माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सुब्बिया नल्लामुथू यांनी मिफ्फ मधील पत्रकार परिषदेत आपल्या पहिल्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची केली घोषणा


मी वाघाला नेहमी माणूस म्हणून पाहतो: नल्लामुथु

फुटेजेस मिळवणे सोपे आहे, परंतु कथा शोधणे कठीण आहे; सर्व फुटेजेस कथा सांगत नाहीत

Posted On: 18 JUN 2024 9:00PM by PIB Mumbai

मुंबई, 18 जून 2024

 

प्रसिद्ध वन्यजीव लघुपट निर्माते सुब्बिया नल्लामुथू यांनी आज 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने  आयोजित पत्रकार परिषदेत आपले विचार मांडले तसेच नव्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची घोषणा केली. "फुटेजेस मिळवणे सोपे आहे, परंतु आकर्षक आणि खिळवून ठेवणारी  कथा शोधणे कठीण आहे कारण सर्व फुटेजेस कथा सांगत नाहीत," असे  सुब्बिया नल्लामुथू म्हणाले.

प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, नल्लामुथू यांनी  वन्यजीव चित्रपट निर्मितीमध्ये आकर्षकरित्या कथा मांडण्याच्या महत्त्वावर भर दिला. "कोणत्याही भौतिक नायकापेक्षा आशय  हा माझ्यासाठी खरा नायक आहे" असे त्यांनी नमूद केले.

सुब्बिया नल्लामुथू, जे त्यांच्या कामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात, त्यांनी त्यांच्या पहिल्या महत्वाकांक्षी चित्रपटाबाबत माहिती देताना सांगितले की, हा  इको-थ्रिलर चित्रपट असेल जो वाघांच्या विस्मयकारक प्रवासावर केंद्रित असेल.  हा अभिनव चित्रपट एक दशकाहून अधिक काळ जंगलात टिपलेल्या वाघांच्या वास्तविक फुटेजला एका कथेत गुंफेल आणि हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिलाच प्रयोग असेल.  वन्यजीव आशय,  प्रेरक गाणी आणि ॲक्शन-पॅक सीक्वेन्सचे मिश्रण करून तळागाळातील आणि जागतिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा  या चित्रपटाचा उद्देश आहे. “आम्ही एक मनोरंजक कथा सांगण्यासाठी  वास्तविक फुटेज टाकत आहोत. गुलजार साहब, शंतनू मोईत्रा आणि दर्शन कुमार यांसारख्या चित्रपट सृष्टीतील  दिग्गजांनी  या चित्रपटावर काम करण्यास होकार दिला आहे, याचा मला आनंद आहे असे नल्लामुथू यांनी सांगितले.

मिफ्फ 2024 मध्ये व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार पटकावणाऱ्या या चित्रपट निर्मात्यांनी  वाघांवर चित्रपट बनवतानाचे त्यांचे थरारक अनुभव सामायिक  केले आणि त्यांच्या विषयांशी एक दृढ  भावनिक बंध असल्याची भावना व्यक्त केली.  “मी वाघांना कधीच प्राणी किंवा अमुक एक गोष्ट असे   मानले नाही. मी वाघांकडे नेहमीच माणूस म्हणून पाहतो. मी त्यांच्या सर्व भावना आणि हालचाली माणसांशी जोडतो,” असे त्यांनी नमूद केले.

माहितीपट निर्मितीतील  उदयोन्मुख कल संबंधी चर्चा करताना, नल्लामुथू यांनी नॉन-फिक्शन आशयाचे वेगळेपण आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते आकर्षक आणि मनोरंजक चित्रपटाच्या स्वरूपात  सादर करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी वन्यजीव चित्रपट निर्मात्यांसमोरील महत्त्वपूर्ण आव्हानांचाही उल्लेख केला. ज्यात निधी पुरवठा , वितरण व्यवस्था  आणि जंगलात शूटिंग करताना येणाऱ्या अडचणींचा समावेश आहे. “वन्यजीव चित्रपट निर्मितीमध्ये, तुम्हाला वेगवेगळ्या काळात  आणि जागेत वास्तविक पात्राचे अनुसरण करणे आवश्यक असते  जे एक मोठे आव्हान आहे. त्याशिवाय, तुम्हाला सरकारी नियम आणि निकषांचे पालन करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

समारोप करताना त्यांनी मिथक आणि गैरसमज दूर करण्यासाठी वन्यजीवांबद्दल अधिक जागरूकतेची गरज असल्याचे अधोरेखित केले जेणेकरून  या शैलीबद्दल लोकांमध्ये कुतूहल वाढेल. अशी जागरूकता वन्यजीव चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळवून देईल आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना हातभार लावेल यावर त्यांनी भर दिला.

 

* * *

PIB Team MIFF | M.Chopade/S.Kane/D.Rane | 35

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2026344) Visitor Counter : 48