ग्रामीण विकास मंत्रालय

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या विविध योजनांच्या आढावा बैठका सातत्याने सुरू


एकेकाळी बँकेशी संबंध नसलेल्या महिला ‘उद्याच्या लखपती’ ठरल्या आहेत -चौहान

100% ग्रामीण वस्त्यांना वर्षभर वाहतुकीयोग्य रस्त्याने जोडण्यासाठी प्रयत्न करण्याची मंत्र्यांची सूचना

Posted On: 13 JUN 2024 5:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2024
 

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी पदभार स्वीकारल्यानंतर सुरु केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध योजनांच्या आढावा बैठका जारी ठेवल्या आहेत. योजनांच्या विभागीय कृती आराखड्याचे सर्व पैलू समजून घेत केंद्रीय मंत्र्यांनी महिला बचत गटांना बळकटी देण्यासाठी ठोस पावले उचलण्याच्या सूचना केल्या. तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचे उद्दीष्ट गाठण्याचे त्यांचे स्वप्न असून ठरवलेल्या तीन वर्षांच्या मुदतीपूर्वीच हे ध्येय गाठण्याकरता सर्व संबंधितांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. लखपती दिदी उपक्रमाला गती देण्याकरता व त्याच्या अंमलबजावणीत काही अडथळे असल्यास त्यावर उपायांबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच राज्य ग्रामीण विकास मंत्र्यांसह बैठक घेणार असल्याचे चौहान म्हणाले. दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन (डीएवाय-एनआरएलएम) अंतर्गत प्रयत्नांची प्रशंसा करत चौहान यांनी महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीत वाढ करण्याच्या हेतूने ब्रँडिंग व विपणनासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.

महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कर्जाच्या समस्येवर उपाय केले जात असून एकेकाळी बँकांशी संबंध नसलेल्या महिला उद्याच्या लखपती आहेत, हे महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे उत्तम उदाहरण आहे, असे केंद्रीय मंत्री चौहान यांनी सांगितले.

प्रधान मंत्री ग्राम सडक योजना (पीएमजीएसवाय) चा आढावा घेताना मंत्र्यांनी निरीक्षण मांडले की ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरली असून विकसित भारतासाठी तिची अंमलबजावणी सातत्यपूर्ण राखणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील 100% वस्त्यांना वर्षभर वाहतुकीयोग्य राहतील अशा रस्त्यांनी जोडण्यावर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना त्यांनी केली. ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी केलेल्या नव्या उपाययोजनांची स्तुती करत दर्जा उंचावण्याचे काम सर्व स्तरांवर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2025059) Visitor Counter : 44