संरक्षण मंत्रालय

भारतीय तटरक्षक दलाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर डिझेलच्या कथित तस्करीत सहभागी असलेली भारतीय मासेमारी बोट अनधिकृत रोख रकमेसह ताब्यात घेतली

Posted On: 17 APR 2024 8:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 एप्रिल 2024

 

भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) मुंबईच्या वायव्येला डिझेलच्या कथित तस्करीत सहभागी असलेली भारतीय मासेमारी बोट अनधिकृत रोख रकमेसह ताब्यात घेतली. सीमाशुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीवर आधारित कारवाई करत आयसीजीच्या पश्चिम विभाग मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात करत, रात्रीच्या आव्हानात्मक परिस्थितीत आणि त्या भागात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या मासेमारी तसेच व्यापारी रहदारीमध्ये, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या विकास क्षेत्रासह 200 वर्ग मैलांच्या परिसरात अखंडितपणे शोध मोहीम राबवली.

आयसीजीच्या दोन वेगवान गस्ती बोटी आणि एक इंटरसेप्टर बोट यांच्या समन्वयीत कारवाईत, संशयित बोटीचे ठिकाण निश्चित करण्यात आले आणि 15 एप्रिल 2024 च्या रात्रीत बोटीवर प्रवेश करण्यात आला. प्राथमिक तपासणीत असे दिसून आले की, डिझेल तस्करीच्या उद्देशाने संशयित भारतीय सागरी पुरवठा जहाजाच्या (ओएसव्ही) दिशेने जाण्यासाठी पाच खलाशी असलेली ही बोट मांडवा बंदरातून 14 एप्रिल 2024 रोजी निघाली. या बोटीवर 20,000 लिटर इंधन साठवण्यासाठी रचनेत बदल केले असल्याचे तसेच ही बोट खोट्या अनेक वेगवेगळ्या नावांनी चालवली जात असल्याचे आढळून आले. संशयित बोटीवर आढळून आलेल्या कागदपत्रांमध्ये असलेल्या माहितीचा अर्थ लावल्यावर या बोटीच्या नोंदणीमध्ये अनेक प्रकारच्या विसंगती आढळून आल्या. तसेच तस्करी केलेल्या डिझेलच्या बदल्यात किनारपट्टीवर कार्यरत काही भारतीय ओएसव्हीना देण्याच्या उद्देशाने ठेवलेली 11.46 लाख रुपयांची रोख रक्कम देखील या बोटीवर सापडली.

ही बोट 17 एप्रिल 2024 च्या पहाटे मुंबई बंदरात आणण्यात आली असून या संदर्भात  आणखी धागेदोरे शोधण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय, सीमा शुल्क विभाग आणि राज्य पोलीस दल यांच्यातर्फे संयुक्त तपास आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018139) Visitor Counter : 60