माहिती आणि प्रसारण मंत्रालय

18 व्या मिफ्फमध्ये झालेल्या पॅनेल चर्चेत सामाजिक परिवर्तनाला चालना देण्यामध्ये माहितीपटांच्या क्षमतेचा घेण्यात आला वेध


चित्रपटनिर्माते केवळ देशासाठीच नव्हे तर संपूर्ण मानव जमातीसाठी उत्तरदायी आहेतः ज्येष्ठ कन्नड चित्रपट दिग्दर्शक डॉ. टी. एस. नागभरण यांचे मत

फीचर फिल्म आणि माहितीपट या दोन्हीमधून सामाजिक वास्तव प्रतिबिंबित होतेः डॉ. टी. एस. नागभरण

Posted On: 17 JUN 2024 5:56PM by PIB Mumbai

मुंबई, 17 जून 2024

 

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात(मिफ्फ-2024) आज “सामर्थ्य खुले करणे : सामाजिक परिवर्तनाला चालना देण्यामध्ये माहितीपटांच्या क्षमतेचा वापर” या विषयावर पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये ज्येष्ठ कन्नड चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते डॉ. टी. एस. नागभरण सहभागी झाले. सामाजिक परिवर्तनाला चालना देण्याच्या माहितीपटांच्या प्रचंड मोठ्या क्षमतेचा वेध घेणाऱ्या या सत्रात ज्वलंत  मुद्यांना प्रकाशात आणण्याची माहितीपटांची ताकद यांचा वेध घेणाऱ्या या सत्रात , कृती करण्याची प्रेरणा आणि महत्त्वाच्या सामाजिक बदलांना गती देण्याची क्षमता यावर भर देण्यात आला.  राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे(एनएफडीसी) महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

नामवंत माहितीपट निर्माते डॉ. टी. एस. नागभरण यांनी एक ताकदवान माध्यम म्हणून सिनेमाची जबाबदारी अधोरेखित केली. आधुनिक सिनेमा हा नेहमीच स्वतःला कोणत्याही मक्तेदारीविरहित क्षेत्रात पाहतो, जिथे कोणीही मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने देखील चित्रपट बनवू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र,  यावेळी त्यांनी एखाद्या चित्रपटाच्या यशासाठी आवश्यक असलेली शिस्त निर्माण करण्यासाठी “शिक्षणात सिनेमा आणि सिनेमातील शिक्षण” यांच्या महत्त्वावर भर दिला.

(छायाचित्र: 18व्या मिफ्फमध्ये डॉ. टी. एस. नागभरण, कन्नड चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते सहभागी झाले)

 

फीचर फिल्म्स आणि माहितीपट हे दोघेही सामाजिक वास्तव प्रतिबिंबित करतात आणि ते समाजासोबत अंतर्बाह्य जोडलेले असतात असे मत या व्यासंगी चित्रपट निर्मात्यांनी व्यक्त केले. समाजातील सद्यस्थितीमधील घडामोडीबाबत चित्रपटनिर्मात्यांनी जागरुक राहण्याची आणि त्यांच्या कामात सामाजिक संदर्भाचा आग्रह धरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “ माहितीपट हे सामाजिक परिवर्तनाचे कलात्मक साधन आहे. सत्याच्या मागे जाणे एका चित्रपट निर्मात्यासाठी सोपे नसते. सत्य नेहमीच दृष्टीला पडणारे नसते आणि बहुधा आभासी असते,” असे ते म्हणाले.

सात वेळा राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या या निर्मात्यांनी स्वतंत्र चित्रपट निर्मितीला योग्य पाठबळाची गरज देखील अधोरेखित केली आणि माहितीपटांमध्ये वस्तुस्थिती दाखवताना तिची सोयीस्कर मोडतोड करण्याविरोधात इशारा दिला. “ तुम्ही वस्तुस्थितीची पुन्हा निर्मिती केली तर ती वस्तुस्थिती राहात नाही. ती एक जुळवाजुळव असते.” त्यांनी माहितीपटाच्या निर्मात्यांनी आपल्या वैयक्तिक दृष्टीकोनाला इतरांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचवण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण दृश्यविषयक साक्षरता आणि सौंदर्यदृष्टी बाळगण्याचे देखील आवाहन केले. चित्रपट निर्मात्यांनी मांडलेले सत्य स्वीकारण्यामध्ये समाजासमोर असलेल्या आव्हानांना विचारात घेत डॉ. टी. एस. नागभरण यांनी प्रामाणिक चित्रपट निर्मितीद्वारे बदल आणण्याचा पुरस्कार केला. एखाद्या धोरणानुसार चित्रपट निर्मिती करण्याबाबत त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला. यामुळे त्याची वास्तविकता कमी होते आणि असत्य कथनाची निर्मिती होते असे  त्यांनी सांगितले. “ दृश्य भाषा हा जवळपास एका काव्यात्मक भाषेसारखाच एक वेगळा दृष्टीकोन आहे. आजच्या दृश्य भाषेने वास्तविकता टिपण्यासाठी काव्यात्मकता आणि  राजकारणामध्ये संबंध प्रस्थापित करून स्वतःला सिद्ध केले पाहिजे”, असे त्यांनी नमूद केले.   

चित्रपट निर्मात्यांची केवळ राष्ट्राप्रतीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेप्रती  जबाबदारी आहे यावर डॉ. टी. एस. नागभरण यांनी भर दिला. संदिग्धता आणि दिशाभूल करणारी नरेटीव्ह  टाळून,  चित्रपट निर्मितीमागिल उद्देशाची स्पष्टता, उदात्त हेतू पोहोचण्याची  सुनिश्चिती करतात असे त्यांनी ठामपणे सांगितले. भूतकाळात जेव्हा माहितीपट 10-मिनिटांच्या कालावधीसाठी मर्यादित होते, तेव्हा पटकथेवर असणाऱ्या मर्यादा आता विविध आधुनिक व्यासपीठाद्वारे दूर केल्या गेल्या आहेत आणि कथाकथनासाठी विस्तारित वेळ दिला जातो आहे, असे त्यांनी सांगितले.

(छायाचित्र :  डी. रामकृष्णन, महाव्यवस्थापक, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) सत्राचे संचालन करताना)

 

उदयोन्मुख तंत्रज्ञानावर चर्चा करताना या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासह दृश्य माध्यमांच्या नवीन टप्प्यावर प्रकाश टाकला.  सामाजिक परिवर्तनासाठी चित्रपट निर्मितीमध्ये तंत्रज्ञानाच्या अर्थपूर्ण एकरूपतेच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला तसेच या प्रगतीमुळे पुढील पिढीला त्यांच्या कल्पना व्यक्त करण्यात मदत करण्यासाठी एक नवीन दृश्य भाषा निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली. "बहुआयामी पद्धतीने विकास साधण्यासाठी, एखाद्याने बहुकुशल असणे आवश्यक आहे," असे त्यांनी सांगितले. 

जातीय भेदभाव, स्त्री-पुरुष भेद-भाव, पर्यावरणाचा ऱ्हास यासारख्या सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यात माहितीपटांची भूमिका महत्त्वाची आहे, अशी भावना एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन यांनी  सांगितले. माहितीपटांमध्ये समस्या ठळकपणे मांडण्याची, सहानुभूती जागृत करण्याची आणि कृती करण्यास प्रेरित करण्याची शक्ती असते, असे त्यांनी सांगितले. 

 

* * *

PIB Team MIFF | N.Chitale/Shailesh/Shraddha/D.Rane | 23

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025931) Visitor Counter : 44