माहिती आणि प्रसारण मंत्रालय

18व्या मिफ्फमध्ये माहितीपट निर्मितीसाठी निधीचा पुरवठा आणि महसूल निर्मितीसंबंधी रणनीतीबाबत झाली पॅनेल चर्चा


उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी एका निधीची स्थापना करण्याचा जम्मू आणि काश्मीरचा विचारः जतीन किशोर, संचालक, माहिती आणि जनसंपर्क विभाग, जम्मू आणि काश्मीर

माहितीपटाच्या अवकाशाचे वस्तुस्थितीदर्शक मनोरंजन म्हणून रिब्रँडिंग करण्यात आले आहेः नेटवर्क 18 चे कंटेंट अँड कम्युनिकेशन प्रेसिडेंट अरुण थापर

एमयूबीआय फीचर आणि नॉन-फीचर फिल्म्स असा भेदभाव न करता उच्च दर्जाच्या आशयाला प्राधान्य देतेः प्रोग्रामिंग संचालक स्वेतलाना नौडियाल

माहितीपटाच्या मान्यतेसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही पूर्वअट नाही- डॉक्युबेचे मुख्य परिचालन अधिकारी गिरीश द्विभाष्यम

Posted On: 16 JUN 2024 8:05PM by PIB Mumbai

मुंबई, 16 जून 2024

 

माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशन फिल्म्सच्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज “बियॉन्ड द लेन्सः फंडिंग अँड मॉनिटायजेशन इन डॉक्युमेंटरी फिल्ममेकिंग” या विषयावर एका लक्षवेधी पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली. या सत्रामध्ये माहितीपटांच्या निर्मितीसाठी निधीपुरवठा  करण्याच्या आणि नफा मिळवण्याच्या नावीन्यपूर्ण पद्धतींवर चर्चा करण्यात आली. यासाठी आपल्या कथा जिवंत करण्यासाठी निर्मात्यांनी त्यांचे बहुमूल्य विचार मांडले. 

या सत्राची सुरुवात जतीन किशोर, आयएएस, माहिती आणि जनसंपर्क विभाग, जम्मू आणि काश्मीर यांनी केली. त्यांनी जम्मू आणि काश्मीरला चित्रपट निर्मितीचे एक प्रमुख स्थान म्हणून प्रसिद्धी देण्याचा उद्देश असलेले नवे धोरण या बैठकीत अधोरेखित केले. “माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशन फिल्म्ससाठी आम्ही कमाल 1.5 कोटी रुपयांचे अनुदान देऊ करत आहोत,” असे त्यांनी सांगितले. त्याशिवाय एक खिडकी प्रणालीमुळे चित्रपटनिर्मात्यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये चित्रिकरण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी होईल, असे त्यांनी नमूद केले. उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी एक निधी स्थापन करण्याच्या जम्मू आणि काश्मीर प्रशासनाच्या योजनेची देखील जतीन किशोर यांनी घोषणा केली. 

एमयूबीआआयच्या आशिया-प्रशांत क्षेत्राच्या प्रोग्रामिंग डायरेक्टर स्वेतलाना नौडियाल यांनी माहितीपटाच्या सध्या उदयाला येणाऱ्या परिदृश्यावर भर दिला. माहितीपटांनी एक खूप मोठा पल्ला गाठला आहे, पण तरीही अजून बरेच काही करणे बाकी आहे, असे त्यांनी सांगितले. एमयूबीआयमध्ये फीचर आणि नॉन फीचर असा कोणताही भेदभाव न करता उच्च दर्जाच्या आशयाला प्राधान्य दिले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. 

नेटवर्क 18 चे कंटेंट अँड कम्युनिकेशनचे सिनियर मीडिया एक्झिक्युटिव्ह आणि प्रेसिडेंट अरुण थापर यांनी माहितीपटकारांच्या कलाकार आणि पत्रकार अशा दुहेरी भूमिका अधोरेखित केल्या. माहितीपटांच्या अवकाशाचे रिब्रँडिंग झाले असून त्यामुळे वस्तुस्थितीदर्शक मनोरंजनाचा उदय झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. माहितीपटकार समाजात एक महत्त्वाची भूमिका बजावत असतात, मात्र त्यांची वाटचाल ही सहजसोपी नसते याकडे थापर यांनी लक्ष वेधले.  माहितीपटांना अर्थसहाय्य मिळवण्यात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी बाजाराच्या मागण्या विचारात घेऊन पुरवठा केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. “या महोत्सवाचे परिमंडळ चित्रपटांना प्रत्यक्ष स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सवर नेण्यापूर्वी त्यांची प्रसिद्धी करण्यासाठी एक बहुमूल्य मंच आहे. गर्दी आकर्षित करणे हा देखील एक व्यवहार्य निधीपुरवठा पर्याय आहे,” थापर यांनी नमूद केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकी बाजारपेठेसोबत तुलना करत सार्वजनिक प्रसारण सेवेचे महत्त्व आणि सरकारचे पाठबळ यावर भर दिला. 

डॉक्युबे चे मुख्य परिचालन अधिकारी गिरीश द्विभाष्यम यांनी स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्ससोबत संपर्क साधण्याबाबतचा आपला दृष्टीकोन मांडला. माहितीपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या माहितीपटासाठी आपले विषय व्यापक प्रेक्षकवर्गाला आकर्षित करणारे असतील हे सुनिश्चित करावे, असे त्यांनी सांगितले. द्विभाष्यम म्हणाले की जागतिक स्तरावर लक्ष वेधणारे किंवा भारताविषयीचे चांगल्या पद्धतीने संशोधन असलेले विषय असावेत. डॉक्युबेमध्ये अनुभवी चित्रपटनिर्माते आणि तरुण चित्रपट निर्माते यांच्या आशयाचे संतुलन राखले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे प्रसिद्धीला चालना मिळू शकते, मात्र मान्यतेसाठी ती पूर्वअट नाही, अतिशय चांगल्या प्रकारच्या संशोधनावर आधारित चांगले कथानक आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकते, असे त्यांनी सांगितले.  

फिल्म मॉस्कोचे संस्थापक ईलिया टोल्स्टोव यांनी रशियन बाजारपेठेतील वाढत्या संधींची माहिती दिली.  एकेकाळी पाश्चिमात्य आशयाचे जागतिक स्तरावर वर्चस्व होते, मात्र आता परिदृश्य बदलत चालले आहे, असे ते म्हणाले. संकल्पनांच्या सह-निर्मितीसाठी ते तयार आहेत आणि चित्रपटनिर्मात्यांना पाठबळ देण्यासाठी उत्सुक आहेत, असे त्यांनी सांगितले. 

तक्षशीला मल्टीमीडियाच्या संस्थापक आणि लाईफोग्राफर रजनी आचार्य यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. माहितीपट निर्मितीमधल्या जोखमीच्या विषयांना त्यांनी अधोरेखित केले. माहितीपटांच्या यशाचे गुणोत्तर सुमारे 10% आहे आणि चित्रपट निर्मात्यांनी  90% जोखमीसाठी तयार असले पाहिजे. माहितीपट निर्मात्यांसमोर असलेले सर्वात मोठे आव्हान म्हणजे निधीचा पुरवठा, असे सांगत त्यांनी समारोप केला.

 

* * *

PIB Team MIFF | S.Kane/S.Patil/D.Rane | 16

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025753) Visitor Counter : 24