माहिती आणि प्रसारण मंत्रालय
लघुपट हे एखाद्या कवितेप्रमाणे असतात, प्रत्येक वेळी बघताना आपल्याला नव्याने काहीतरी गवसल्याचा आनंद देतात : ॲना हेंकेल-डोनर्समार्क
तुमच्या स्वप्नांसाठी कोणीतरी दुसरे कधीच योगदान देणार नाही : समीर मोदी
एक भक्कम, वैशिष्ट्यपूर्ण आणि चित्तवेधक कथा नेहमीच तिच्या प्रेक्षकाला स्वतःच्या ताकदीवर शोधते : टिस्का चोप्रा
18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "लघुपटांचा प्रसार: प्रवेश, पोहोच आणि व्याप्ती" या विषयावर आकर्षक पॅनेल चर्चासत्राचे आयोजन
Posted On:
20 JUN 2024 6:00PM by PIB Mumbai
मुंबई, 20 जून 2024
18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज "लघुपटांचा प्रसार: प्रवेश, पोहोच आणि व्याप्ती" या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण अशा पॅनेल चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि चित्रपट उद्योगातले तज्ञ सहभागी झाले होते.
चित्रपट निर्मात्या आणि बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील बर्लिनेल शॉर्ट्स स्पर्धेच्या प्रमुख ॲना हेंकेल-डोनर्समार्क यांनी लघुपट आणि कविता यांच्यात असलेले साधर्म्य सांगून या चर्चासत्राचा आरंभ केला. लघुपट हे एखाद्या कवितेप्रमाणे असतात, प्रत्येक वेळी बघताना आपल्याला काहीतरी नव्याने गवसल्याचा आनंद देतात, असे त्यांनी सांगितले. त्यांनी जगातील सर्वात मोठ्या लघुपट महोत्सवांपैकी एक असलेल्या बर्लिनेल शॉर्ट्स स्पर्धेचे महत्व अधोरेखित केले. चित्रपट निर्मात्यांनी, अपुरा निधी आणि साधनसंपत्तीचा अभाव या अडथळ्यांकडे आपल्या सृजनशीलतेला व्यक्त करण्यासाठी मिळालेली संधी म्हणून पहावे, असे त्यांनी सांगितले. "एका उत्कृष्ट कल्पनेच्या जोरावर तुम्ही केवळ आयफोन वरून देखील सुंदर चित्रपटाची कलाकृती निर्माण करू शकता" असे मत त्यांनी व्यक्त केले.
भारतात फिचर फिल्म उद्योग अत्यंत सामर्थ्यशाली असला तरी लघुपटांची बाजारपेठ म्हणून क्षमता देखील अफाट आहे, असे पॉकेट फिल्म्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक समीर मोदी यांनी सांगितले. "लघुपट हे एक साधेसोपे मात्र तरीही अत्यंत परिणामकारक असे कथा मांडण्याचे माध्यम आहे. हे एक असे माध्यम आहे ज्यामधून वास्तवतेची झलक दिसते." असे समीर यांनी सांगितले. आशयघन कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात डिजिटल क्रांतीची भूमिका याविषयी त्यांनी आपले विचार मांडले आणि हे नवनवीन शोध अधिक सहजसोपे करण्यासाठी योग्य व्यासपीठांच्या गरजेवर भर दिला. समीर यांनी निधी पुरवठ्याच्या आव्हानांबाबत चर्चा केली आणि चित्रपटनिर्मात्यांनी नवनवीन संधी शोधून स्वतःच मार्ग शोधावेत, असा सल्ला दिला. तुमच्या स्वप्नांसाठी कोणीतरी दुसरे कधीच योगदान देणार नाही, असे ते म्हणाले.
लघुपट हे फिचर फिल्म्स पर्यंत पोहोचण्यासाठीची एक पायरी नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या कक्षेत, वलयात स्वयंपूर्ण असतात, असे प्रसिद्ध अभिनेत्री टिस्का चोप्रा म्हणाल्या. "लघुपट हे फिचर फिल्म्स पर्यंत पोहोचण्यासाठीची एक पायरी नव्हेत. ते स्वतः एक मौल्यवान रत्नासारखे आहेत, ज्यांचा प्रत्येक क्षण आपल्याला तल्लीनतेकडे नेतो" असे त्यांनी सांगितले. भारतात असलेल्या कथाकथनाच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेबद्दल सांगून त्या म्हणाल्या की एक नवीन, वैशिष्ट्यपूर्ण आणि चित्तवेधक कथा नेहमीच तिच्या प्रेक्षकाला स्वतःच्या ताकदीवर शोधते."
माहितीपट आणि लघुपट निर्मात्या विकेयेनो झाओ, यांनी लघुपटांसाठी विपणन आणि वितरण यासारख्या महत्त्वपूर्ण समस्यांना अधोरेखित केले. लघुपटांच्या प्रदर्शनासाठी अधिक उत्तम व्यासपीठाची आणि त्यांना जास्त चांगल्या प्रकारे व्याप्ती मिळण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असे मत मीडिया एंटरटेनमेंट आणि स्किल कौन्सिलचे व्यवस्थापकीय संचालक मोहित सोनी यांनी व्यक्त केले. चित्रपटनिर्मिती क्षेत्रात अधिकाधिक शैक्षणिक संस्था आणि उत्कृष्टता केंद्रांची निर्मिती व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लघुपटांकरता काही खास ओटीटी प्लॅटफॉर्मची निर्मिती केली जावी असे सांगून ते म्हणाले की व्यावसायिक लघुपटांच्या निर्मितीमधून अधिक सर्जनशील प्रकल्पांना निधी मिळू शकेल.
या आकर्षक सत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध माहितीपट निर्माते पंकज सक्सेना यांनी केले.
सर्व उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांनी आपल्या स्वप्नातील प्रकल्प प्रत्यक्षात जरूर आणावा या अत्यंत आश्वासक मुद्द्यावर या चर्चासत्राची सांगता झाली. "माझ्या हृदयात एक अतिशय सुंदर चित्रपट दडलेला आहे, जो मी आतापर्यंत कधीच निर्माण आणि प्रदर्शित केलेला नाही" अशी भावना चर्चासत्राची सांगता होताना सर्वांच्याच मनात होती. पॅनल सदस्यांनी सर्व चित्रपटनिर्मात्यांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि चित्तवेधक कथानकाचा पाठपुरावा करण्याचे तसेच आपले कथानक नक्कीच प्रेक्षकांना स्वबळावर शोधेल, त्यांच्यापर्यंत पोहोचेल असा आत्मविश्वास बाळगण्याचे आवाहन केले.
* * *
PIB Team MIFF | S.Patil/B.Sontakke/D.Rane | 49
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2027142)
Visitor Counter : 42