संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक महासागर मोहिम यशस्वीपणे पार पाडून आयएनएसवी तारिणी मायदेशी परतली
Posted On:
22 APR 2024 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2024
भारतीय नौदलाचे नौकानयन जहाज (आयएनएसवी) तारिणी सुमारे दोन महिन्यांची ऐतिहासिक महासागर मोहिम यशस्वीपणे पार पाडून 21 एप्रिल 24 रोजी गोव्यातील तिच्या बेस पोर्टवर परतली.
या मोहिमेचे नेतृत्व भारतीय नौदलाच्या महिला अधिकारी लेफ्टनंट कमांडर डिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए यांनी केले. अशी ऐतिहासिक मोहीम पूर्ण करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या असल्यामुळे त्यांच्या या अद्वितीय प्रवासाचे महत्व विशेष आहे. या मोहिमेला 28 फेब्रुवारी 24 रोजी प्रसिद्ध नाविक आणि त्यांचे मार्गदर्शक कमांडर अभिलाष टॉमी (निवृत्त) यांनी गोव्यातून हिरवा झेंडा दाखवला. हिंद महासागरातील अंदाज लावण्यास कठीण अशा 22 दिवसांच्या जलप्रवासानंतर, आयएनएसवी तारिणी 21 मार्च 24 रोजी मॉरिशस मध्ये पोर्ट लुईस, येथे पोहोचली. हा ऐतिहासिक क्षण अनेक गोष्टींनी साजरा करण्यात आला, याठिकाणी या मोहिमेतील अधिकाऱ्यांना मॉरिशस तटरक्षक दल आणि भारतीय उच्चायुक्तालयातील सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि दोन्ही सागरी राष्ट्रांमधील सद्भावना वाढवणे, या उद्देशाने सौहार्द आणि सहकार्याचे प्रतीक म्हणून, जहाजाने मॉरिशस तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांसह एक प्रशिक्षण कार्यक्रम देखील हाती घेतला होता.
पोर्ट लुईस येथील व्यस्त वेळापत्रकानंतर लेफ्टनंट कमांडर डिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा हे अधिकारी गोव्याला परतीच्या प्रवासासाठी तयार झाले. 30 मार्च 24 रोजी परतीच्या प्रवासाला निघालेल्या या अधिकाऱ्यांना सातत्याने सोसाट्याचा वारा, खवळलेला समुद्र आणि इतर आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांची दुर्दम्य जिद्द आणि दृढ संकल्प यामुळे सर्व संकटांवर मात करत आय एन एस वी तारिणीचे 21 एप्रिल 24 रोजी गोव्याला आगमन झाले.
या अभियानाच्या माध्यमातून लैंगिक समानता आणि नौवहन क्षेत्रात महिला सक्षमीकरणाला चालना देण्याची भारतीय नौदलाची वचनबद्धता अधोरेखित होते. या मोहिमेदरम्यान आलेल्या संकटांनी खचून न जाता, या महिला अधिकाऱ्यांनी साहसी आणि शोध घेण्याच्या जिज्ञासेला मूर्त स्वरूप देत, अपवादात्मक नौवहन कौशल्य आणि लवचिकतेचे दर्शन घडवले.
आता या दोन्ही अधिकारी या वर्षी सप्टेंबरमध्ये आयएनएसवी तारिणीवरून जगभराची परिक्रमा (सागर परिक्रमा - IV मोहीम) या आपल्या पुढील ऐतिहासिक सागरी प्रवासाची तयारी करत आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी भावी पिढीला विशेषतः भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांना नौवहनातील आव्हानात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा देईल.
आयएनएसवी तारिणीला आयएनएस मांडवीच्या बोट पूलवर, कमांडिंग ऑफिसर - आयएनएस मांडवी आणि नौदल स्टेशन कमांडर - उत्तर गोवा यांनी नौदल कर्मचारी आणि आयएनएस मांडवी वर तैनात अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत झेंडा दाखवला, आणि भारतीय नौदलाची सामूहिक कामगिरी आणि सौहार्द यांचा मिलाप दिसून आला.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2018497)
Visitor Counter : 157