सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
दिव्यांगजनांचे भारतभरात सामूहिक योग प्रदर्शन
प्रविष्टि तिथि:
21 JUN 2024 6:26PM by PIB Mumbai
10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, देशभरातील दिव्यांग व्यक्तींनी सामूहिक योग कार्यक्रमांद्वारे निरोगी राहण्याचा संकल्प केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सर्वांसाठी योग" या संकल्पनेनुसार 10,000 दिव्यांगजनांनी भारतातील विविध ठिकाणी योगासने केली. दृष्टिदोष, श्रवणदोष, चलनवलनातील अपंगत्व, बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्व, स्वमग्नता, सेरेब्रल पाल्सी यासह विविध अपंगत्व असलेल्या व्यक्ती आणि थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त लोक या सामूहिक योग कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागातर्फे हे योग प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

देशभरातील 30 वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय संस्था, संमिश्र प्रादेशिक केंद्रे (CRCs), भारतीय कृत्रिम अवयव निर्माण महामंडळ (ALIMCO) आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ (NDFDC) या संस्थांसोबत या कार्यक्रमांचे समन्वयन करण्यात आले.

दृष्टी दिव्यांगांसाठीच्या राष्ट्रीय संस्थेने (NIEPVI) एक योग कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये 500 लोक सहभागी झाले होते. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. आज देशभरात एकाच वेळी योगाची प्रात्यक्षिके केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. विभागाच्या सर्व राष्ट्रीय संस्था आणि संमिश्र प्रादेशिक केंद्रांनी योगाच्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच दिव्यांगजनांनी योग साधनेचा स्वीकार करावा यासाठी वेबिनार आयोजित केले होते.
दिल्ली ते केरळ आणि गुजरात ते पश्चिम बंगाल अशा 17 राज्यांतील दिव्यांगजनांनी या आयोजनामध्ये भाग घेतल्याचे डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी अधोरेखित केले. याशिवाय नागपूर, भोपाळ, त्रिपुरा, बालंगीर, नॉएडा, नवी येथील विभागाच्या संयुक्त प्रादेशिक केंद्रे (CRCs) आणि मुंबई, कोलकाता येथील बौद्धिक दिव्यांगासाठी राष्ट्रीय संस्थेची प्रादेशिक केंद्रे (NIEPID) आणि सीआरसी वेल्लोर यांनी विविध ठिकाणी योग शिबिरे घेतली.
***
S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2027815)
आगंतुक पटल : 66