श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेच्या निव्वळ सदस्य संख्येत एप्रिल 2024 महिन्यात सर्वाधिक 18.92 लाख सदस्यांची भर

Posted On: 20 JUN 2024 5:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2024


ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने  20 जून 2024 रोजी जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीमध्ये एप्रिल 2024 मध्ये   18.92 लाख सदस्य ईपीएफओशी जोडले गेल्याचे अधोरेखित केले आहे. एप्रिल 2018 मध्ये पहिला वेतनपट  डेटा प्रकाशित झाल्यापासून एप्रिल 2024 या महिन्यातील ही वाढ आतापर्यंतची सर्वाधिक आहे. मार्च 2024 महिन्याच्या तुलनेत चालू महिन्यात निव्वळ सदस्य संख्येत 31.29% ने वाढ झाली आहे.एप्रिल 2024 मध्ये सुमारे 8.87 लाख नवीन सदस्यांनी नावनोंदणी केल्याचे आकडेवारीतून दिसून येते.आकडेवारीचा एक लक्षणीय पैलू म्हणजे यामध्ये 18-25 वयोगटाचे वर्चस्व आहे, जे एप्रिल 2024 मध्ये नव्याने जोडलेल्या एकूण सदस्यांपैकी लक्षणीय  55.50% आहे. या संघटित कर्मचाऱ्यांमध्ये सामील झालेल्या बहुसंख्य व्यक्ती प्रामुख्याने पहिल्या नोकरीच्या शोधात असलेले तरुण आहेत.

वेतनपट आकडेवारीत अधोरेखित केले आहे  की, सुमारे 14.53 लाख सदस्य बाहेर पडले आणि नंतर ईपीएफओमध्ये पुन्हा सामील झाले.हा आकडा मार्च 2024 च्या  तुलनेत 23.15% वाढ दर्शवतो. या सदस्यांनी त्यांच्या नोकऱ्या बदलल्या आणि ईपीएफओच्या कक्षेत समाविष्ट असलेल्या आस्थापनांमध्ये पुन्हा रुजू झाले आणि त्यांची जमा रक्कम परत मागण्याऐवजी ती पुन्हा खात्यात वळवण्याला पसंती दिली, ज्यामुळे त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक हितसंबंधांचे रक्षण झाले आणि त्यांना सामाजिक संरक्षण पुढे सुरू राहिले.

वेतनपटाच्या लिंगनिहाय विश्लेषणानुसार या महिन्यात समाविष्ट झालेल्या एकूण 8.87 लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे 2.49 लाख नवीन महिला सदस्य आहेत. तसेच, या महिन्यात समाविष्ट झालेल्या एकूण महिला सदस्यांची संख्या 3.91 लाख इतकी आहे जी मार्च 2024 च्या  तुलनेत अंदाजे 35.06%ची वाढ दर्शवते.महिला सदस्यांची ही भर अधिक समावेशक मनुष्यबळाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात होत असलेल्या स्थित्यंतराचे निदर्शक आहे.

वेतनपट आकडेवारीच्या राज्यनिहाय विश्लेषणानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि हरियाणा या 5 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये निव्वळ सदस्यसंख्या सर्वाधिक आहे. एकूण सदस्यसंख्येत या राज्यांचा वाटा सुमारे 58.30% टक्के असून या महिन्यात एकूण 11.03 लाख सदस्यांची भर पडली आहे. सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र, महिनाभरात एकूण 20.42% सदस्य संख्येसह आघाडीवर आहे.

वरील वेतनपट आकडेवारी तात्पुरती आहे कारण डेटा निर्मिती ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत करणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे.

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


                             

 


(Release ID: 2027115) Visitor Counter : 62