वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अबुजा येथे भारत-नायजेरिया संयुक्त व्यापार समितीची दुसरी बैठक संपन्न


दोन्ही देश लवकरच स्थानिक चलनविषयक सामंजस्य यंत्रणा विषयक कराराला अंतिम स्वरूप देतील

Posted On: 03 MAY 2024 6:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मे 2024

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अमरदीप सिंह भाटीया यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय समितीने, भारताचे नायजेरियातील उच्चायुक्त जी.बालसुब्रमण्यम तसेच वाणिज्य विभागातील आर्थिक सल्लागार प्रिया पी.नायर यांच्यासह त्यांच्या नायजेरियातील समकक्ष अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त व्यापार समितीच्या (जेटीसी) बैठकीत भाग घेतला. अबुजा येथे दिनांक 29.04.2024 ते 30.04.2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या जेटीसीचे सह-अध्यक्षपद, नायजेरियाच्या औद्योगिक व्यापार आणि गुंतवणूक मंत्रालयाचे स्थायी सचिव, राजदूत नुरा अब्बा रिमी तसेच वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव यांनी भूषवले. 

यावेळी झालेल्या सर्वसमावेशक चर्चेदरम्यान, दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक विषयक संबंधांमध्ये नुकत्याच झालेल्या घडामोडींचा तपशीलवार आढावा घेतला तसेच त्या संबंधांच्या पुढील विस्ताराच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेल्या क्षमतांवर विचारविनिमय केला. यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापार तसेच परस्पर लाभदायक गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित करण्याची विविध क्षेत्रे निश्चित केली. यामध्ये, दोन्ही बाजूंच्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडवणे तसेच कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, औषधे, एकात्मिक शुल्कभरणा मंच (यूपीआय), स्थानिक चलनविषयक सामंजस्य यंत्रणा, विद्युत क्षेत्र तसेच नवीकरणीय उर्जा, कृषी आणि अन्न प्रक्रिया, शिक्षण, वाहतूक, रेल्वे, हवाई वाहतूक, एमएसएमईज,विकास, इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य स्थापन करणे आयांचा समावेश आहे. द्विपक्षीय आर्थिक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी स्थानिक चलनविषयक सामंजस्य यंत्रणा करारावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याबाबत दोन्ही बाजूंनी संमती दिली.

अधिकृत भारतीय शिष्टमंडळात भारतीय रिझर्व्ह बँक, ईएक्सआयएम बँक ऑफ इंडिया तसेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थांतील अधिकाऱ्यांचा समावेश होता. जेटीसीच्या कार्यवाहीमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. यावेळी अत्यंत सौहार्दपूर्ण तसेच मैत्रीपूर्ण वातावरणात झालेल्या चर्चा फलदायी ठरल्या. दोन्ही देशांदरम्यान सहकार्य वाढवणे, थकीत बाबींचा निपटारा, व्यापार तसेच गुंतवणुकीला चालना तसेच दोन्ही देशांतील जनतेदरम्यान अधिकाधिक संपर्क स्थापित करणे याविषयी उत्साहपूर्ण प्रतिसाद दिसून आला. 

द्विपक्षीय व्यापारात आणखी वाढ करण्यासाठीचे एकत्रित प्रयत्न म्हणून दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापारात अडथळे आणणाऱ्या  सर्व समस्यांचा तातडीने निपटारा करण्याप्रति तसेच दोन्ही देशांदरम्यान व्यापाराला अधिक प्रोत्साहन देण्याप्रति कटिबद्धता व्यक्त केली. या व्यापारी शिष्टमंडळासोबतच, विद्युतनिर्मिती, फिनटेक, दूरसंचार, विजेवर चालणारी यंत्रे, औषधे अशा विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश असलेले सीआयआयच्या अध्यक्षतेखालील व्यापारी शिष्टमंडळ देखील यावेळी उपस्थित होते. भारत-नायजेरिया जेटीसीच्या दुसऱ्या बैठकीत झालेल्या चर्चा अत्यंत सलोख्याच्या तसेच दूरदर्शी होत्या आणि त्यातून या दोन्ही देशांमध्ये असलेल्या स्नेहपूर्ण आणि विशेष नातेसंबंधांचे दर्शन घडले. 

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019578) Visitor Counter : 87