संरक्षण मंत्रालय

भारतातील चार बँकांच्या 1,128 शाखांमध्ये स्पर्श सेवा केंद्रे सुरू करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचे सामंजस्य करार

Posted On: 05 JUN 2024 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जून 2024

 

संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण लेखा विभागाने (डीएडी)  बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या चार बँकांशी सामंजस्य करार केला आहे. या करारावर नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे देशभरातील या चार बँकांच्या 1,128 शाखा स्पर्श अर्थात सिस्टीम फॉर पेन्शन अँडमिनिस्ट्रेशन (रक्षा) प्रणालीसाठी सेवा केंद्र म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे  प्रामुख्याने दुर्गम भागातील निवृत्तीवेतनधारकांना स्पर्श प्रणालीचा वापर करताना कनेक्टिव्हिटी मिळून तांत्रिक अडचणी येणार नाहीत.

या सेवा केंद्रांमुळे निवृत्ती वेतनधारकांना त्यांची माहिती अद्ययावत करणे, तक्रारींची नोंद करणे, डिजिटल वार्षिक ओळख, डेटा पडताळणी करण्यासाठी माध्यम उपलब्ध होईल. त्याचबरोबर त्यांच्या मासिक निवृत्ती वेतनाविषयीची तपशीलवार माहिती मिळेल. त्यांच्यासाठी ही सेवा मोफत आहे. नाममात्र सेवा अधिभार डीएडीद्वारे वहन केले जाईल.   

या करारामुळे स्पर्श सेवा आता एकूण 15 बँकेतील 26,000 हून अधिक शाखांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरच देशभरात डीएडीची समर्पित 199 सेवा केंद्रे आणि 3 लाख 75 हजार सामान्य सेवा केंद्रे आहेत.

संरक्षण निवृत्ती वेतनधारकांना सर्वसमावेशक सेवा प्रदान करणे हा स्पर्श या संरक्षण मंत्रालयाच्या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्षमता, प्रतिसाद आणि पारदर्शकतेवर भर देणारा संरक्षण निवृत्तीवेतन व्यवस्थापनातील हा एक मूलभूत बदल आहे.

 

* * *

S.Kakade/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022916) Visitor Counter : 52