दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
बनावट सिमकार्डना आळाः दूरसंचार विभागाने 6.80 लाख संशयित कनेक्शनना फेर-पडताळणीसाठी केले लक्ष्य
बनावट कागदपत्रांद्वारे मिळवलेली मोबाईल कनेक्शन खंडित करण्याचे दूरसंचार विभागाचे उद्दिष्ट
Posted On:
23 MAY 2024 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मे 2024
दूरसंचार विभागाने 6.80 लाख मोबाईल कनेक्शनवर लक्ष केंद्रित केले असून ही कनेक्शन्स अवैध, अस्तित्त्वात नसलेल्या किंवा ओळखीचे बनावट/फेरफार केलेल्या पुराव्यांच्या आणि पत्त्यांच्या केवायसी कागदपत्रांचा वापर करून मिळवल्याचा संशय आहे.
**प्रमुख वैशिष्ट्ये:**
- संशयित बनावट कनेक्शन्स ओळखणे – आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विश्लेषणाच्या माध्यमातून, दूरसंचार विभागाने संभाव्य गैरप्रकार करण्याची शक्यता असलेल्या सुमारे 6.80 लाख कनेक्शन्सची निवड केली आहे. ओळखीचे/ पत्त्याच्या पुराव्यांची संशयास्पद स्थिती ही कनेक्शन्स मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याकडे निर्देश करत आहे.
- फेरपडताळणीसाठी निर्देश – दूरसंचार विभागाने निवड केलेल्या या मोबाईल क्रमांकाची तातडीने फेर-पडताळणी करण्याचे निर्देश टीएसपींना जारी केले आहेत. या कनेक्शनची 60 दिवसांच्या आत फेर-पडताळणी करणे या टीएसपींसाठी अनिवार्य आहे. ही फेर-पडताळणी पूर्ण न झाल्यास हे मोबाईल क्रमांक खंडित करण्यात येतील.
- एकत्रित प्रयत्नांच्या फलश्रुतीचे परिणाम: विविध क्षेत्रांमधील सहकार्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर यामुळे या बनावट कनेक्शन्सना ओळखणे शक्य झाले आहे आणि त्याद्वारे बनावट ओळखीच्या या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी एकात्मिक डिजिटल मंचांचा प्रभावीपणा सिद्ध झाला आहे.
मोबाईल कनेक्शन्सची विश्वासार्हता आणि डिजिटल व्यवहारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी दूरसंचार विभागाने फेर-पडताळणी करण्यास सांगितले आहे. सर्वांसाठी सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्यासाठी दूरसंचार विभाग वचनबद्ध आहे.
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2021418)
Visitor Counter : 119