भारतीय निवडणूक आयोग
निवडणुकीच्या काळात जप्त करण्यात आलेली रक्कम लवकरच 9,000 कोटींचा आकडा करणार पार
Posted On:
18 MAY 2024 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2024
देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर आणि मतदारांना दाखवण्यात येणाऱ्या इतर प्रलोभनांवर निवडणूक आयोग करत असलेल्या दृढ आणि ठोस हल्ल्यांच्या परिणामस्वरूप विविध संस्थांनी तब्बल 8889 कोटी रुपये जप्त केले आहेत. अंमली पदार्थ आणि मानसिक उपचारांसाठीची औषधे तसेच इतर प्रलोभनांविरूद्ध वाढीव दक्षतेमुळे हे पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त केले जात असून जप्ती प्रकरणात सतत वाढ झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
खर्चाचे निरीक्षण, उपलब्ध माहितीचा अचूक अर्थ लावणे आणि अंमलबजावणी संस्थांचा सक्रिय सहभाग या बाबींमध्ये जिल्हे आणि संस्थांचा नियमित पाठपुरावा आणि पुनरावलोकने यामुळे 1 मार्चपासून जप्तीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. निवडणुकांवर वेगवेगळ्या प्रमाणात प्रभाव टाकणारे अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू, मोफत वस्तू तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. यातील काही घटक थेट प्रलोभन म्हणून दिले जातात तर काही वेळा पैशाच्या रुपाने मतदारांना प्रलोभित केले जाते.
आयोगाने अंमली पदार्थ आणि मानसिक उपचारांसाठीची औषधे जप्त करण्यावर विशेष भर दिला आहे. जी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश संक्रमण प्रदेश होती, ती वाढत्या प्रमाणात उपभोग क्षेत्र बनत असल्याचे माहिती विश्लेषणात आढळून आले आहे. "निवडणुकांच्या काळात अंमली पदार्थांच्या व्यापारात काळ्या पैशांचा वापर उखडून टाकण्यासाठी, त्याहून अधिक महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक कारण म्हणजे तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी आणि त्याद्वारे देश वाचवण्यासाठी अंमली पदार्थांच्या विरोधात तपास यंत्रणांचे बुद्धिमत्ता आधारित अचूक सहयोगी प्रयत्न ही काळाची गरज आहे.” असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एका आढावा बैठकीदरम्यान नोडल संस्थांना संबोधित करताना सांगितले होते. आजवर जप्त करण्यात आलेल्या रकमेत अमली पदार्थांच्या जप्तीचा वाटा सुमारे 3958 कोटी रुपये म्हणजे एकूण जप्तीच्या 45% इतका आहे.
या निवडणुकांदरम्यान अमली पदार्थांच्या विरोधात लक्ष्यित कृतींची मालिका पाहायला मिळाली आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्ली व्यतिरिक्त इतर राज्यांमध्येही अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 17.04.2024 रोजी नोएडा पोलिसांनी ग्रेटर नोएडा येथे अमली पदार्थांच्या कारखान्याचा पर्दाफाश करत 150 कोटी रुपये किमतीचा 26.7 किलो MDMA हा अंमली पदार्थ जप्त केला असून दोन परदेशी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. इतर घटकांच्या जप्ती देखील तितक्याच प्रभावी असून या वर्षातील जप्तीच्या कारवायांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या संपूर्ण जप्तींच्या आकडेवारी आणि प्रमाणाला मोठ्या अंतराने मागे टाकले आहे. सूक्ष्म आणि व्यापक नियोजन यामुळेच तपास संस्थांना हे यश प्राप्त झाले आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
* * *
M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2021033)
Visitor Counter : 97