नागरी उड्डाण मंत्रालय

वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 19 JUN 2024 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जून 2024

केंद्रीय मंत्रिमंडळाने वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) मांडलेल्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला  मंजुरी मिळाली. या प्रस्तावात विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीची उभारणी, अॅप्रनचा (विमाने उभी करण्याच्या जागेचा) विस्तार, धावपट्टीचा विस्तार, टॅक्सीसाठी समांतर मार्गिका आणि इतर संलग्न कामांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत या विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता वार्षिक  3.9 दशलक्ष प्रवासी (million passengers per annum - MPPA ) इतकी आहे. या विकास कामानंतर विमानतळाच्या प्रवासी हाताळणी क्षमतेत वाढ होऊन ती प्रतिवर्ष 9.9  दशलक्ष प्रवासी इतकी होणार आहे. या प्रस्तावित कामांसाठी अंदाजे 2869.65 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. आज मंजुरी मिळालेल्या प्रस्तावानुसार विमानतळासाठी  75,000 चौरस मीटर क्षेत्रफळ क्षेत्राची नवी टर्मिनल इमारत उभारली जाणार आहे. या नव्या इमारतीची हाताळणी क्षमता प्रतिवर्ष 6 दशलक्ष प्रवासी इतकी असणार आहे, तर सर्वाधिक वर्दळीच्या  काळात म्हणजेच पिक अवर्समध्ये ही क्षमता 5000 प्रवासी (PHP) इतकी असणार आहे.

या इमारतीच्या रचनेतून वाराणसी शहराच्या अवाढव्य सांस्कृतिक वारशाची  झलक दिसेल  अशा पद्धतीने याचे  आरेखन केले गेले आहे.

या प्रस्तावात विमानतळाची धावपट्टी 4075 मीटर बाय 45 मीटर विस्तारावी तसेच 20 विमाने पार्क करण्यासाठी नवीन एप्रनही उभारावे असेही प्रस्तावित केले गेले आहे. वाराणसी विमानतळ हे हरित विमानतळ म्हणून विकसित केले जाणार आहे. त्याअंतर्गत या विमानतळाच्या उभारणीत पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी ऊर्जेचा पूरेपूर क्षमतेने वापर, कचऱ्याचा पुनर्वापर, कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात घट साध्य करणे, सौर ऊर्जेचा वापर आणि दिवसा असलेल्या नैसर्गिक प्रकाशाच्या उपयोग अशी प्राथमिक स्तरावरील उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली आहेत. या सोबतच विमानतळाच्या नियोजन, विकास आणि कार्यान्वयाच्या टप्प्यांदरम्यानही इतर शाश्वत उपाययोजनांचा अवलंब केला जाणार आहे.

N.Chitale/T.Pawar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2026772) Visitor Counter : 29