधमपूर आणि श्रीनगर मार्गे 1,085 किमी तर दुसरे पथक  चंडीमंदिर, मनाली, सरचू, न्योमा, तांगत्से आणि लेह मार्गे 1,509 किमी मार्गक्रमण करणार आहे. द्रासमधल्या गन हिल येथे या मोहिमेचा समारोप होईल.  या ठिकाणाचे नाव  कारगिल युद्धादरम्यानच्या सामरिक महत्त्वासाठी इतिहासात कोरले गेले आहे. पथके आपल्या मार्गावर कारगिल युद्ध वीरांची, माजी सैनिकांची आणि वीर नारींची भेट घेत आहेत. तसेच युद्ध स्मारकांवर आदरांजली वाहत आहेत आणि भारतीय लष्कराबाबत माहिती पोहोचवत सहभागी होण्यासाठी युवा पिढीला प्रोत्साहित करत आहेत.

या पथकाचे नेतृत्व, 'ऑपरेशन विजय'चे यश सुनिश्चित करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या तोफखाना रेजिमेंटकडून केले जात आहे. द्रासमधील आपल्या गंतव्य स्थानाकडे मार्गक्रमण करत असताना पथक आपल्यासोबत शौर्याच्या, त्यागाच्या, देशभक्तीच्या कथांचा ठेवाही प्रस्तुत करणार आहे. ही मोहीम कारगिल युद्धातील वीरांच्या शौर्याला आणि बलिदानाला आदरांजली आहे आणि भारतीय सैन्याच्या चिरस्थायी विजिगीषू भावनेचे प्रतीक आहे. कारगिल युद्धवीरांना मानवंदना म्हणून हीरो मोटोकॉर्प, एचपीसीएल, अपोलो हॉस्पिटल्स, इफको आणि  बँक ऑफ बडोदा यांनी हा उपक्रम प्रायोजित केला आहे.

 

* * *

S.Patil/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029175) Visitor Counter : 20