संरक्षण मंत्रालय
वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ महाविद्यालयात 80 वा स्टाफ अभ्यासक्रम सुरू
युद्धात संयुक्तता आणि एकात्मिकता साधण्याच्या हेतूने आंतर-सेवा दृष्टीकोनाची जोपासना करणारा हा अभ्यासक्रम
Posted On:
03 JUN 2024 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2024
तामिळनाडूमधील वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ महाविद्यालय (DSSC) येथे आज 80 व्या स्टाफ अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. हा अभ्यासक्रम भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील आपल्या कारकीर्दीच्या मध्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना कुशल स्टाफ अधिकारी आणि भविष्यातील लष्करी नेते बनण्यासाठी प्रशिक्षित करण्याकरिता तसेच एकात्मिक त्रि-सेवा वातावरणात प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांसह सुसज्ज करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. अभ्यासक्रमादरम्यान, 26 मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशातील 38 अधिकाऱ्यांसह 480 विद्यार्थी अधिकारी 45 आठवड्यांच्या कालावधीत प्रत्येक सेवेच्या कार्यप्रणालीची आणि रणनीतिक व कार्यान्वयन पातळीवर युद्धविषयक मीमांसेची सखोल माहिती मिळवतील.
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना, लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स, कमांडंट, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ महाविद्यालय (DSSC) यांनी युद्धाचे गतिशील स्वरूप आणि वैशिष्ट्य आणि डीएसएससी या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी कसे सक्षम करेल यावर प्रकाश टाकला. त्यांनी लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यातील समन्वय आणि एकात्मतेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला तसेच आधुनिक युद्धात अखंड सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक सेवेची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि भारताच्या लष्करी तसेच सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या भू-राजकीय मुद्द्यांचे सखोल आकलन विकसित करण्याची गरज लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी अधोरेखित केली. ही जागरूकता त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी तसेच लष्करी धोरणांमध्ये प्रभावी योगदान देण्यासाठी सक्षम करेल, असे ते म्हणाले.
अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमात, 80 व्या स्टाफ अभ्यासक्रमात भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल तसेच भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या देशांमधील निवडक प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या गटासाठी खास तयार केलेला अभ्यासक्रमही सादर केला. हा अभ्यासक्रम सहयोगी आणि आंतर-सेवा दृष्टीकोन वाढवेल. तसेच या अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आंतर-सेवा समज आणि सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करेल.
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2022592)
Visitor Counter : 76