आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ‘स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ या संकल्पनेवर केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांचा भर


श्रीनगरमध्ये होणार या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा सोहोळा

वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणाला चालना देणाऱ्या योगाच्या दुहेरी भूमिकेवर प्रकाश

Posted On: 18 JUN 2024 6:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2024

‘स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ ही यावर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणातील योगाची दुहेरी भूमिका अधोरेखित करते यावर केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी भर दिला. "सामाजिक सौहार्द वाढवताना योग हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक वाढीस पोषक ठरतो," असे त्यांनी नमूद केले."अलिकडच्या वर्षांत लाखो लोकांचा उत्साही सहभाग हा योगाचा समाजावर होणारा सखोल प्रभाव प्रतिबिंबित करतो" हे सांगताना तळागाळातील सहभाग आणि ग्रामीण भागात योगाचा प्रसार करण्यासाठी पंतप्रधानांनी प्रत्येक ग्रामप्रधानाला पत्र लिहिल्याचेही त्यांनी जाहीर केले.पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत या वर्षीचा आयडीवाय अर्थात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा सोहळा होणार असून तो श्रीनगरमध्ये आयोजित केला जाईल.

10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी या सोहोळ्याची रूपरेषा विशद करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  जागतिक स्तरावर योगाचा प्रचार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. वर्ष 2015 पासून, पंतप्रधानांनी दिल्लीतील कर्तव्य पथ, चंदीगड, डेहराडून, रांची, जबलपूर आणि अगदी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयासह विविध प्रतिष्ठित ठिकाणी आयडीवाय सोहोळ्याचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे योगाची जागतिक लोकप्रियता आणि मान्यता लक्षणीयरीत्या वाढली असल्याचे  जाधव म्हणाले.

गेल्या 10 वर्षांत, आयडीवाय ने चार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत.

आयुष मंत्र्यांनी दृष्टिहीनांना योग शिकण्यात मदत व्हावी तसेच सोयीने त्यांना सराव करता यावा याकरिता ब्रेल लिपीत ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’ (योगाची सर्वसामान्य नियमावली) पुस्तकाचे अनावरण केले. त्यांनी योगावरील प्रोफेसर आयुष्मान कॉमिक चेही अनावरण केले. "हे पुस्तक मुलांना आवड निर्माण करून मनोरंजनाद्वारे योगा शिकण्यास आणि सराव करण्यास मदत करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एक विशेष उपक्रम म्हणून, यावर्षी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 निमित्त 'योगा फॉर स्पेस' अर्थात अंतराळासाठी योग या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करत आहे. कॉमन योगा प्रोटोकॉल मार्गदर्शक तत्त्वांनुसार इस्रोचे सर्व शास्त्रज्ञ आणि अधिकारी एकत्र योग करतील. गगनयान प्रकल्पातील चमू या प्रसंगी योगाचा सराव करून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या जागतिक मोहिमेत सामील होणार आहे.

योगाच्या क्षेत्रात तंत्रज्ञान आणि स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालयाने MyGov पोर्टल आणि MyBharat पोर्टलवर योग टेक चॅलेंजचे आयोजन केले आहे. योगाशी संबंधित साधने विकसित करणाऱ्या तसेच सॉफ्टवेअर आणि उत्पादनांचे सुटे भाग विकसित करणाऱ्या व्यक्ती किंवा स्टार्टअप्स ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचा या योग तांत्रिक आव्हानांचा उद्देश आहे.

दिल्लीत,आयुष मंत्रालयाने 21 जून 2024 रोजी सामूहिक योग कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी एनडीएमसी (नवी दिल्ली महानगरपालिका), एएसआय (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) आणि डीडीए दिल्ली विकास प्राधिकरण यांच्याशी सहयोग केला आहे. मंत्रालयाला ब्रह्मा कुमारी, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली, गायत्री परिवार, ईशा योग केंद्र, हार्टफुलनेस आणि अन्य बऱ्याच सामाजिक संस्थांचे मोठे पाठबळ मिळत आहे.

जनतेच्या सहभागाकरिता आयुष मंत्रालयाने अनेक स्पर्धा आणि उपक्रम सुरू केले आहेत. एक उल्लेखनीय उपक्रम म्हणजे MyGov आणि MyBharat प्लॅटफॉर्मवर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) च्या भागीदारीत आयोजित केलेल्या "कुटुंबासह योग" व्हिडिओ स्पर्धा. ही स्पर्धा जगभरातील कुटुंबांना आयडीवाय 2024 सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करून योगाचा आनंद दर्शविते आणि कौटुंबिक बंध अधिक मजबूत करते. यासाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत 30 जून 2024 आहे.

#YogaWithFamily व्हिडीओ स्पर्धेतील सहभागींना योगाचा आरोग्यविषयक आणि एकतेचा संदेश देत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. मंत्रालयाने जागतिक वापरासाठी अनेक प्रमुख हॅशटॅग देखील तयार केले आहेत: #InternationalDayofYoga2024, #YogaForSelfAndSociety, #YogaWithFamily आणि #IDY2024. जगभरातील लोकांना या जागतिक चळवळीत सामील होण्यासाठी या हॅशटॅगचे अनुसरण करण्यास आणि वापरण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे.  

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2026247) Visitor Counter : 158