ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

केंद्राने अनाहूत आणि अनुचित व्यावसायिक संभाषण, 2024 च्या प्रतिबंध आणि नियमनासाठी मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्याविषयी मागवल्या सार्वजनिक सूचना


प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वे बिगर-नोंदणीकृत टेलिमार्केटियर किंवा 10-अंकी खाजगी क्रमांकांपासून उद्भवलेल्या अनाहूत किंवा अनुचित व्यावसायिक संभाषणाचे नियमन करण्यासाठी आहेत

ग्राहक व्यवहार विभागाने 30 दिवसांच्या आत टिप्पण्या/सूचना (21 जुलै, 2024 पर्यंत) मागवल्या

Posted On: 20 JUN 2024 4:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2024


भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने अनाहूत आणि अनुचित व्यावसायिक संभाषण, 2024 च्या प्रतिबंध आणि नियमनासाठी मसुदा मार्गदर्शक तत्त्वांवर लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. मसुदा मार्गदर्शक तत्त्वे सार्वजनिक टिप्पण्या/सूचना/प्रतिसादासाठी ग्राहक व्यवहार विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 21 जुलै 2024 पर्यंत आपले अभिप्राय विभागाला सादर करता येतील. मसुदा मार्गदर्शक तत्वे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:

https://consumeraffairs.nic.in/sites/default/files/file uploads/latestnews/Guidelines%20for%20the%20Prevention%20and%20Regulation%20of%20Unsolicited%20and%20Unwarranted%20Business%20Communication%2C%202024.pdf

ही मार्गदर्शक तत्वे दूरसंचार ऑपरेटर, दूरसंचार नियामक आणि दूरसंचार संस्थांसह विविध हितधारकांसोबत तपशीलवार चर्चा केल्यानंतर तयार करण्यात आली आहेत.

ग्राहक व्यवहार विभागाने (डीओसीए) ने भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरणाशी (ट्राय) विचारविनिमय करून मोबाईल वापरकर्त्यांवरील अनाहूत आणि अनुचित संभाषणाच्या प्रभावाचा सखोल अभ्यास केला. असे निदर्शनास आणून देण्यात आले की ट्राय नियम-दूरसंचार व्यावसायिक संभाषण ग्राहक प्राधान्य नियम, 2018 (टीसीसीसीपीआर -2018) असूनही, असे दिशाभूल करणारे आणि फसवे संवाद मोबाईल वापरकर्त्यांसाठी त्रासदायक ठरले आहेत. डू नॉट डिस्टर्ब (डीएनडी) नोंदणी शाखा नोंदणीकृत टेलीमार्केटरसाठी अत्यंत प्रभावी ठरली आहे परंतु नोंदणी नसलेले टेलीमार्केटर आणि 10 अंकी खाजगी क्रमांक वापरणाऱ्यांकडून अनुचित संप्रेषण कायम आहे.

वरील समस्येचे निराकरण करण्यासाठी, दूरसंचार विभाग (डिओटी), भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय), सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय), भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), व्होडाफोन आयडिया, रिलायन्स आणि एअरटेल यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती दिनांक 15.02.2024 रोजी ग्राहक व्यवहार विभागाच्या संयुक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली. समितीने विस्तृत विचारमंथन केल्यावर एक प्रारूप आराखडा सुचवला ज्याची विभागाने तपासणी केली. वैयक्तिक संवाद खेरीज जाहिरात आणि सेवा संप्रेषणासह वस्तू किंवा सेवांशी संबंधित कोणतेही संप्रेषण अशी " व्यावसायिक संभाषणा" ची व्याख्या मसुदा मार्गदर्शक तत्वांमध्ये केली आहे. मार्गदर्शक तत्त्वे अशा सर्व व्यक्ती आणि आस्थापनांना लागू आहेत जे व्यावसायिक संभाषण (घडवतात ) करतात ; असे संभाषण घडवणाऱ्याला सहभागी करून घेतात ; जे या  संभाषणाचे अपेक्षित लाभार्थी आहेत ; आणि ज्यांच्या  नावाने असा संवाद घडवण्यात आला आहे.

मसुदा मार्गदर्शक तत्त्वे कोणत्याही व्यावसायिक संभाषणास अनाहूत  आणि अनुचित  व्यावसायिक संभाषण म्हणून वर्गीकृत करतात जर असे संभाषण संवाद  प्राप्तकर्त्याच्या संमतीनुसार किंवा नोंदणीकृत पसंतीनुसार नसेल. मसुदा मार्गदर्शक तत्त्वांच्या परिशिष्ट 1 मध्ये विहित केलेल्या इतर अटी खालीलप्रमाणे आहेत:

  1. ट्राय /दूरसंचार विभागाद्वारे विहित केलेल्या क्रमांकाव्यतिरिक्त किंवा दूरसंचार सेवा प्रदात्यांकडे नोंदणीकृत नसलेल्या एसएमएस हेडर व्यतिरिक्त अन्य क्रमांकाद्वारे संभाषण केले असेल
  2. दूरसंचार सेवा प्रदात्यांद्वारे व्यवस्थापित डीएनडी रजिस्ट्रीमध्ये नोंदणी करून अशा कोणत्याही संप्रेषणाची निवड रद्द करण्याची ग्राहकांची विनंती किंवा सूचना असूनही असे संभाषण सुरू करणे
  3. विशिष्ट ब्रँड/लाभार्थी आणि त्यांच्या संबंधित उत्पादनासाठी असे  संप्रेषण प्राप्त करण्यासाठी ग्राहकांकडून डिजिटल स्वरूपात स्पष्ट आणि विशिष्ट संमती न घेता अशा संप्रेषणाची सुरुवात करणे;
  4. दूरध्वनी करणाऱ्या  संस्था आणि दूरध्वनीचा उद्देश स्पष्टपणे न ओळखता असा संवाद साधणे
  5. अनधिकृत कर्मचारी किंवा एजंट मार्फत अशा संभाषणाची सुरुवात;
  6. निवड रद्द करण्याचा स्पष्ट, सोपा, विनामूल्य आणि प्रभावी पर्याय न देता तसेच ग्राहकांनी निवड रद्द करण्याचा पर्याय निवडल्यास निवड रद्द करण्याची पुष्टी न करता संवाद  सुरु करणे
  7. “टेलिकॉम कमर्शिअल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन 2018” या ट्रायचे  नियमन आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या निर्देशांचे किंवा इतर कोणताही कायदा/नियम अंतर्गत वेळोवेळी जारी केलेल्या इतर निर्देशांचे उल्लंघन करून असे संप्रेषण सुरू करणे.

विशेषत: वाढत्या विस्तारत असलेल्या अवकाशात ग्राहकांचे हित आणि ग्राहक हक्कांचे रक्षण करण्यासाठी  विभाग कटिबद्ध आहे,. प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वे ग्राहकांचे  आक्रमक आणि अनधिकृत विपणन किंवा वस्तू आणि सेवांच्या जाहिरातीपासून संरक्षण करतील.

मसुदा मार्गदर्शक तत्त्वांबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंकला भेट द्या :

(https://consumeraffairs.nic.in/sites/default/files/file-uploads/latestnews/Guidelines%20for%20the%20Prevention%20and%20Regulation%20of%20Unsolicited%20and%20Unwarranted%20Business%20Communication%2C%202024.pdf).

 

S.Patil/V.Joshi/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2027070) Visitor Counter : 31