आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 10व्या आवृत्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने केले जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन


अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने "महिला सक्षमीकरणासाठी योग" या संकल्पनेसह 2024 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 30 दिवसांच्या उलटगणनेनिमित्त केले कार्यक्रम मालिकेचे आयोजन

Posted On: 21 MAY 2024 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मे 2024

नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (AIIA) 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 च्या निमित्ताने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या सुप्रसिद्ध प्रेरक वक्त्या सिस्टर बी के शिवानी यांनी उपस्थितांना संबोधित केले. आजच्या काळात आयुर्वेद आणि त्याच्याशी संबंधित शास्त्रसंबंधित सेवा समाजापर्यंत पद्धतशीर मार्गाने पोहोचवण्याच्या कामात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या भूमिकेची त्यांनी  प्रशंसा केली. आजच्या तरुणांनी चिकाटीचे महत्त्व आणि मानवतेच्या कल्याणासाठी योगाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. योगाभ्यासामुळे व्यक्तीला शांत मनाने समाजाच्या कल्याणासाठी सूज्ञपणे निर्णय घेण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यावश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.

संस्थेच्या पायाभूत सुविधांच्या महत्त्वाविषयी बोलताना अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संचालिका प्रा. (डॉ.) तनुजा नेसारी यांनी महिला सक्षमीकरणासाठी तसेच मार्गदर्शन आणि आपले मन, आत्मा आणि आत्म्याला बळ देण्यासाठीस्वतःशी  जोडले जाण्यासाठी आणि आयुर्वेदाच्या जीवनपद्धतीनुसार बाहेरील जगाशी एकरूप होण्यासाठी हा योग दिन सर्वांनी साजरा करण्याचे आवाहन केले. आयुर्वेद आणि योग या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.  आयुर्वेद हा योगाचा भौतिक पैलू आहे तर योग हा आयुर्वेदाचा आध्यात्मिक पैलू असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रत्येकाने केवळ शिकवण्याचे नव्हे तर योग आणि आयुर्वेद या दोन्हींचा अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने उपचारात्मक योगावर एक पुस्तिका प्रकाशित केली. ही पुस्तिका एक 5 दिवसीय सामान्य योग शिष्टाचार आहे जो अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतील तज्ञाद्वारे दिल्लीतील अनेक प्रतिष्ठित ठिकाणी सादर केला जाईल. याशिवाय  भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय सीमांवर आयुर्-योग कार्यक्रम सादर केला जाईल, आरोग्य शिबिरे आणि आरोग्य किटचे वितरण वृद्धाश्रम आणि अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या रुग्णालयाच्या विभागांमध्ये जागरूकता कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेची स्थापना 17 ऑक्टोबर 2017 रोजी आयुर्वेद या प्राचीन भारतीय वैद्यक पद्धतीचे ज्ञान आणि सराव यांच्या प्रचार आणि प्रगतीसाठी करण्यात आली.  गेल्या सहा वर्षांत संस्थेने या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली असून ही संस्था केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर आयुर्वेदिक शिक्षण आणि संशोधनाचे केंद्र बनली आहे.

या कार्यक्रमानंतर वाय ब्रेक आणि योगा फ्युजन सादर करण्यात आले. आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि वैद्य डॉ. काशिनाथ समागंडी, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या संचालक, पद्मश्री पुरस्कारप्राप्त कमलिनी अस्थाना आणि नलिनी अस्थाना यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे अधिष्ठाता, वरिष्ठ प्राध्यापक आणि सदस्य देखील उपस्थित होते.

 

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 2021275) Visitor Counter : 100