सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील शपथविधीनंतर लगेचच खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून सरकारच्या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याला गती
Posted On:
11 JUN 2024 4:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने , मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील शपथविधी समारंभानंतर लगेचच सरकारच्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याला गती दिली आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी सोमवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत देशातल्या 7 हजार 444 केंद्रांना 299.25 कोटी रुपयांचे मार्जिन मनी अनुदान वितरीत केले. देशभरातील लाभार्थ्यांना मंजूर कर्जाच्या निधीतून 81,884 नवीन रोजगार निर्माण करण्यात आले आहेत.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी खादी परिवाराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले. शपथविधी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून लाभार्थ्यांना 299.25 कोटी रुपयांच्या अनुदानाचे वितरण होणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचे लाभ आता दुप्पट वेगाने नागरिकांना मिळतील याचेच द्योतक आहे, असे त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग प्रत्येक गावागावात ‘खादी ग्राम स्वराज अभियान’ अधिक बळकट करण्यासाठी एका कृति आराखड्यावर काम करत आहे, असे ते म्हणाले. खादीला स्थानिक पातळीवरून जागतिक स्तरावर नेण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या हमीमुळे खादी आणि ग्रामोद्योगाची उत्पादने जागतिक स्तरावर लोकप्रिय झाली हे मनोज कुमार यांनी अधोरेखित केले. गेल्या दहा वर्षात 'नवीन भारताची नवीन खादी' या उपक्रमाने " आत्मनिर्भर भारत योजनेला' नवीन दिशा दिली. त्यामुळे या कालावधीत खादी उत्पादनांच्या विक्रीत चौपट वाढ झाली. खादी उत्पादने आणि त्यांच्या विक्रीत वाढ झाल्याने ग्रामीण भारतातील कारागिरांना आर्थिक सुबत्ता आली, असे मनोज कुमार यांनी सांगितले.
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2024152)
Visitor Counter : 84