ऊर्जा मंत्रालय

भारतात तरंगत्या सौर उर्जा तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी एनएचपीसीचा नॉर्वेच्या कंपनीशी सहयोग करार

Posted On: 30 APR 2024 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2024

 

भारतातील सर्वात मोठी जलविद्युत विकास कंपनी असलेल्या एनएचपीसीने देशातील तरंगत्या सौरउर्जा निर्मिती उद्योगासाठी तंत्रज्ञान पुरवठादार म्हणून कार्य करणाऱ्या मे.ओशन सन या नॉर्वेतील कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार, एनएचपीसी आणि ओशन सन हे दोन्ही भागीदार फोटोव्होल्टेईक पॅनल्सवर आधारित असलेल्या ओशन सन कंपनीच्या  तरंगत्या सौर उर्जा तंत्रज्ञानाच्या सादरीकरणाच्या संदर्भात महत्त्वाच्या सहकार्य क्षेत्रांचा शोध घेतील.एनएचपीसीने निश्चित केलेल्या विविक्षित ठिकाणी हायड्रो-इलॅस्टिक पडद्यावर ही पॅनल्स बसवण्यात येणार आहेत.

उपरोल्लेखित करार शाश्वत विकास आणि नवीकरणीय उर्जा निर्मिती क्षमतेमध्ये भर घालण्याच्या उद्दशाने एनएचपीसीतर्फे हाती घेण्यात आलेल्या प्रयत्नांचा पुढचा टप्पा आहे. एनएचपीसी ही कंपनी केवळ जलविद्युत विकास क्षेत्रातच नव्हे तर सौर, पवन तसेच हरित हायड्रोजन प्रकल्पांसारख्या विविध इतर नवीकरणीय उर्जा निर्मिती प्रकल्पांमध्ये देखील सक्रियतेने कार्यरत आहे.

दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी मिश्र पद्धतीने झालेल्या या सामंजस्य करारावर एनएचपीसीचे कार्यकारी संचालक (नवीकरणीय उर्जा आणि हरित हायड्रोजन विभाग) व्ही.आर.श्रीवास्तव आणि ओशन सन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तियन टोरव्होल्ड यांनी स्वाक्षऱ्या केल्या. तसेच नॉर्वेच्या भारतातील राजदूत एलीन स्टेनर,   एनएचपीसीचे संचालक (तंत्रज्ञान विभाग) राज कुमार चौधरी आणि एनएचपीसीचे कार्यकारी संचालक (व्यापार विकास धोरण आणि सल्लागार विभाग) रजत गुप्ता यांनी नवी दिल्लीतील नॉर्वेच्या दूतावासातून तर ओस्लो येथील भारतीय दूतावासातून डॉ.  एक्विनो विमल यावेळी सहभागी झाले.  

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2019150) Visitor Counter : 102