माहिती आणि प्रसारण मंत्रालय

18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशियाई महिला चित्रपट निर्मात्यांच्या सन्मानार्थ विशेष निवडक पॅकेजचा अंतर्भाव

Posted On: 17 JUN 2024 9:15PM by PIB Mumbai

मुंबई, 17 जून 2024

 

चित्रपट उद्योगातील महिलांचे प्राबल्य, लवचिकता आणि सर्जनशीलतेच्या सन्मानार्थ 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) "आशियाई महिला चित्रपट निर्मात्या" नावाच्या एका विशेष निवडक पॅकेजचा अंतर्भाव आहे. आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीच्या आंतरराष्ट्रीय महिला संघटनेने सादर केलेला हा अनोखा संग्रह, प्रेक्षकांसाठी विविध प्रेरणादायी कथानकांद्वारे सबलीकरण, यशाचा वेध आणि समानतेचा शोध या विषयांवर प्रकाश टाकतो. 

संपूर्ण आशियातील सहा महिला दिग्दर्शकांच्या कलागुणांचे प्रदर्शन करणाऱ्या पाच अविस्मरणीय चित्रपटांचा समावेश  "आशियाई महिला चित्रपट निर्मात्या" पॅकेजमध्ये आहे. प्रत्येक चित्रपट अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक आव्हाने आणि महिलांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीबद्दल एक अद्वितीय दृष्टीकोन प्रदान करतो.

या विशेष गुलदस्त्यात समाविष्ट असलेले चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत:

1) ड्युएट 

एकिन इल्कबाग आणि इडिल अक्कुस दिग्दर्शित, "ड्युएट" हा मिसरा आणि डेफने या दोन समक्रमित जलतरण जोडीदार आणि जिवलग स्नेहींची कथा उलगडतो, जे 2016 मध्ये अयशस्वी झाल्यानंतर 2020 ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा प्रयत्न करतात. एक अकार्यक्षम फेडरेशन, कोविड-19 महामारी आणि महिला आणि LGBTQIA+ (समलिंगी) समुदायावर अत्याचार करणाऱ्या समाजात राहण्यासारख्या आव्हानांनी भरलेला त्यांचा जीवनप्रवास आहे. हा चित्रपट दर्शकांना निर्धार आणि चिकाटीने अडथळ्यांवर मात करण्यास प्रोत्साहित करतो, पात्रांच्या भावनेला मूर्त रूप देतो.

दिग्दर्शिकेविषयी:

  • एकिन इल्कबाग: युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स लंडनची पदवीधर, एकिन सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी इस्तंबूलला परतली. "ड्युएट" (2022), या तिच्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्पणातील चित्रपटाने 59 व्या अंतल्या गोल्डन ऑरेंज फिल्म फेस्टिव्हलमध्ये विशेष ज्युरी पारितोषिक जिंकले.
  • इदिल अक्कुस: इस्तंबूल येथे स्थित एक स्वतंत्र दिग्दर्शक आणि चित्रपट संपादक, इदिलने इस्तंबूल विद्यापीठातून पदवी घेतली आहे. तिने प्रामुख्याने दूरचित्रवाणी मालिका आणि माहितीपटांमध्ये काम केले आहे.

 

2) टकीला सूर्यास्त

जिन्सुई सॉन्ग दिग्दर्शित, हा चित्रपट जिया या 70 वर्षीय महिलेचा जीवनपट उलगडतो, जी तिच्या स्मृतिभ्रंशग्रस्त पतीची काळजी घेण्याच्या जबाबदारीला तोंड देण्यासाठी सर्जनशील उपायांची कल्पना करते. जियाचा प्रवास वृद्ध महिलांच्या संघर्ष आणि स्वप्नांचा मार्मिक शोध आहे.

दिग्दर्शिकेविषयी:

  • जिन्सुई सॉन्ग: चीनच्या शेन्झेनमध्ये वाढलेल्या जिन्सुईने पारंपरिक मूल्ये आणि आधुनिक आकांक्षा यांच्यातील समतोल साधला आहे. तिचे चित्रपट चिनी आणि चिनी-अमेरिकन महिलांच्या अनुभवांवर केंद्रित आहेत.

 

3) अमेरिकन ड्रीम

रेनी शी चा हा ॲनिमेशनपट एका लहान मुलीची कथा सांगतो जी शाळेतील गोळीबारात मृत असल्याचे नाटक करून स्वतःचा जीव वाचवते. हा चित्रपट अशा शोकांतिकेतील सर्व पीडितांना समर्पित असून जे बचावले आहेत त्यांनी अनुभवलेल्या प्रदीर्घ आघाताचा धांडोळा घेतो.

दिग्दर्शिकेविषयी:

  • रेनी शी: व्हर्जिनियातील फेअरफॅक्स येथे जन्मलेली, रेनी ही हायस्कूलची विद्यार्थिनी आहे जिला चित्रकला, ॲनिमेटिंग, लेखन आणि विणकामाची आवड आहे. "अमेरिकन ड्रीम" ही शालेय गोळीबारात बळी पडलेल्यांना तिची मनापासून श्रद्धांजली आहे.

 

4) हॅपी इंडिपेडन्स डे 

Camila Sagyntkan दिग्दर्शित, हा चित्रपट कझाकस्तानच्या नवीन ओळखीच्या शोधाचा एक रूपकात्मक वेध आहे. सामाजिक आणि राजकीय बदलांदरम्यान, प्रेम गमावल्यानंतर जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी धडपडणारा एक मध्यमवयीन माणूस मरत याच्यावर आधारित हा चित्रपट आहे.

दिग्दर्शिकेविषयी:

  • Camila Sagyntkan: अल्माटी येथील कथाकार, कॅमिला सेंट पीटर्सबर्ग येथे कायद्याची पदवी मिळवल्यानंतर कझाकिस्तानला परतली. तिने एक सहाय्यक दिग्दर्शिका, निर्माती, लेखिका आणि स्क्रिप्ट पर्यवेक्षक म्हणून काम केले आहे.

 

5) ट्रॅन्गल 

झिनो हादी दिग्दर्शित "ट्रॅन्गल" चित्रपट वैयक्तिकरित्या लैंगिक छळ अनुभवलेल्या दोन महिलांमधील अवघड नातेसंबंध उलगडतो. ज्यात त्या परस्पर सान्निध्यात आल्यावर त्यांनी केलेल्या बिकट परिस्थितीचा सामना आणि त्यांच्या अनुभवातील बारकावे दर्शवले आहेत. 

दिग्दर्शिकेविषयी:

  • झिनो हादी: लेमानिया येथे जन्मलेल्या झिनोने पत्रकारिता आणि नंतर सुलेमानिया विद्यापीठातून सिनेमात पदवी संपादन केली.

"आशियाई महिला चित्रपट निर्मात्या" पॅकेज म्हणजे सिनेविश्वातील महिलांच्या प्राबल्याचा आणि त्यांच्या समानतेच्या वेधाचा दाखला आहे. हे चित्रपट केवळ मनोरंजनच करत नाहीत तर प्रेक्षकांना वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतील स्त्रियांच्या नजरेतून जग पाहण्याची प्रेरणा आणि आव्हानही देतात.

 

* * *

PIB Team MIFF | S.Nilkanth/V.Joshi/D.Rane | 26

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025994) Visitor Counter : 53