संरक्षण मंत्रालय
दक्षिण चीन समुद्रात पूर्वेकडील ताफ्याच्या तैनातीचा भाग म्हणून दिल्ली, शक्ती आणि किल्तन या भारतीय नौदलातील जहाजांचे सिंगापूर येथे आगमन
Posted On:
07 MAY 2024 3:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2024
भारतीय नौदलातील पूर्वेकडील ताफ्याचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रियर अॅडमिरल राजेश धनखड यांच्या नेतृत्वाखाली 06 मे 2024 रोजी सिंगापूर येथे पोहोचलेल्या, दिल्ली, शक्ती तसेच किल्तन या भारतीय नौदलातील जहाजांचे सिंगापूरच्या नौदलातील अधिकारी तसेच भारताचे सिंगापूरमधील उच्चायुक्त यांनी सस्नेह स्वागत केले. भारतीय नौदलातील पूर्वेकडील ताफ्याच्या दक्षिण चीनजवळील समुद्रात परिचालनात्मक नेमणुकीचा भाग म्हणून जहाजांनी ही भेट दिली. विविध कार्ये आणि उपक्रमांच्या मालिकांच्या माध्यमातून भारत आणि सिंगापूर या दोन सागरी देशांच्या दरम्यान दीर्घकाळ चालत आलेले मैत्री आणि सहकार्याचे नाते आणखी मजबूत करण्याच्या हेतूने ही भेट आयोजित करण्यात आली आहे.
सिंगापूर येथील बंदरात या जहाजांचा मुक्काम असताना, हाती घेण्यात येणाऱ्या नियोजित कार्यक्रमांमध्ये, भारतीय उच्चायुक्तांशी संवाद, सिंगापूरच्या नौदलातील अधिकाऱ्यांची व्यावसायिक चर्चा तसेच तेथील शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक संवाद यांसह इतर उपक्रमांचा समावेश आहे.यातून दोन्ही देशांच्या नौदलांतील सामायिक मूल्यांचे दर्शन घडेल
नियमित भेटी, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण तसेच परस्परांसाठी प्रशिक्षण व्यवस्था यांसह भारतीय नौदल आणि सिंगापूरचे नौदल यांच्या मध्ये गेली तीन दशके सहकार्य, समन्वय तसेच सहकारी संबंधांची जपणूक होत आली आहे. भारतीय जहाजांची आता झालेली नेमणूक दोन्ही देशांच्या नौदलांच्या दरम्यान असलेले मजबूत बंध अधोरेखित करते.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2019853)
Visitor Counter : 97