ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय

ईशान्येकडील राज्यांच्या विकास मंत्रालयाकडून स्वच्छता पंधरवड्याचा प्रारंभ

Posted On: 16 MAY 2024 5:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2024

ईशान्येकडील राज्यांच्या विकास मंत्रालयाने (MDoNER) स्वच्छता पंधरवड्याचा प्रारंभ करून स्वच्छता आणि पर्यावरणीय शाश्वततेला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या पंधरवड्याचा प्रारंभ आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन (अनेक्सी) येथे झाला.  16 मे ते 31 मे 2024 पर्यंत ही स्वच्छता मोहीम चालणार आहे.

उद्‌घाटन समारंभात, ईशान्येकडील राज्यांच्या विकास मंत्रालयाच्या चमूने स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली आणि स्वच्छ भारत मिशनचा संदेश प्रसारित करण्याच्या स्वच्छतेच्या उपक्रमांप्रति  त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.  ईशान्येकडील राज्यांच्या विकास मंत्रालयाच्या सचिवांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या प्रतिज्ञेत जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये सर्वोत्तम स्वच्छता पद्धतींचा अंगीकार  करण्यावर भर देण्यात आला.

ईशान्येकडील राज्यांच्या विकास मंत्रालयाच्या सचिवांनी वर्षभर  स्वच्छता उपक्रम चालू ठेवण्याच्या  महत्त्वावर भर दिला.  या स्वच्छता मोहिमेत सर्व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि वर्षभर स्वच्छतेच्या विविध पद्धती राबवाव्यात असे आवाहन त्यांनी केले.

स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून पर्यावरणपूरक उपक्रम, प्लॅस्टिकच्या कमीतकमी वापराला प्रोत्साहन, घन कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण मोहीम आणि पथनाट्य (नुक्कड नाटक) यासह विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

या पंधरवड्याच्या संपूर्ण कालावधीत, ईशान्येकडील राज्यांचे विकास मंत्रालय आणि त्याच्या संलग्न संस्था योग्य स्वच्छता आणि नोंद व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाचे सर्व विभाग आणि इतर कार्यालय परिसरात नियमित स्वच्छता तपासणी करतील.

 

 

 

S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


 



(Release ID: 2020810) Visitor Counter : 48


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu