संरक्षण मंत्रालय

सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या 58 व्या तुकडीचे पुण्यात दीक्षान्त संचलन


वैद्यक शाखेचे एकूण 112 स्नातक भारतीय सशस्त्र दलात दाखल

Posted On: 25 APR 2024 6:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 एप्रिल 2024

 

पुण्यातील एएफएमसी  अर्थात सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या 58 व्या तुकडीचे 112 स्नातक 25 एप्रिल 2024 रोजी एएफएमसीच्या कॅप्टन देवाशिष शर्मा,कीर्तीचक्र संचलन मैदानावर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात भारतीय सशस्त्र सैन्यदलांत दाखल झाले.

डीजीएएफएमएस अर्थात सशस्त्र सैन्यदलांच्या वैद्यकीय सेवांचे महासंचालक आणि आर्मी मेडिकल कॉर्प्सचे वरिष्ठ कर्नल कमांडंट लेफ्टनंट दलजित सिंग यांनी या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. वैद्यकीय छात्र (आता लेफ्टनंट) सुशील कुमार सिंह याच्या कमांडमध्ये निघालेल्या दीक्षान्त संचलनाचे डीजीएएफएमएस   सिंग यांनी निरीक्षण केले.

नव्याने सेवांमध्ये दाखल झालेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत त्यांनी संपूर्ण समर्पण भावाने देशाची आणि सैन्यदलांची सेवा करण्याचा संदेश अधिकाऱ्यांना  दिला. तसेच उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

एएफएमसी च्या 58 व्या तुकडीच्या छात्रांनी 2023 च्या हिवाळ्यातील एमयुएचएस परीक्षांमध्ये अतिशय उत्तम कामगिरी केली आणि एकूण एकशे सत्तेचाळीस छात्रांनी पदवी संपादन केली. यामध्ये मित्र देशांच्या पाच छात्रांचाही समावेश होता. सशस्त्र सैन्यदलाच्या वैद्यकीय सेवांमध्ये दाखल झालेल्या एकशे बारा छात्रांमध्ये सत्त्याऐंशी पुरुष छात्रांचा आणि पंचवीस महिला छात्रांचा समावेश आहे. अठ्ठ्याऐंशी छात्र लष्करात, दहा नौदलात आणि चौदा हवाईदलात समाविष्ट करून घेण्यात आले आहेत.

छात्रांच्या उत्तुंग शैक्षणिक कामगिरीचे कौतुक करण्याचा शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळा कमिशनिंग समारंभानंतर पार पडला. 'राष्ट्रपती सुवर्णपदक' आणि 'कलिंग करंडक' हे या महाविद्यालयाचे सर्वाधिक प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत. यावर्षी फ्लाईंग ऑफिसर आयुष जयस्वाल हे 'राष्ट्रपती सुवर्णपदकाचे' तर सर्जन सब लेफ्टनंट बानी कौर या 'कलिंग करंडकाच्या' मानकरी ठरल्या.

देशातील सर्वोत्तम पाच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्थान मिळालेल्या, तसेच गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासाठी आणि दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी जागतिक पातळीवर नावाजल्या गेलेल्या  एएफएमसीला, देशसेवेची गौरवशाली 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 01डिसेंबर 2023 रोजी 'प्रेसिडेंट्स कलर' ने सन्मानित केले होते. तसेच  सैन्यदल प्रमुख जनरल अनिल चौहान, पीव्हीएसएम, युवायएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम, यांनी 18 मार्च 2024 या दिवशी एएफएमसीला 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ युनिट प्रशस्तीपत्र' देऊनही गौरवले होते.

या समारंभासाठी वरिष्ठ सेवारत अधिकारी, अनुभवी ज्येष्ठ अधिकारी, प्राध्यापक, वैद्यकीय आणि परिचर्या छात्र यांसह, सेवेत दाखल होणाऱ्या छात्रांचे पालक आणि कुटुंबीय उपस्थित होते.

संचालक आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल- एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम,  आणि  एएफएमसीचे    अधिष्ठाता आणि डेप्यूटी कमांडंट मेजर जनरल गिरीराज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली एएफएमसी  मधील हा दिमाखदार दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला.

 

* * *

N.Chitale/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018863) Visitor Counter : 50