कोळसा मंत्रालय

केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांनी वाटप झालेल्या कोळसा खाणी जलद गतीने कार्यान्वित करण्यावर दिला भर

Posted On: 20 JUN 2024 3:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2024


केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज नवी दिल्ली येथे कॅप्टिव (कंपन्यांच्या मालकीच्या) आणि व्यावसायिक कोळसा खाणींच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी कोळसा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वाटप केलेल्या कोळसा खाणी लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने जलद मंजुरी सुनिश्चित करण्यासाठी, तसेच त्याबाबतच्या समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी राज्य सरकार आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयासह सर्व भागधारकांशी समन्वय साधण्यावर त्यांनी यावेळी भर दिला.

‘कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भरता’, म्हणजेच स्वावलंबी बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, तसेच  आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कोळशाचे अधिक उत्पादन करण्याची गरज अधोरेखित करून राज्य स्तरावर संस्थात्मक बळकटीकरणाला पाठबळ देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कोळसा खाणी लवकरात लवकर कार्यान्वित करता याव्यात यासाठी सर्व कोळसा खाण धारकांना नियमितपणे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे ते म्हणाले.  

आतापर्यंत, कोळसा मंत्रालयाने 575 मेट्रिक टन सर्वोच्च बोली क्षमतेच्या 161 कोळसा खाणींचे वाटप/लिलाव केले आहे. त्यापैकी 58 खाणींना खाण कार्यान्वित करण्याची परवानगी मिळाली असून 54 खाणी कार्यरत आहेत. गेल्या वर्षी या खाणींनी एकूण 147 मेट्रिक टन कोळशाचे उत्पादन केले आहे, जे देशाच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या 15% इतके आहे.

खाण क्षेत्र लिलाव प्रक्रियेला गती द्यावी, तसेच लिलावाच्या पुढील फेऱ्यांमध्ये जास्तीतजास्त  ब्लॉक्स उपलब्ध करावेत, जेणेकरून त्यामध्ये अधिकाधिक गुंतवणूकदार सहभागी होतील, असे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी दिले. कोळसा खाण लिलावाच्या तांत्रिक पात्रतेसाठी कोळसा खाणकामाचा कोणताही पूर्वानुभव आवश्यक नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आर्थिक दृष्ट्‍या सक्षम असलेली कोणतीही कंपनी लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकते, कारण आता कोळसा खाणींचा लिलाव कोळशाच्या विक्रीच्या उद्देशाने केला जात असून, वापरकर्ता कोणीही असू शकतो. कोणत्याही  गुंतवणूकदाराला कोळसा खाणीच्या लिलावामध्ये सहभागी होता येईल, आणि अशा खाणींमधील  कोळसा उत्पादन निर्यातीसह कोणत्याही कारणासाठी खुल्या बाजारात विकता येईल.

केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी उद्या, 21 जून 2024 रोजी कोळसा खाणींच्या व्यावसायिक लिलावाच्या 10व्या फेरीचा शुभारंभ करतील, जेणेकरून कोळसा खाणींचा लिलाव आणि त्या कार्यान्वित होण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल.


S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2027011) Visitor Counter : 33