माहिती आणि प्रसारण मंत्रालय

18 व्या मिफ्फ मध्ये “क्राफ्टिंग द मॅजिक: ॲनिमेशन चित्रपटांची उत्क्रांती आणि तरुण आणि प्रौढांवरील त्याचा दीर्घकालीन प्रभाव' या विषयावरील पॅनेल चर्चासत्राचे आयोजन


हृदयातून जन्माला आलेला चित्रपट, लाखो हृदये काबीज करतो: मोहम्मद खीरअन्दिश

जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी जागतिक मानसिकता गरजेची: केतन मेहता

भारतीय ॲनिमेशन चित्रपट देखील फीचर फिल्म्सप्रमाणे जगावर राज्य करतील: जॅकी भगनानी

Posted On: 18 JUN 2024 10:20PM by PIB Mumbai

मुंबई, 18 जून 2024

 

"भारत हे आशयसंपन्न सामग्रीचे ऊर्जा केंद्र आहे. अत्युच्च सृजनशील महत्त्वाकांक्षा आणि जागतिक मानसिकता, याच्या बळावर आपली आशय संपन्न सामग्री जगभर पोहोचेल,” आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट निर्माते केतन मेहता यांनी आज 18 व्या मिफ्फ, म्हणजेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (MIFF) पार्श्वभूमीवर आयोजित मंत्रमुग्ध करणाऱ्या पॅनल चर्चेत सांगितले. भारतातील ॲनिमेशन आणि डिजिटल व्हिज्युअल इफेक्ट्सच्या क्षेत्रातील अग्रगण्य नावांमधील एक असलेल्या केतन मेहता यांनी सांगितले की, ही वेळ भारतीय ॲनिमेशन चित्रपटांची आहे, आणि ते चित्रपट रसिकांच्या मनाची पकड घेण्यासाठी सज्ज आहेत.

ॲनिमेशन चित्रपट निर्मितीवर परिणाम करणाऱ्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकताना, या ज्येष्ठ चित्रपट निर्मात्याने नमूद केले की, उत्पादन खर्च आणि वितरण बाजारपेठेचा अभाव, हे प्रमुख अडथळे आहेत. “आपल्याला हे  दुष्टचक्र भेदून, अधिक उत्कटतेने चित्रपट बनवायचे आहेत. स्वतः बनवलेल्या चित्रपटांनी आपण समाधानी नसू, तर आपण ते बनवूच नयेत,” ते पुढे म्हणाले.

पॅनेल चर्चेत सहभागी होताना, ख्यातनाम इराणी लेखक, दिग्दर्शक आणि 19 वर्षांहून अधिक काळ ॲनिमेशन क्षेत्राचा अनुभव असणारे, कॅरेक्टर डिझायनर मोहम्मद खीरअन्दिश  म्हणाले की, त्यांच्या चित्रपटांचा आशय वास्तविकता आणि स्थानिक परंपरा प्रतिबिंबित करते, आणि ॲनिमेशनच्या माध्यमातून प्रभावीपणे जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. “हृदयातून जन्माला आलेला चित्रपट, लाखो हृदये काबीज करतो,” त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय एमी-नामांकित ॲनिमेशन चित्रपट निर्माता आणि मुंबईतल्या वैभव स्टुडिओचे संस्थापक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर वैभव कुमारेश यांनी ॲनिमेशनद्वारे प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेण्याचे सार सांगितले. “मी माझ्या चित्रपटाचा पहिला प्रेक्षक आहे. जर चित्रपटाने माझ्यावर प्रभाव पाडला, तर नक्कीच तो माझ्या प्रेक्षकांनाही भावेल. प्रेक्षकांची नस ओळखणे, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे,” त्यांनी अधोरेखित केले.

भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात तरुण निर्मात्यांपैकी एक, जॅकी भगनानी, म्हणाले  की, भारत हा आशयसंपन्न सामग्री आणि प्रतिभेचे उदयोन्मुख ऊर्जा केंद्र असून, या प्रतिभेचा योग्य शोध घेण्याची आणि त्याचे संगोपन करण्याची गरज आहे."आपण सध्या वापरात असलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने, येत्या काही वर्षांमध्ये सुयोग्य व्यासपीठ मिळाल्यावर भारतीय ॲनिमेशन चित्रपट फीचर फिल्म्सप्रमाणे जगावर राज्य करतील," त्यांनी विश्वास व्यक्त केला.

लाइव्ह-ॲक्शन, ॲनिमेशन, गेमिंग आणि VFX मधील 27 वर्षांचा अनुभव असलेले कलाकार, निर्माता, आणि दिग्दर्शक मुंजाल श्रॉफ यांनी या चर्चा सत्राचे सूत्रसंचालन केले.

 

* * *

PIB Team MIFF | N.Chitale/R.Agashe/D.Rane | 38

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2026379) Visitor Counter : 36