माहिती आणि प्रसारण मंत्रालय
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 2024 मध्ये देशांतर्गत राष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत 77 चित्रपटांची निवड
माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन विभागातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना प्रतिष्ठेच्या रौप्य शंख पुरस्काराने गौरवले जाणार
18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'इंडिया इन अमृत काल' वरील लघुपटासाठी विशेष पुरस्कार दिला जाणार
वर्गातील विद्यार्थी ते स्पर्धक : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये राष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांची निर्मिती असलेले 12 चित्रपट स्पर्धेत
Posted On:
16 JUN 2024 4:13PM by PIB Mumbai
मुंबई, 16 जून 2024
18 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे अभिनव मांडणीने समृद्धतेचा अनुभव देणाऱ्या चित्रपट निर्मितीचा अर्थात सिनेमॅटिक उत्कृष्टतेच्या शोधाचा प्रारंभ करणारे व्यासपीठच ठरले आहे. या महोत्सवात यंदा भारतीय चित्रपट क्षेत्राची बहुरंगी बहुढंगी कलात्मक गुंफण दिसून येत आहे. यंदा या महोत्सवासाठी 840 इतक्या विक्रमी संख्येने प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी अत्यंत कलात्मक मांडणीने निर्मिती केलेल्या 77 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत निवडलेले चित्रपट हे 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत भारतीय नागरिकांनी भारतातच निर्मिती केलेले चित्रपट आहेत.
यंदा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 15 जून 2024 रोजी सुरुवात झाली असून, येत्या 21 जून 2024 पर्यंत हा महोत्सव रंगणार आहे. यंदाचा हा महोत्सव भारतीय चित्रपटसृष्टीच्या भविष्याचा वेध घेणारा महोत्सव आहे. यंदा राष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत निवड झालेल्या चित्रपटांमध्ये नवोदित दिग्दर्शकांचे उल्लेखनीय 30 चित्रपट आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 12 चित्रपट कलाकृतींनीही स्थान मिळवले आहे. या सर्वांच्या कलाकृती म्हणजे नवे दृष्टीकोन आणि नाविन्याचा शोधाच्या प्रतिक्षेतील कथा आहेत. राष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत निवड झालेल्या चित्रपटांची संपूर्ण यादी आपण पुढे दिलेल्या दुव्यावर पाहू शकता.
https://miff.in/wp-content/uploads/2024/06/National-Competition-MIFF-2024.pdf
राष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत विविध तीन गटांमधील स्पर्धांसाठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे :
- राष्ट्रीय माहितीपट स्पर्धा : या विभागात चित्रपट रसिकांना विचारमग्न करणाऱ्या 30 माहितीपटांची निवड करण्यात आली आहे.
- राष्ट्रीय स्पर्धा : लघुकथा आणि अॅनिमेशन : या गटात निवड झालेल्या, लघुकथेच्या स्वरुपात आणि अॅनिमेशन माध्यमाचा वापर करून निर्मिती केलेले 41 चित्रपट हे सर्व चित्रपट रसिकांना कोणतीही कथा प्रभाविपणे सांगण्याच्या कसब आणि कौशल्याची साक्ष देणारे आहेत.
- राष्ट्रीय स्पर्धा : इंडिया इन अमृत काल : या संकल्पनाधारीत विषयावर निर्मित, देशाच्या भवितव्याचा वेध घेतल्याचा अनुभव देणारे सहा विशेष चित्रपट या गटात स्पर्धेसाठी निवडले आहेत
या सर्व गटांमधील स्पर्धांसाठी दिले जाणारे प्रतिष्ठेचे पुरस्कार (खाली सूचीबद्ध केले आहेत) विजेत्या चित्रपटांची, चित्रपट दिग्दर्शकांची आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. या पुरस्कारांसाठीच अभिनवतेची साक्ष देणाऱ्या या चित्रपटकर्त्यांची निर्मिती खऱ्या अर्थाने स्पर्धेत उतरली आहे, इतकेच नाही तर या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांमुळे, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धेतील या चित्रपटांच्या सहभागाला एका प्रेरणादायी सोहळ्याचेच रुप दिले आहे.

पुरस्कारांचे स्वरुप :
राष्ट्रीय स्पर्धा पुरस्कार:
- सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपट: रौप्य शंख आणि 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक.
- सर्वोत्कृष्ट भारतीय काल्पनिक लघुपट (30 मिनिटांपर्यंत): रौप्य शंख आणि 3 लाख रुपये रोख पारितोषिक.
- सर्वोत्कृष्ट भारतीय ॲनिमेशन चित्रपट: रौप्य शंख आणि 3 लाख रुपयांचे रोख पारितोषिक.
- सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट (प्रायोजित पुरस्कार): चषक आणि रोख बक्षीस 1 लाख रुपये.
- सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपट (प्रायोजित पुरस्कार): चषक आणि 1 लाख रुपये रोख पारितोषिक.
- "इंडिया इन अमृत काल" वरील सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी विशेष पुरस्कार (15 मिनिटांपर्यंत): केवळ भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी खुला असलेला हा पुरस्कार चषक आणि रोख 1 लाख रुपये स्वरूपात आहे.
तांत्रिक पुरस्कार (राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सामायिक):
- सिनेमॅटोग्राफी: प्रमाणपत्र आणि 3 लाख रुपयांचे रोख पारितोषिक
- संकलन : प्रमाणपत्र आणि 3 लाख रुपयांचे रोख बक्षीस
- साउंड डिझाइन: प्रमाणपत्र आणि 3 लाख रुपयांचे रोख बक्षीस
अतिरिक्त पुरस्कार :
FIPRESCI ज्युरी पुरस्कार: आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक महासंघ (FIPRESCI) चे प्रतिनिधित्व करणारे तीन प्रतिष्ठित चित्रपट समीक्षक राष्ट्रीय स्पर्धेत माहितीपटाला पुरस्कार प्रदान करतील.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी ज्युरी
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्गजांचे एक प्रतिष्ठित पॅनेल राष्ट्रीय स्पर्धेचे परीक्षण करेल. त्यांचे कौशल्य आणि अनुभव विवेकपूर्ण निवड प्रक्रियेची खातरजमा करेल.
या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ज्युरी सदस्यांमध्ये जर्मन चित्रपट निर्माते ॲडेल सीलमन (दास वेईब रौशेन, ॲलेस ऑफ डाय सिबझेन) चित्रपट निर्माते डॉ. बॉबी सरमा बरुआ (मिशिंग, सोनार बरन पाखी), ॲनिमेटर मुंजाल श्रॉफ (क्रिश, त्रिश आणि बाल्टीबॉय) निर्माती अपूर्वा बक्षी (दिल्ली क्राइम) आणि जर्मन चित्रपट निर्माते अण्णा हेंकेल-डॉनर्समार्क यांचा समावेश आहे.
ज्युरी सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपट, लघुपट, ॲनिमेशनपट , सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपट आणि तांत्रिक पुरस्कारांसह राष्ट्रीय स्पर्धा पुरस्कार वितरित करतील. "इंडिया इन अमृत काल" वरील सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी विशेष पुरस्कार विजेते देखील ते निवडतील.
अधिक माहितीसाठी www.miff.in वर लॉग इन करा.
* * *
PIB Team MIFF | S.Kane/Tushar/Vasanti/D.Rane | 12
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2025689)
Visitor Counter : 296