संरक्षण मंत्रालय

हवाई दलप्रमुखांनी बंगळूरू येथे भारतीय हवाई दलाच्या पहिल्या आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद प्रणालीचे केले उद्घाटन

Posted On: 22 MAY 2024 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मे 2024

 

भारतीय हवाई दलाच्या (IAF) सेवेत कार्यरत देशभरातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तज्ञांचे मार्गदर्शन आणि निश्चित वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी, 21 मे 2024 रोजी कमांड हॉस्पिटल एअर फोर्स बंगळूरू (CHAFB) येथे भारतीय हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्या हस्ते इमर्जन्सी मेडिकल रिस्पॉन्स सिस्टम (ईएमआरएस) चे उद्घाटन करण्यात आले.

ईएमआरएस ही भारतीय हवाई दलाचे देशभरातली कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना 24/7 टेलिफोनिक सेवा देण्यासाठी सुरु करण्यात आलेली अशा प्रकारची पहिलीच वैद्यकीय हेल्पलाईन आहे. देशभरात कोणत्याही ठिकाणी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणाऱ्या  कॉलरना , म्हणजेच भारतीय हवाई दलाचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्वरित प्रतिसाद देत, त्यांना वैद्यकीय आणि निमवैद्यकीय व्यावसायिकांच्या पथकाद्वारे मदत पुरवणे, हे या प्रणालीचे उद्दिष्ट आहे. प्रतिसाद देणारा वैद्यकीय व्यावसायिक कॉलरला त्वरित सल्ला देईल  आणि त्याचवेळी कॉलरच्या जवळच्या भारतीय हवाई दलाच्या वैद्यकीय सेवा केंद्राशी संपर्क साधेल. ही सुविधा आणीबाणीच्या परिस्थितीत उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या भारतीय हवाई दलाच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. मौल्यवान प्राण वाचवणे, हे ईएमआरएस चे एकमेव उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमात प्रणालीची क्षमता आणि पोहोच यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. अडचणीत सापडलेल्या कॉलरला तज्ञांचे मार्गदर्शन किती सहजतेने प्रदान केले जाईल, तसेच जवळच्या वैद्यकीय सुविधा केंद्राच्या वैद्यकीय सहाय्य पथकाची सेवा तात्काळ कशी मिळवता येईल, यावर माहिती देण्यात आली.

ही संकल्पना मांडणाऱ्या हवाई दलप्रमुखांनी (CAS) ईएमआरएस चे महत्त्व अधोरेखित केले आणि ते म्हणाले, “हा उपक्रम भारतीय हवाई दलासाठी केवळ एक महत्वाचा टप्पा नसून, वैद्यकीय सज्जतेमधील मोठी प्रगती आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत, तज्ञांद्वारे वैद्यकीय सेवा तात्काळ प्रदान करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचे पुढील पाऊल आहे."

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021323) Visitor Counter : 57