संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदलाकडून 06 ऑक्टोबर 2024रोजी नवी दिल्ली येथे अर्ध मॅरेथॉनचे आयोजन

Posted On: 08 APR 2024 8:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2024


भारतीय नौदलाच्या वतीने नवी दिल्ली येथे येत्या 06 ऑक्टोबर 2024 रोजी अर्ध मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार आहे.नागरी समाजासोबत नौदलाचे संबंध मजबूत करणे आणि देशाच्या सागरी सुरक्षा आणि हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या नौदलाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जनजागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

जीवनाच्या विविध क्षेत्रांतून  येणाऱ्या सहभागी सदस्यांमध्ये उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी, त्यांना शारीरिक चलनवलनासाठी  उत्तेजन देण्यासाठी  आणि संपूर्ण निरामय जीवनासाठी सक्रिय जीवनशैली निवडण्यासाठी देखील ही स्पर्धा  एक व्यासपीठ म्हणून काम करेल.

हा कार्यक्रम स्त्री-पुरुष  समानता, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशकता या मूल्यांना विशेष महत्त्व देईल.विविध प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या आणि समाजाच्या सर्व स्तरांतील व्यक्तींना सक्रियपणे सहभागी करून घेत, हा कार्यक्रम सर्वसमावेशकतेची संस्कृती आणि सर्वांना समान संधी देण्याच्या नौदलाच्या वचनबद्धतेला अधोरेखित करेल. लोकांमधील सौहार्द आणि स्पर्धेच्या भावनेला एकत्र आणत  एनसीआर आणि त्यापलीकडील भागातील लोकांमध्ये यामुळे मजबूत बंध निर्माण होईल, शिवाय तरुणांना नौदलात सहभागी  होऊन साहसी जीवन जगण्यासाठी यामुळे प्रोत्साहनही मिळेल.

या उपक्रमात अर्ध  मॅरेथॉन (21.1 किमी) शर्यत आणि 10 किमी आणि 05 किमी अशा धावण्याच्या शर्यती होणार असून, सर्व वयोगटातील व्यक्तींना यात भाग घेता येईल. मुंबई, विशाखापट्टणम आणि कोची येथे दरवर्षी नौदलाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या इतर दोन तत्सम कार्यक्रमांप्रमाणेच हा उपक्रम दरवर्षी होईल अशी अपेक्षा आहे.

 

N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2017473) Visitor Counter : 36


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil