आयुष मंत्रालय
वैज्ञानिक संशोधनाचे सक्षमीकरण आणि कार्यनिपुणता वर्धनाद्वारे होमिओपॅथीची वैद्यकीय प्रणाली म्हणून स्वीकृती आणि लोकप्रियता वाढेल - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Posted On:
10 APR 2024 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2024
“विविध उपचार पद्धतींबद्दल भ्रमनिरास झालेल्या अनेक व्यक्तींना होमिओपॅथीच्या चमत्कारांचा फायदा झाला आहे. तथापि, वैज्ञानिक समुदायामध्ये, तथ्ये आणि विश्लेषणावर आधारित पुरेशा अनुभवांसह सादर केल्यावरच असे अनुभव स्वीकारले जाऊ शकतात. शास्त्रीय कसोटीला प्रोत्साहन दिल्याने लोकांमध्ये या उपचार पद्धतीबद्दलचा आत्मविश्वास वाढेल” असे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले. जागतिक होमिओपॅथी दिन 2024 निमित्त नवी दिल्लीतील द्वारका येथे आज यशोभूमी परिषद आणि प्रदर्शन केंद्रात वैज्ञानिक परिषदेच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
होमिओपॅथीच्या शिक्षण पद्धतीत होणाऱ्या सातत्यपूर्ण सुधारणांमुळे ही पद्धत तरुण विद्यार्थ्यांसाठी अधिक आकर्षक होईल. होमिओपॅथीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठ्या संख्येने तरुणांचा सहभाग आवश्यक आहे असेही राष्ट्रपतींनी नमूद केले. हा भव्य कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि इतर आयुष पद्धतींसह होमिओपॅथीला प्रोत्साहन दिल्याबद्दल राष्ट्रपतींनी आयुष मंत्रालयाचे अभिनंदन केले.
या प्रसंगी आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा म्हणाले, “इतर वैद्यकीय प्रणाली आणि पारंपारिक औषध यांच्यात सांगड घालण्यासाठी होमिओपॅथीमध्ये अपार संधी आहेत. आवश्यकतेनुसार या प्रणालींचे एकत्रिकरण करण्याचे प्रयत्न, हे आरोग्यसेवेसाठी व्यापक दृष्टिकोनाची मागणी करणाऱ्या रुग्णांना उपयुक्त ठरतील. होमिओपॅथीसाठी एक बळकट वैज्ञानिक पाया प्रस्थापित करण्यासाठी प्रभावी संशोधन आणि चिकित्सालयीन चाचण्या महत्त्वपूर्ण आहेत. होमिओपॅथिक समुदायाच्या सहयोगाद्वारे काम करून गुणवत्ता नियंत्रण आणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी सरकार वचनबद्ध आहे. होमिओपॅथीचा अवलंब अधिकाधिक लोकांनी करून त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी, प्राथमिक आरोग्य सेवा प्रणालींमध्ये त्याच्या एकत्रीकरणाला आम्ही सक्रियपणे प्रोत्साहन देत आहोत. आम्ही सीसीआरएच आणि इतर सहयोगी सुविधांद्वारे होमिओपॅथीमधील संशोधनाला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहोत आणि चिकित्सालयीन चाचण्या आणि पुराव्या-आधारित अध्ययनासाठी संसाधने पुरवत आहोत.
* * *
S.Kane/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2017605)
Visitor Counter : 81