अर्थ मंत्रालय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली येथे (निवृत्त) न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा यांना जीएसटी अपील न्यायाधिकरणाचे पहिले अध्यक्ष म्हणून दिली शपथ

Posted On: 06 MAY 2024 7:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 मे 2024

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (निवृत्त)न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा यांना आज नवी दिल्ली येथे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करविषयक अपील न्यायाधिकरणाच्या (जीएसटीएटी)अध्यक्षपदाची शपथ दिली. (निवृत्त)न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा यांच्या या नेमणुकीमुळे जीएसटीशी संबंधित विवादांच्या सोडवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाची संस्था असलेल्या जीएसटीएटीचे परिचालन सुरु करण्याच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, 2017 अंतर्गत स्थापन करण्यात आलेले जीएसटीएटी हे अपील न्यायाधिकरण प्रथम अपीलीय अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशांच्या विरोधात सदर कायद्यांतर्गत तसेच संबंधित राज्यांच्या /केंद्रशासित प्रदेश प्रशासनांच्या जीएसटी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या विविध अपिलांच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आले आहे. या यंत्रणेमध्ये एक प्रधान पीठ आणि विविध राज्यांच्या पीठांचा समावेश आहे.जीएसटी मंडळाने दिलेल्या मंजुरीनुसार, केंद्र सरकारने प्रधान पीठ नवी दिल्ली येथे तर 31 राज्य पीठे देशभरात विविध ठिकाणी कार्यरत असतील अशी अधिसूचना जारी केली आहे. या  व्यवस्थेतील न्यायिक सदस्य तसेच तांत्रिक सदस्य यांच्या नेमणुकीची प्रक्रिया याआधीपासूनच प्रगतीपथावर आहे.

हे न्यायाधिकरण, वरिष्ठ  न्यायालयांवर पडणारा ताण लक्षणीयरीत्या कमी करण्यासोबतच जीएसटीविषयक विवादांचे जलद, न्याय्य, कायदेशीर आणि परिणामकारक निराकरण करण्याची हमी देईल. जीएसटीएटीच्या स्थापनेमुळे भारतातील जीएसटी यंत्रणेची परिणामकारकता अधिक वाढेल आणि देशातील करविषयक वातावरण अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यास उत्तेजन मिळेल.

जीएसटीएटीचे पहिले अध्यक्ष (निवृत्त)न्यायमूर्ती मिश्रा हे झारखंड उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती असून  भारताच्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील शोध आणि निवड समितीने त्यांची निवड केली.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2019775) Visitor Counter : 132