भूविज्ञान मंत्रालय

यावर्षी नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामात संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता: केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय सचिवांचे प्रतिपादन

Posted On: 15 APR 2024 8:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2024

यावर्षीच्या नैऋत्य मोसमी हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2024 या काळात संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय सचिव डॉ.एम.रविचंद्रन यांनी आज माध्यम प्रतिनिधींना दिली.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय माध्यम केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यम प्रतिनिधींना यावर्षीच्या नैऋत्य मोसमी हंगामातील पावसाविषयी माहिती देताना ते म्हणाले की यावर्षी दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (एलपीए)  106% पाऊस पडेल असा अंदाज असून या अंदाजात 5% अधिक उणे फरक असू शकतो.

केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय सचिव डॉ.एम.रविचंद्रन

डॉ.रविचंद्रन म्हणाले की हा अंदाज गतीविषयक तसेच संख्याशास्त्रीय नमुन्यावर आधारित आहे आणि त्यातून असे दिसून आले आहे की भारताचा वायव्येकडील, पूर्वेकडील तसेच ईशान्येकडील काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अपेक्षित ला निना, सकारात्मक आयओडी आणि उत्तरेकडील गोलार्धात नेहमीपेक्षा कमी बर्फाच्छादन यावर्षीच्या नैऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल ठरतील असे ते म्हणाले.

आयएमडीचे महासंचालक डॉ.मृत्युंजय मोहपात्रा यांनी तपशीलवार सादरीकरण करत उपस्थितांना सांगितले की सध्या विषुववृत्तीय प्रशांत प्रदेशावर मध्यम स्वरुपाची एल निनो स्थिती आढळून येत असून हवामानविषयक आदर्श अंदाजांतून असे दिसते आहे की मान्सूनच्या सुरुवातीला तटस्थ स्थिती आणि मान्सूनच्या उत्तरार्धात ला निना स्थिती दर्शवत आहे.

मे 2024 च्या शेवटच्या आठवड्यात आयएमडी मान्सूनच्या हंगामातील पावसाविषयी अधिक अद्ययावत अंदाज जारी करेल अशी माहिती त्यांनी दिली.

(जून ते सप्टेंबर 2024) या कालावधीतील संभाव्य मोसमी पावसाचा अंदाज खालील तक्त्यात दिला आहे:

2024च्या मान्सून हंगामातील (जून-सप्टेंबर) संभाव्य पावसाविषयीचा अंदाज

वर्ष 2003 पासून भारतीय हवामान विभाग (आयएमडी) दोन टप्प्यांमध्ये संपूर्ण देशभरात पडणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाविषयी (जून-सप्टेंबर) दीर्घ पल्ल्याचा कार्यकारी अंदाज जारी करत असतो.

2024 मधील नैऋत्य मोसमी हंगामात पडणाऱ्या पावसाच्या अंदाजाचा सारांश खालीलप्रमाणे आहे:

  • संपूर्ण देशभरात यावर्षीच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर)सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • प्रमाणाचा विचार करता यावर्षी संपूर्ण देशभरात एलपीएच्या 106% पाऊस पडेल, यात अधिक उणे 5% ची त्रुटी असू शकते.
  • मे 2024 च्या शेवटच्या आठवड्यात हवामान विभाग मान्सूनच्या हंगामातील पावसाविषयी अधिक अद्ययावत अंदाज जारी करेल.

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 



(Release ID: 2017989) Visitor Counter : 97