भारतीय निवडणूक आयोग
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी सामान्य हवामानाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज
मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात उष्ण हवामानावर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून विशेष पथकाची स्थापना
भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयासह आयोगाची बैठक
Posted On:
22 APR 2024 6:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2024
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी 26 एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेसंदर्भात काळजीचे कारण नाही, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या महासंचालकांनी निवडणूक आयोगाला आज दिली. दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या 13 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये हवामान सामान्य राहील, असा अंदाज आहे. देशातील काही भागांमध्ये सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमान आणि उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेबाबत अहवाल लक्षात घेऊन आयोगाने संबंधित विभागांसह आज बैठक घेतली. येत्या काही दिवसांतील हवामानविषयक परिस्थिती समजून घेत निवडणुकांच्या काळात उष्ण हवामानामुळे धोक्याची शक्यता असल्यास त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंह संधू होते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे विभाग प्रमुख, भारतीय हवामान विभागातील वेधशाळेचे महासंचालक या बैठकीत सहभागी झाले होते.
भारतीय हवामान विभागाचा एप्रिल 21-25, 2024 साठी हवामानाचा अंदाज
बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले:
- भारतीय निवडणूक आयोग, भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष पथक निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या दिवसापूर्वी पाच दिवस उष्णतेच्या लाटा आणि आर्द्रतेच्या परिस्थितीचा आढावा घेईल आणि आवश्यकता भासल्यास त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना करेल.
- राज्यांमधील आरोग्य व्यवस्थापनाला निवडणूक काळात उष्णतेच्या लाटांचे संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगावे आणि आवश्यकता भासल्यास केंद्राला मदत करावी, अशा सूचना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले.
- मतदान केंद्रांच्या ठिकाणी मंडप, पिण्याचे पाणी, पंखे आणि 16 मार्च 2024 रोजी जारी केलेल्या सूचनांमध्ये नमूद इतर किमान सुविधांच्या पूर्ततेचा आढावा राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसह आयोग स्वतंत्रपणे घेईल.
- जनतेला उष्णतेच्या लाटेच्या दुष्परिणामांवर प्रतिबंधक उपाययोजना (काय करावे व काय टाळावे) याची माहिती देण्यासाठी मतदान केंद्रांच्या ठिकाणी आय.ई.सी. अर्थात माहिती, शिक्षण आणि संवाद उपक्रम राबवावेत.
हवामानविषयक अहवालांकडे आयोग बारकाईने लक्ष ठेवणार असून मतदारांसह मतदान केंद्रांतील कर्मचारी, सुरक्षा दले, उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या आरोग्याचा विचार लक्षात घेत आहे.
पार्श्वभूमी:
हवामानविषयक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाने “उष्णतेच्या लाटेचा प्रभावाला प्रतिबंध” करण्यासाठी मार्गदर्शक सल्लापर निवेदन 16 मार्च 2024रोजी सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसाठी जारी केले. त्यामध्ये आयोगाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नमूद केलेल्या किमान सुविधा मतदान केंद्रांच्या ठिकाणी खात्रीशीर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
उष्णतेच्या लाटांपासून होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांवर उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यापूर्वी जारी केल्या आहेत. मंत्रालयाने सर्व राज्यांना आपापल्या राज्यासाठी सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक सूचनांचा भाग म्हणून कृती आराखडाही तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
* * *
S.Kane/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2018490)
Visitor Counter : 121
Read this release in:
Kannada
,
English
,
Manipuri
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam