वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत-झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीची तिसरी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न

Posted On: 15 MAY 2024 8:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मे 2024

भारत-झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समिती (जेटीसी) ची  तिसरी  बैठक 13.05.2024 ते 14.05.2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे झाली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाच्या आर्थिक सल्लागार, प्रिया पी. नायर आणि झिम्बाब्वेच्या परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्रालयाच्या आर्थिक सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय व्यापार समुदाय विभागाच्या मुख्य संचालक रुडो. एम. फरानीसी यांनी या बैठकीचे  सह-अध्यक्षपद भूषविले. झिम्बाब्वेच्या दूतावासाचे पीटर होबवानी आणि संबंधित मंत्रालयातील 15 हून अधिक प्रतिनिधींचा झिम्बाब्वेच्या प्रतिनिधीमंडळामध्ये समावेश होता. ही चर्चा सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली. अधिक सहकार्य, प्रलंबित समस्या सोडवणे, व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देणे आणि परस्परांच्या नागरिकांदरम्यान अधिक संपर्क प्रस्थापित करण्यावर सर्वांनी उत्साहाने प्रतिसाद दिला.   

दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापाराचा आढावा घेतला आणि दोन्ही देशांदरम्यान अस्तित्वात असलेल्या अफाट क्षमतेची नोंद केली. द्विपक्षीय व्यापार वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांवर दोन्ही बाजूनी सहमती दिली. डिजिटल परिवर्तनावरील उपाय, टेली-मेडिसिन्स, प्रक्रिया न केलेले  हिरे, जलद पेमेंट सिस्टम आणि पारंपरिक औषधे आणि इतर बाबींचे नियमन याबाबत सहकार्यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.

दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी फार्मास्युटिकल्स, भूस्थानिक क्षेत्र, आरोग्यसेवा, यंत्रसामग्री आणि यांत्रिक उपकरणे, वाहने, विद्युत यंत्रसामग्री, खनिज इंधन, खनिज तेल आणि शुद्धीकरण उत्पादने, प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या वस्तू, लोह आणि पोलाद, कृषी आणि अन्न प्रक्रिया, अभियांत्रिकी क्षेत्र, अक्षय ऊर्जा, डिजिटल अर्थव्यवस्था, वस्त्रोद्योग, क्षमता विकास यासारखी क्षेत्रे निश्चित केली.

दोन्ही बाजूंनी परस्परांच्या गुंतवणूक प्रोत्साहन संस्था आणि व्यापार मंडळांमधील अधिक सहकार्यावरही सहमती दर्शवली. भारत-झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीच्या तिसऱ्या अधिवेशनातील चर्चा सौहार्दपूर्ण आणि दूरगामी प्रभाव पडणारी होती, तसेच  दोन्ही देशांमधील सौहार्दपूर्ण आणि विशेष संबंधांचे प्रतीक होती.

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2020726) Visitor Counter : 52