इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

एनईजीडी,एमईआयटीवायतर्फे सायबर सुरक्षित भारत उपक्रमाअंतर्गत आजपासून मुख्य माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांच्या 43 व्या तुकडीच्या सखोल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 08 APR 2024 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2024


सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता निर्माण करणे तसेच सर्व सरकारी विभागांतील मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे अधिकारी यांच्या क्षमता निर्मितीसाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान (एमईआयटीवाय)मंत्रालयाने ‘सायबर सुरक्षित भारत’ उपक्रमाची संकल्पना मांडली आहे. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना सुनिश्चित करण्यासाठी तसेच संस्थांना त्यांच्या डिजिटल पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे शक्य व्हावे आणि भविष्यातील सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सज्ज असावे याची सुनिश्चिती करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  
 
राष्ट्रीय ई-प्रशासन विभागाने (एनईजीडी) त्यांच्या क्षमता निर्मिती योजनेअंतर्गत, 8 ते 12 एप्रिल, 2024 या कालावधीत 43 व्या सीआयएसओ सखोल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नवी दिल्ली येथील भारतीय सरकारी प्रशासन संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आसाम, जम्मू आणि काश्मीर तसेच दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील अधिकारी सहभागी झाले होते.  


सीआयएसओना शिक्षित करून सायबर हल्ल्यांचे व्यापक आणि संपूर्ण प्रमाणात आकलन करून देणे तसेच सायबर सुरक्षा विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी आवश्यक ओळख करून देणे आणि व्यक्तिगत संस्था आणि नागरिकांना लवचिक ई-पायाभूत सुविधांच्या लाभांची माहिती करून देणे ही या प्रशिक्षण कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे होती. या क्षेत्रातील कायदेशीर तरतुदींचा समग्र आढावा पुरवून सीआयएसओजना सायबर सुरक्षा क्षेत्रातील धोरणे तयार करण्यास सक्षम करणे आणि मजबूत सायबर आपत्ती व्यवस्थापन योजना उभारणे यावर देखील या प्रशिक्षणात लक्ष केंद्रित करण्यात आले.

सायबर धोक्यांविषयी जागरुकता निर्माण करणे, क्षमता निर्मिती करणे तसेच सरकारी विभागांना सायबर प्रतिबंधक परिसंस्था उभारण्यासाठी पावले उचलणे शक्य करणे ही या कार्यक्रमाची उद्दिष्टे आहेत. सायबर सुरक्षा आणि संरक्षण याबाबत सहभागींना जागरूक करून दिशा देणे आणि त्यायोगे,नागरिकांना विविध सरकारी सेवा पुरवण्यासाठी डिजिटल भारत कार्यक्रमाची सुलभता वाढवणे यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सरकारी विभागांना त्यांच्या सायबर आरोग्य, सुरक्षितता आणि संरक्षणाकडे लक्ष देण्यास सक्षम करण्यासाठी समग्र ज्ञान आणि माहिती पुरवण्यात देखील हा कार्यक्रम सहभागी होत आहे.  

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2017478) Visitor Counter : 62