शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय ई-पुस्तकालयासाठी संस्थात्मक आराखडा विकसित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील नॅशनल बुक ट्रस्ट या संस्थेशी केंद्रीय शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार

Posted On: 03 JUN 2024 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जून 2024

 

राष्ट्रीय ई-पुस्तकालय नामक डिजिटल वाचनालय मंचाच्या उभारणीसाठी संस्थात्मक आराखडा निर्माण करण्याच्या उद्देशाने  केंद्रीय उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील नॅशनल बुक ट्रस्ट या संस्थेशी केंद्रीय शालेय शिक्षण विभागाने आज सामंजस्य करार केला. केंद्रीय उच्च शिक्षण विभाग सचिव के. संजय मूर्ती; केंद्रीय शालेय शिक्षण तसेच साक्षरता विभाग  सचिव संजय कुमार; संयुक्त सचिव अर्चना शर्मा यांच्यासह मंत्रालयातील इतर अनेक वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

याप्रसंगी केलेल्या भाषणात, के. संजय मूर्ती यांनी, बिगर-शैक्षणिक पुस्तके विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील शिक्षणाच्या शाखा निवडण्यात उपयुक्त ठरतात असे सांगत अशा पुस्तकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना संजय कुमार यांनी, पुस्तके वाचण्याची सवय विकसित करण्याच्या महत्त्वावर अधिक भर दिला. ते म्हणाले की, राष्ट्रीय ई-पुस्तकालय वाचकांसाठी अहोरात्र उपलब्ध असेल आणि कोणत्याही भौगोलिक ठिकाणाहून त्याचा वापर करता येत असल्यामुळे या मंचावरील पुस्तके वाचकांसाठी अधिक सुलभतेने उपलब्ध असतील. राष्ट्रीय ई-पुस्तकालय सुविधेमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये दुर्गम भागात वाचनालय उपलब्ध नसण्याची समस्या सुटेल असे देखील ते पुढे म्हणाले. येत्या 2-3 वर्षांत या मंचावर 100 हून अधिक भाषांतील 10000 पेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध होतील असे त्यांनी सांगितले. 

संयुक्त सचिव अर्चना शर्मा यांनी राष्ट्रीय ई-पुस्तकालय सुविधेमध्ये बिगर-शैक्षणिक पुस्तकांच्या समावेशाचे महत्त्व अधोरेखित केले. 

देशातील अशा पद्धतीचे पहिलेच वाचनालय असलेल्या राष्ट्रीय ई-पुस्तकालयामध्ये लहान बालके तसेच किशोर-किशोरींसाठी 40 पेक्षा जास्त नामांकित प्रकाशकांनी इंग्रजी भाषेसह इतर 22 हून अधिक भाषांमध्ये प्रकाशित केलेली 1000 हून अधिक पुस्तके उपलब्ध करून दिल्यामुळे हा मंच भारतातील बालके आणि युवा यांच्यामध्ये आयुष्यभर वाचनाची आवड रुजवेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वय वर्ष 3 ते 8; 8 ते 11; 11 ते 14 आणि 14 ते 18 अशा चार वयोगटांनुसार या मंचावरील पुस्तकांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय ई-पुस्तकालय हे अॅप अँड्रॉईड तसेच आयओएस यापैकी कोणतीही प्रणाली वापरणाऱ्या उपकरणामध्ये डाऊनलोड करून घेता येईल. राष्ट्रीय ई-पुस्तकालय म्हणजे देशातील डिजिटल दरी सांधण्याच्या तसेच प्रत्येकासाठी समावेशक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल असेल. या मंचावरील पुस्तके कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध असतील.

उपरोल्लेखित सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग  आणि नॅशनल बुक ट्रस्ट देशातील शैक्षणिक वातावरण अधिक सुधारण्याच्या उद्देशाने सहयोगात्मक कार्य करण्याप्रती कटिबद्ध असतील. या सामंजस्य करारामुळे देशातील युवा वर्गामध्ये उत्तम  वाचन सवयींची जोपासना करण्याच्या उद्देशाने देशभरात दर्जेदार बिगर-शैक्षणिक वाचन साहित्य उपलब्ध होण्याचे परिवर्तन घडवण्याची क्षमता असलेल्या सहकारी प्रयत्नाची सुरुवात होणार आहे.

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2022667) Visitor Counter : 94