भारतीय निवडणूक आयोग

वृद्ध आणि दिव्यांग मतदारांच्या दारी पोहोचण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचे विशेष प्रयत्न


85 वर्षांवरील नागरिक आणि दिव्यांगांनी घेतला गृह  मतदान सुविधेचा लाभ : 18 व्या लोकसभा निवडणुकीने घडवला इतिहास

Posted On: 12 APR 2024 5:39PM by PIB Mumbai

 

लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 85 वर्षांवरील मतदार आणि 40% अपंगत्व असलेले दिव्यांग व्यक्ती (पीडब्ल्यूडी) गृह मतदान सुविधा पर्यायाचा  लाभ घेऊ शकतात. या प्रवर्गातील मतदारांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान करण्यास सुरुवात केली आहे. हा उपक्रम निवडणूक प्रक्रियेची सर्वसमावेशकता आणि सुलभता याची खातरजमा करण्यासाठी आणि लोकशाही सहभागाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. देशभरात  85 वर्षाहून अधिक वय असलेले 81 लाख मतदार आणि 90 लाखांहून  अधिक दिव्यांग मतदार आहेत.

वृद्ध आणि दिव्यांगांना गृह मतदानाची सुविधा देणे, ही आयोगाची त्यांच्याबद्दलची काळजी आणि आदर असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ सुखबीर सिंग संधू यांनी जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यातील मतदानात गृह मतदानाच्या सुविधेचा लाभ घेतलेल्या मतदारांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता आणि समाधान व्यक्त केले आहे.

राजस्थानमधील चुरू येथील एकाच कुटुंबातील आठ दिव्यांग मतदारांनी, घरबसल्या मतदान सुविधेचा वापर करून भारताच्या निवडणूक लोकशाहीचे सामर्थ्य अधोरेखित केले. छत्तीसगडमध्ये, बस्तर आणि सुकमा आदिवासी जिल्ह्यातील 87 वर्षीय इंदुमती पांडे आणि 86 वर्षीय सोनमती बघेल यांनी घरबसल्या टपाल मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावला आणि या सुविधेबद्दल निवडणूक आयोगाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्रात, नक्षलग्रस्त प्रभावित क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा शहरातील दोन वृद्ध मतदारांना गृह  मतदानाची सुविधा पुरवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक कर्मचाऱ्यांच्या पथकांनी 107 किलोमीटरचा प्रवास केला.

यासंबंधित फोटो https://elections24.eci.gov.in/  वर उपलब्ध करून दिले जातील.

***

S.Kane/V.Joshi/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2017780) Visitor Counter : 200