संरक्षण मंत्रालय

व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची नवे नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती

Posted On: 19 APR 2024 12:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 एप्रिल 2024 

 

सरकारने नवे नौदल प्रमुख म्हणून  पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एनएम, व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती केली आहे.व्हाईस ॲडमिरल  त्रिपाठी सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 30 एप्रिल 2024 रोजी दुपारी ते हा पदभार स्वीकारतील. सध्याचे नौदल प्रमुख, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एनएम ॲडमिरल आर हरी कुमार हे 30 एप्रिल 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

15 मे 1964 रोजी जन्मलेले व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांना 1 जुलै 1985 रोजी भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्त करण्यात आले. दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र तज्ञ म्हणून, त्यांनी सुमारे 39 वर्षे प्रदीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिले. नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून सेवा बजावली होती. 

A person in a military uniformDescription automatically generated

व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी भारतीय नौदलाच्या विनाश, किर्च आणि त्रिशूल जहाजांची धुरा सांभाळली आहे. त्यांनी विविध महत्त्वाच्या संचालन आणि कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडल्या ज्यात वेस्टर्न फ्लीटच्या फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर; नौदल संचालन संचालक; नेटवर्क सेंट्रिक ऑपरेशन्सचे प्रधान संचालक आणि नवी दिल्लीच्या नेव्हल प्लॅन्सचे प्रधान संचालक यांचा समावेश आहे.

रिअर ॲडमिरल असताना त्यांनी सहाय्यक नौदल प्रमुख (नीती आणि योजना) आणि ईस्टर्न फ्लीट कमांडिंग फ्लॅग ऑफिसर म्हणून काम केले आहे. व्हाइस ॲडमिरल म्हणून धुरा वाहताना, त्यांनी प्रतिष्ठित भारतीय नौदल अकादमी, एझिमालाचे कमांडंट; नौदल संचालन महासंचालक; पश्चिम नौदल कमांडचे कार्मिक प्रमुख आणि ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ म्हणून कर्तव्य बजावले आहे.

रिवा सैनिक शाळा आणि खडकवासलाच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेल्या व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज;नेव्हल हायर कमांड- करंज, अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स नेव्हल वॉर कॉलेज येथे नौदलाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

 

* * *

S.Kane/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018233) Visitor Counter : 190