कृषी मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून पीएम-किसान सन्मान निधी योजने अंतर्गत सुमारे 20,000 कोटी रुपयांचा 17 वा हप्ता केला जारी


योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर झाल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

आमच्यासाठी शेतकरी हाच देव असून शेतकऱ्यांची सेवा करणे म्हणजे देवाची आराधना करणे आहे - केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान

Posted On: 18 JUN 2024 9:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 18 जून 2024


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमध्ये पीएम-किसान सन्मान निधी योजने अंतर्गत,सुमारे 20,000 कोटी रुपयांचा 17 वा हप्ता जारी केला आणि 30,000 हून अधिक बचत गटांना कृषी सखी प्रमाणपत्रे वितरित केली. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि इतर राज्यमंत्री यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित तसेच  तंत्रज्ञानाद्वारे कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांचे अभिनंदन  केले, आणि कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये जमा झाल्याचे नमूद केले.

3 कोटी ‘लखपती दीदी’ तयार करण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल असलेल्या कृषी सखी उपक्रमाविषयीही त्यांनी सांगितले.

पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये तंत्रज्ञानाने बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली आणि 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेंतर्गत आपली नोंदणी करण्यासाठी उपयोगी ठरलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा विशेष उल्लेख केला.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण आणि ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी हा त्याचा आत्मा आहे. आमच्यासाठी शेतकरी हाच देव असून शेतकऱ्यांची सेवा करणे म्हणजे देवाची आराधना करण्यासारखे आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की आज पंतप्रधानांच्या केवळ एका क्लिक द्वारे सुमारे 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये जमा झाल्यावर, योजने अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली एकूण रक्कम 3,24,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या पथदर्शक आराखड्यावर सातत्याने काम सुरु आहे.किसान क्रेडिट कार्डसारख्या अनोख्या योजनेमुळे शेतकऱ्याची सावकारांच्या तावडीतून सुटका झाली आहे आणि छोटे शेतकरी किसान सन्मान निधीतून खते आणि बियाणांची तरतूद करत आहेत. शिवराज सिंह चौहान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभाग अहोरात्र काम करेल आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही कसर ठेवणार नाही.

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2026359) Visitor Counter : 43